esakal | ‘नाम’मुद्रा : मेघालयातील कारभारीण
sakal

बोलून बातमी शोधा

‘नाम’मुद्रा : मेघालयातील कारभारीण

‘नाम’मुद्रा : मेघालयातील कारभारीण

sakal_logo
By
जयवंत चव्हाण

ईशान्य भारतातील सात राज्ये राष्ट्रीय राजकारणात फारशी चर्चेत नसतात. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश हे घुसखोरीमुळेच वारंवार बातमीत दिसतात. बांगलादेश, म्यानमार, चीन, नेपाळ यांनी या ‘सात बहिणीं’ना वेढलेले आहे. मूळचा डोंगराळ, दुर्गम प्रदेश असल्यामुळे उर्वरित भारतापासून कायम दूरच राहिलेला भाग. त्याबरोबरच प्रगतीपासूनही.

विविध जमातींचे लोक आणि सुमारे १६०च्या वर बोलीभाषा तिथे आहेत. त्यापैकीच एक मेघालय. सर्वाधिक पावसाचे ठिकाण चेरापुंजी किंवा आता त्याच्या जवळचे गाव मॉसिनराम एवढेच सर्वसामान्यांना माहीत असतेच; पण याखेरीज ईशान्य भारताच्या लोकसंख्येत आदिवासी जमातींचे फार मोठे प्राबल्य आहे. या प्रत्येक जमातींची काही वैशिष्ट्ये आहेत. मेघालयातील गारो, खासी या महत्त्वाच्या जमाती. यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या मातृसत्ताक समाजव्यवस्था मानतात. आता जगातील काही ठिकाणेच अशी उरली आहेत, त्यात मेघालयाचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने घरातील मोठी मुलगी घराचा सर्व कारभार सांभाळते. कुटुंबात मुलगी नसेल तर दत्तक घेतली जाते. अशा या राज्याला प्रथमच त्यांच्या मूळ जमातीची मुख्य सचिव मिळाली आहे. मेघालय हा पूर्वी आसामचा भाग होता. २१ जानेवारी १९७२ला मेघालय हे वेगळे राज्य झाले. त्यानंतर प्रथमच खासी महिला रिबेका सुचियांग या राज्याच्या प्रशासनाच्या प्रमुख होणार आहेत. मातृसत्ताक पद्धती असतानाही मेघालयाला बरीच वर्षे लागली. तसेही हे राज्य अजून विकासाच्या खालच्या पायऱ्यांवरच आहे. त्यामुळे रिबेका यांना मोठी आव्हाने पेलायची आहेत. त्या स्वतःही त्यासाठी सज्ज आहेत. माजी मुख्य सचिव एम. एस. राव यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. आसाम-मेघालय केडरच्या १९८९ च्या बॅचच्या रिबेका आयएएस आहेत. राज्याच्या दक्षता आयुक्तपदाचा कार्यभारही त्यांच्याकडे आहे. यापूर्वी त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. तेव्हा प्रशासन, वित्त, गृह अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

शिक्षण क्षेत्र हे त्यांच्या प्राधान्याचे आहे. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये मेघालय खूपच मागे आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधील शिक्षणाचा स्तर उंचावण्यावर त्यांचा भर राहणार आहे. वैद्यकीय क्षेत्रावरही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. वैद्यकीय सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी अधिक तरतुदी करणार आहेत. कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या मेघालय एनर्जी कॉर्पोरेशनमध्ये मोठ्या सुधारणा करण्याचा त्यांचा मानस आहे. आसाम-मेघालय सीमेवरील वादावर चर्चेतून तोडगा काढण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. हुशार मुलांकडून मला कामाचा उत्साह, प्रोत्साहन मिळते. त्यातही विशेषकरून मुलींचा उल्लेख त्या आवर्जून करतात.

डोंगराळ राज्याची निवासी असल्याने कोणताही कठीण किंवा समस्यांचा डोंगर पार करणे अशक्य नाही, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. मेघालयातून अनेक प्रशासकीय अधिकारी बाहेर गेले आहेत. त्यामुळे खूप काही वेगळे केले आहे, असे रिबेका स्वतः मानत नाहीत. गेल्या काही वर्षांत नागरी परीक्षांमधून मेघालयातून कोणी निवडून गेलेले नाही, याबद्दल त्यांना खेद वाटतो. पण सातत्य, अथक श्रमातून परीक्षा उत्तीर्ण होणे शक्य आहे, असा विश्वासही त्या विद्यार्थ्यांना देतात. मेघालयातील प्रशासकीय प्रशिक्षण केंद्रांमध्ये काही त्रुटी आहेत, त्या दूर करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यावरही सुचियांग यांचा भर आहे. स्थानिक महिलेच्या हाती आता राज्याची कमान असल्यामुळे अनेक बाबींचा सखोल विचार करून रिबेका सुचियांग राज्य प्रगतीकडे नेतील, अशी अपेक्षा आहे.

loading image
go to top