व्यक्तीसाठी धर्म, समाजासाठी धम्म

मिलिंद बोकील
शनिवार, 28 एप्रिल 2018

धर्म आणि धम्म हे दोन्ही एकच शब्द असावेत असे वर वर पाहता वाटते. म्हणजे एक संस्कृतमधला आणि एक पालीभाषेमधला. पण प्रत्यक्षात ते तसे नाहीत. या शब्दांचा उगम पूर्वी कदाचित एका मुळापासून झाला असेल; परंतु काळाच्या ओघात त्यांना वेगवेगळे अर्थ प्राप्त झालेले आहेत.

धर्म आणि धम्म हे दोन्ही एकच शब्द असावेत असे वर वर पाहता वाटते. म्हणजे एक संस्कृतमधला आणि एक पालीभाषेमधला. पण प्रत्यक्षात ते तसे नाहीत. या शब्दांचा उगम पूर्वी कदाचित एका मुळापासून झाला असेल; परंतु काळाच्या ओघात त्यांना वेगवेगळे अर्थ प्राप्त झालेले आहेत.

धर्म शब्दांचा सरळ अर्थ, ‘जो धारण करतो तो’ असा आहे. म्हणजे ज्या तत्त्वांच्या आधारे मनुष्य चालतो ती तत्त्वे. विनोबांनी आपल्या ‘धर्मामृत’ या पुस्तकात म्हटले आहे, त्याप्रमाणे आपले जीवन ज्या नीति-विचारांवर आधारलेले असते, त्याला आपण धर्म म्हणतो किंवा ज्या तत्त्वांच्या अभावामुळे जीवन छिन्न-विछिन्न होते, अशी पायाभूत तत्त्वे म्हणजे धर्म (पृष्ठे ११-१२). मात्र धर्म शब्दाचा हा मूळ अर्थ असला तरी काळाच्या ओघात धर्माची व्याख्या, धर्माविषयीची समजूत आणि धर्माचे स्वरूप हे खूपच बदललेले आहे. सध्या तर सरसकट धर्म म्हणजे ‘रिलिजन’ असाच अर्थ घेतला जातो. धर्मसंस्थांचा उदय झाल्यापासून आणि धर्माला संघटित स्वरूप प्राप्त झाल्यापासून तर धर्म ही एक सामाजिक बाब झालेली आहे; पण धर्म शब्दाचा मूळ अर्थ पाहिला तर कोणाच्याही सहज लक्षात येईल, की धर्म म्हणून जो म्हटला जातो, तो वैयक्तिकच आहे. मनुष्याने ज्या तत्त्वांच्या आधाराने जीवन जगायचे, त्याला धर्म असे म्हणतात. म्हणजे धर्म ही जी काही गोष्ट आहे, ती स्वतःसाठी आहे, एकट्यासाठी आहे. आपल्याकडे ‘स्वधर्म’ म्हणून जी संकल्पना आहे, ती या अर्थाने अचूक आहे. स्वधर्म शब्दाचा अर्थ आपण एरवी फक्त आपले ‘निहित कर्तव्य’ असा घेतो; पण त्या अर्थाला अशारितीने संकुचित करणे योग्य नव्हे. धर्म म्हणजेच स्वधर्म - स्वतःचा, स्वतःसाठीचा आणि स्वतःपुरता. मग तुम्ही त्यात हवी तशी श्रद्धा ठेवा, हव्या त्या देवाची प्रार्थना करा, हवे ते व्रत करा - पण जे काही कराल ते स्वतःसाठी आणि स्वतःपुरते!

धम्म म्हणजे काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या पुस्तकात त्याचे सुरेख वर्णन केलेले आहे. ते म्हणतात, की धम्म ही सामाजिक संकल्पना आहे. माणूस एकटा असतो तेव्हा त्याला धम्माची आवश्‍यकता नसते. जिथे एकापेक्षा जास्त माणसे असतात, तिथे धम्म प्रस्तुत होतो. धम्मामध्ये सदाचरण आणि नैतिकता यांना प्रमुख स्थान आहे. सदाचरण म्हणजे दुसऱ्याचे अहित न करणे आणि नैतिकता म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे (पृष्ठे १७९-१८४) . याचा अर्थ असा, की धम्म म्हणजे सामाजिक नीती. समाजात माणसांनी एकमेकांशी कसे वागायचे हे जो ठरवतो, तो धम्म. हे सामाजिक वागणे कोणत्या पायावर असले पाहिजे, याचा आपण अर्थातच उत्तरोत्तर विकास करू शकतो. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि मुख्य म्हणजे न्याय यांचा समावेश करू शकतो. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा, की आपण ज्या तऱ्हेने दुसऱ्याशी वागतो, तोच आपल्या नैतिक व्यवस्थेचा आधार असतो. सोप्या भाषेत म्हणायचे तर दुसऱ्याचे कोणत्याही तऱ्हाने अहित न करणे हीच आपली सामाजिक नीती असली पाहिजे. हा अर्थ अधिक व्यापक करून अहित न करणे म्हणजेच शोषण, हिंसा, द्वेष, वैर, क्रूरता आणि भेदभाव न करणे असा आपण घेऊ शकतो. या गोष्टी जेव्हा एकापेक्षा जास्त माणसे असतात, तेव्हाच निर्माण होतात; माणूस एकटा असतो, तेव्हा नाही.
सारांशाने काय म्हणता येईल? तर धर्म म्हणून जो काही आहे, तो आपल्या स्वतःपुरता असला पाहिजे. तो सार्वजनिक करून चालणार नाही. तो रस्त्यावर आणता येणार नाही. तो आपल्या घरातसुद्धा नाही तर फक्त हृदयात ठेवला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जो हवा आहे, तो धम्म. व्यक्ती स्वधर्माने चालली पाहिजे तर समाज धम्माने. हे जे वेगवेगळे शब्द आपल्याकडे विकसित झाले आहेत, त्यांचा अर्थ आपण असा लावू शकतो. आपल्याला धर्म हवा आणि धम्मही. धर्म स्वतःच्या जगण्यासाठी, धम्म सामाजिक जगण्यासाठी!

Web Title: milind bokil write in editorial