
भारताच्या दुर्गम आदिवासी भागात सापडणाऱ्या मक्याच्या विविध जाती आणि तेथील जनजीवन, संस्कृती, प्रथा, परंपरा, रिवाज, श्रद्धा त्याच्याशी जुळल्याचे आढळते.
भाष्य : महासागर, मका आणि मिरची
भारताच्या दुर्गम आदिवासी भागात सापडणाऱ्या मक्याच्या विविध जाती आणि तेथील जनजीवन, संस्कृती, प्रथा, परंपरा, रिवाज, श्रद्धा त्याच्याशी जुळल्याचे आढळते. त्यामुळे मका खरोखर किती काळापूर्वी भारतात आला असावा? कोलंबसाच्या आधी कित्येक शतके तो भारतात होता का? असे प्रश्न उपस्थित होतात.
गेल्याच आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनाने एका ऐतिहासिक समजाला मोठाच धक्का दिला आहे. ‘नेचर’ आणि ‘सायन्स’ साप्ताहिकांनी जगाच्या नजरेला आणलेली ही गोष्ट म्हणजे कोलंबसाच्या आधी काही शतके तरी आग्नेय आशियातील माणसाला अमेरिका खंड माहीत होता आणि अनेक दर्यावर्दी प्रशांत महासागर पार करून मध्य आणि दक्षिण अमेरिकेत गेले आले होते. वास्तविक अशी शंका याआधीही अनेक अभ्यासकांना होती. त्याबद्दल लिहिलंही गेलंय. पण ते सगळे कल्पनाविलास म्हणून सोडून दिले गेले. गेल्या काही दशकांत उपलब्ध झालेल्या डीएनएविषयक नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आता या प्रश्नाकडे नवीन चष्म्यातून पाहणं शक्य झाले आहे. असे प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आता असं दाखवून दिलं आहे की, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील स्थानिक अमेरिकी वंश आणि आग्नेय आशियातील वंश यांच्यात जनुकीय देवाणघेवाण झाली आहे. म्हणजे या ना त्या प्रकारे विवाह संबंध असले पाहिजेत. विवाह संबंध असतील तर अर्थात सांस्कृतिक देवाणघेवाण झालीच असेल हे काही सांगायला नको.
ही गोष्ट स्पष्ट झाल्याचा भारताशी एक मजेदार संबंध आहे. आपल्या खाद्यपदार्थांपैकी बटाटे, रताळी, मका, मिरची, टोमॅटो अशा अनेक वनस्पती मूळच्या अमेरिका खंडातल्या. युरोपीय वसाहतवाद्यांबरोबर त्या भारतात आल्या असं मानलं जातं. कृषी तज्ञ आणि इतिहास तज्ञ हेच सांगतात. पण या समजाला छेद देणाऱ्याही अनेक गोष्टी आहेत. अकराव्या ते तेराव्या शतकातल्या अनेक मंदिरांवर मक्याचं कणीस कोरलेलं दिसतं. देवादिकांच्या, अप्सरांच्या मूर्तींच्या एका हातात हे कणीस मौल्यवान वस्तूसारखं बाळगलं आहे. हे मक्याचं कणीसच आहे की वेगळं काही यावर जागतिक व्यासपीठावर बरीच चर्चाही झाली. १९८९मध्ये प्रख्यात उत्क्रांतीशास्त्रज्ञ विल्यम हॅमिल्टन भारतात आला होता. त्याला या मूर्ती आणि त्यावरचं कोरीव कणीस पाहण्याची खूपच इच्छा होती. त्यावेळी पुढे बंगळुरूच्या कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलेला चंद्रशेखर, इतर काही कृषी अभ्यासक आणि मी हॅमिल्टनला सोमनाथपुरच्या मंदिरांमध्ये घेऊन गेलो. मक्याच्या कणसासारखी दिसणारी आणखी कुठली वनस्पती या भागात आहे का याचा बराच विचार केला. मग आजूबाजूच्या जंगलांमध्ये शोध घेत हिंडलोदेखील.
सुरणाच्या वर्गातल्या काही वनस्पतींना थोडं फार असं दिसणारं कणीस असतं. अशी वेगवेगळ्या अवस्थेतली वेगवेगळ्या प्रजातींची अनेक कणसं तपासल्यावर आणि त्याची या कोरीव कामातल्या आकृतीशी तुलना केल्यावर ही ती नाहीत, अशी आमची खात्री झाली. कोरीव कणसांचं स्पष्ट साम्य फक्त मक्याच्या कणसाशीच आहे आणि दुसऱ्या कशाशी नाही अशा निष्कर्षावर आम्ही पोचलो. पण अकराव्या शतकात भारतात मका नव्हताच यावर सगळे संशोधक इतके ठाम होते की हे कुणालाच मान्य होण्यासारखं नव्हतं. हा मका नाही तर काय आहे यावर तज्ज्ञांनी अनेक मतं व्यक्त केली होती. त्यातला एक प्रमुख विचार असा की हे मुक्ताफळ नावाचं मिथक आहे. काल्पनिक फळ आहे. मुक्ता म्हणजे मोती. या फळाला मोती लागतात अशी कवीकल्पना असावी. त्याचं प्रतिबिंब या कोरीव कामात दिसत आहे. हे सगळेच अंदाज होते.
मुक्का, मुक्काई, मुक्ताफळ
खरं खोटं समजायचा काही मार्ग नव्हता. हळू हळू हा विषय माझ्या मनातून पुसलाच गेला होता. त्यानंतर तीस वर्षांनी सातपुड्याच्या आदिवासी भागात हिंडताना तिथले लोक पारंपरिकरित्या मका पिकवतात हे ऐकलं. तिथले भिल्ल, पावरा, कोकणी हे आदिवासी, त्यातले विशेष करून पावरा मक्याच्या पिकाला फार महत्त्व देतात. भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज् फौंडेशन (BAIF) या संस्थेनी आणि विशेषतः संजय पाटील यांनी या भागातल्या मक्याच्या वाणांचा संग्रह केला आहे. इतक्या दुर्गम भागात आदिवासींकडे मक्याच्या वाणांची इतकी थक्क करणारी विविधता आहे, की इतके सगळे वाण गेल्या तीनएकशे वर्षात पारंपरिक पद्धतीच्या शेतीमधून जन्माला आले असतील हे मानणं मला अवघड गेलं. परत मक्याभोवती यांच्या अनेक श्रद्धा, रिवाज, परंपरा, संस्कृती उभ्या आहेत. चांगल्या बियाण्याचं जतन आणि देवाण घेवाण करण्याच्या पद्धती त्यांच्या धार्मिक श्रद्धांशी निगडित आहेत. मक्याला हे लोक मुक्का किंवा मुक्काई म्हणतात. हे मुक्ताफळातल्या ‘मुक्ता’शी जुळणारं आहेच. बरं मक्याचा दाणा मोत्यासारखा दिसतो हे काय सांगायला हवं? मक्याच्या पारंपरिक विविध जाती जशा सातपुड्यात आहेत तशा पूर्व हिमालयाच्या तळटेकड्यांमध्ये आणि भारताच्या इतर ‘मागास’ म्हटल्या जाणाऱ्या अनेक दुर्गम भागांमध्येही आहेत.
त्या मानाने ज्या भागात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव अधिक आहे आणि जिथे मोठ्या प्रमाणावर मक्याचं पीक व्यापारी तत्वांवर घेतलं जातं तिथे वाणांची विविधता फारच कमी. हे असं का असावं? तेव्हा माझ्या डोळ्यासमोर अकराव्या शतकातलं सोमनाथपूर परत एकदा उभं राहिलं. ही आदिवासींची परंपरा खरोखरच गोऱ्या वसाहतींपेक्षा जुनी आहे का? मका खरोखर किती काळापूर्वी भारतात आला असावा? कोलंबसाच्या आधी कित्येक शतके तो भारतात होता का? जी गोष्ट मक्याला लागू होते ती कदाचित मिरचीला लागू असावी. कारण मिरचीच्या वाणांचं भारतातलं वैविध्यही अफाट आहे आणि तेही दुर्गमातल्या दुर्गम भागांपर्यंत पसरलेलं आहे. आणि एवढे सगळे वाण फक्त तीनशे वर्षात तयार झाले असतील ही गोष्ट अशक्य नसेल पण अवघड वाटणारी निश्चितच आहे.
या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मार्ग आता विज्ञानाकडे खरोखरंच आहे. भारतातल्या आणि अमेरिका खंडातल्या मक्याच्या सर्व वाणांच्या डीएनएचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर निरनिराळे वाण नक्की कधी जन्माला आले? कुठे? त्याचं एकमेकांमधलं नातं काय? कुठले वाण बाहेरून आणले गेले? कुठले इथेच तयार झाले? कधी? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील. हा अभ्यास कसा करायचा यातला मी काही तज्ज्ञ नाही. पण सातपुड्यामधून परत आल्यावर मी दुर्गम भागात हिंडून काम करणाऱ्या आणि डीएनएच्या पातळीवर काम करणाऱ्या लोकांना एकत्र आणून त्यातून असा काही अभ्यास सुरु करता येतो का, असा प्रयत्न केला. त्यासाठी पहिल्या टप्प्यात तरी निधी कुठून कसा उपलब्ध होईल, याची व्यवस्थाही केलीच होती. हे केल्यानंतर माझं काम संपलं होतं खरंतर. कारण मी यातल्या कशातलाच तज्ज्ञ नाही. त्या विषयातल्या संशोधकांनी ते पुढे न्यायला हवं होतं. पण संशोधक आणि संशोधन संस्थांमधलं अनाकलनीय राजकारण मध्ये आलं आणि हा अभ्यास सुरूच झाला नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी मात्र खर्च झाला.
आता आग्नेय आशियातील आणि मध्य-दक्षिण अमेरिकेतील लोकांमध्ये बऱ्याच काळापासून दर्यावर्दी संबंध होते, हे स्पष्ट झाल्यावर तरी या अभ्यासाला गती मिळाली पाहिजे. कारण आग्नेय आशियाशी भारताची देवाण घेवाण होती, यात तर काहीच शंका नाही. या प्रशांत महासागरावरील आशियाई दर्यावर्दींनी मका आणि कदाचित मिरचीही कोलंबसाच्या कितीतरी आधीच भारतात आणली असणं आणि ती हळूहळू संस्कृतीचा, लोककथा आणि शिल्पकलेचाही भाग झाली असणं शक्य आहे. अजून तरी मक्याचा असा अभ्यास भारतात सुरु झाल्याचं ऐकिवात नाही. दुर्गम भागातल्या वाणांची माहितीसुद्धा पूर्णपणे संकलित झालेली नाही. त्यांचा जनुकीय अभ्यास तर दूरच. हे काम आज ना उद्या विज्ञानाच्या व्यासपीठावर कुणीतरी करेलच. यासाठी लागणारं तंत्रज्ञान पूर्णपणे भारतात आहे. पण भारतातले वैज्ञानिक आपल्या परिसरातले प्रश्न ओळखून त्यांचा अभ्यास करतात की गोऱ्यांच्या अनुकरणातच अजूनही धन्यता मानतात हा प्रश्न विज्ञानाचा नसून त्या क्षेत्रातली संस्कृती आणि मनोभूमिकेचा आहे. भारताताल्या वैज्ञानिकांनी आपल्या संस्कृतीला जाणीवपूर्वक आपणच आकार द्यायला हवा.
Web Title: Milind Vatave Writes India Maize Tribal Area Chilly
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..