भाष्य : ‘नोबेल’ची दुसरी बाजू

यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होऊ लागलेली आहे. दुसरीकडे इन्सुलिनच्या शोधाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होताहेत आणि त्याला ‘नोबेल’ मिळाल्याला पुढल्या वर्षी होतील.
भाष्य : ‘नोबेल’ची दुसरी बाजू
Summary

यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होऊ लागलेली आहे. दुसरीकडे इन्सुलिनच्या शोधाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होताहेत आणि त्याला ‘नोबेल’ मिळाल्याला पुढल्या वर्षी होतील.

‘नोबेल’ न मिळालेल्या कित्येकांचं संशोधन तितक्याच दर्जाचं, काकणभर अधिक चांगलंही असू शकतं. ‘नोबेल’सारख्या पारितोषिकांची झगमगती बाजू लोकांसमोर येतेच; पण त्यामागे इतरही अनेक रंगांचे अनेक पैलू असतात. त्यावरही नजर टाकणे विज्ञानाच्या अभ्यासकांसाठी आवश्यक आहे.

यंदाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होऊ लागलेली आहे. दुसरीकडे इन्सुलिनच्या शोधाला यंदा शंभर वर्ष पूर्ण होताहेत आणि त्याला ‘नोबेल’ मिळाल्याला पुढल्या वर्षी होतील. ‘नोबेल’सारख्या पारितोषिकांची झगमगती बाजू लोकांसमोर येतेच; पण त्यामागे इतरही अनेक रंगांचे अनेक पैलू असतात. केव्हातरी त्यावरही नजर टाकणे विज्ञानाच्या अभ्यासकाला आवश्यक आहे. सर्वसामान्य माणूस समजतो, तेवढं विज्ञानाच्या क्षेत्रात ‘नोबेल’ला महत्त्व नाही. विज्ञानाविषयी आणि वैज्ञानिकांविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात कुतूहल, ओढ आणि आदर निर्माण करण्यात त्याचा वाटा नक्कीच आहे. पण खुद्द विज्ञानाच्या क्षेत्राला अशा पारितोषकांमुळे फायदा होतो की, त्यातल्या गुंतागुंती वाढून त्याचा तोटाच अधिक होतो, हे सांगणं कठीण.

शंभर वर्षांपूर्वीची इन्सुलिनची गोष्ट घ्या. इन्सुलिनच्या शोधासाठी १९२३चं नोबेल बँटिंग आणि मॅकलिओड या दोघांना घोषित झालं. बँटिंगने आपला सहकारी चार्ल्स बेस्ट याचाही त्यात वाटा आहे, असं सांगून बक्षिसाची काही रक्कम त्याला देऊ केली. मॅकलिओड यानी जेम्स कॉलिप याच्याबाबतीत हेच केलं. पण यात आणखी एका व्यक्तीकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं किंवा केलं गेलं. निकोल पौलेस्क्यू या रोमानियामधील शास्त्रज्ञाने बँटिंगच्या सहा महिने आधी आपले असेच प्रयोग प्रसिद्ध केले होते आणि साखर नियंत्रण करणाऱ्या तत्त्वाला, म्हणजे आपण ज्याला आज इन्सुलिन म्हणतो त्याला ‘पँक्रिआइन’ असे नांव दिले होते. बँटिंग आणि मॅकलिओड यांना ‘नोबेल’ घोषित झाल्यावर पौलेस्क्यूने नोबेल कमिटीला पत्र लिहून ही गोष्ट लक्षात आणूनही दिली.

नोबेल विजेते कसे ठरतात त्याची एक पद्धत आहे. कुणीतरी नामांकन करण्याची गरज असते. नामांकन करणाऱ्याचं स्वतःचं वजन वगैरे सारख्या गोष्टी तर महत्त्वाच्या असतातच. पण ‘नोबेल’च्या घटनेत आणखी काही अडचणीच्या तरतुदी आहेत. एकदा दिलेलं ‘नोबेल’ काढून घेता येत नाही. एकाच शोधासाठी दोनदा देता येत नाही. त्यामुळे सर्व पुरावे पौलेस्क्यूच्या बाजूने असूनही त्याच्यावर जो अन्याय झाला तो कधीच दूर झाला नाही. आजही इन्सुलिनच्या इतिहासात पौलेस्क्यूचं नांव येतच नाही. अशी गोष्ट ‘नोबेल’च्या इतिहासात एकदा नाही तर अनेकदा झाली आहे. ग्रीन फ्लोरोसंट प्रोटिनच्या शोधासाठी २००९मध्ये मार्टिन चाल्फी आणि रॉजर त्सिएन यांना नोबेल दिलं गेलं. पण हा मूळ शोध डग्लस प्रॅशर याचा होता. या संकल्पनेचा पुढचा विकास चाल्फी आणि त्सिएन यांनी केला होता ही गोष्ट खरी. पण रोप ज्यांनी लावलं तो काय करत होता? तर ज्यावेळी ‘नोबेल’ जाहीर झालं, त्यावेळी डग्लस प्रॅशर ड्रायव्हरची नोकरी करत होता. याचे कारण विज्ञानाच्या क्षेत्रात त्याला कुठे नोकरीही मिळत नव्हती. सुदैवाने चाल्फी आणि त्सिएन मोठ्या मनाचे निघाले. त्यांनी प्रॅशरचा शोध घेऊन त्याला विज्ञानाच्या क्षेत्रात सन्मानाने परत आणले. पण ‘नोबेल’च्या नियमांप्रमाणे त्याचा ‘नोबेल’साठी परत विचार होऊ शकला नाहीच. मार्टिन चाल्फी हा पुढे माझा चांगला मित्र झाला आणि त्याच्याच तोंडून मला ही कथा प्रांजळपणे ऐकायला मिळाली. इन्सुलिनच्या बाबतीत असं घडलं नव्हतं. पौलेस्क्यूला दाबून टाकण्याचेच प्रयत्न सगळ्यांकडून शेवटपर्यंत होत राहिले होते आणि अजूनही आहेत. इन्सुलिनच्या शोधाला शंभर वर्षे झाल्यानंतर तरी आपण ही चूक सुधारणार का हा प्रश्न आहे. ही चूक सुधारण्यात सर्वात मोठा अडथळा कशाचा असेल तर ‘नोबेल’ पारितोषकाचाच!

शोध लागण्याची प्रक्रिया

विज्ञानात एखादा शोध लागण्याची प्रक्रिया सफरचंद पडण्याइतकी सोपी नसते. त्यात अनेकांचे प्रयत्न, काहींनी विचारलेले खोलवरचे प्रश्न, गाठलेले महत्त्वाचे टप्पे, काहींचे प्रयत्न फसल्याचा इतिहास या सगळ्याचा लागणाऱ्या शोधात वाटा असतो. अपयशातून शिकूनच पुढे यश मिळालेलं असतं. अशावेळी एखाद्या शोधाचं श्रेय एखाद्याला देणं हा केवळ इतरांवर अन्याय नाही, तर विज्ञानाच्या मूळ तत्त्वांवरचा मोठा घाव आहे. यामुळे सामान्य माणसाची विज्ञानाविषयीची कल्पना वस्तुनिष्ठ होण्याचं सोडून व्यक्तिनिष्ठ होते. याचा विज्ञानावरचा दूरगामी परिणाम चांगला होतो की वाईट, हा संशोधनाचा विषय आहे; पण यावर काही सखोल संशोधन झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. ‘डीएनए’ने चे गोल गोल जिने शोधल्याबद्दल वॉटसन आणि क्रिक यांचं नांव आता अगदी शाळेतल्या मुलांनाही माहीत असतं. पण यांच्या शोधामागेही कित्येकांचे योगदान आहे. त्यात अर्विन चार्गाफ, रोजालींड फ्रँक्लीन आणि लिनस पॉलिंग अशी काही ठळक नांवंही आहेत. वॉटसन आणि क्रिक यांना ‘नोबेल’ मिळाल्यावर अनेक वाद आणि कटुता निर्माण झाली. चार्गाफनी पुढे अत्यंत सुंदर आत्मचरित्र लिहिलं. त्यात आपल्या हुकलेल्या ‘नोबेल’विषयी प्रत्यक्ष फारसं लिहिलेलं नाही. पण त्या वादातून निर्माण झालेली कटुता त्याच्या लिखाणात या ना त्या प्रकारे वारंवार डोकावत राहते.

प्रश्न फक्त श्रेय देण्याघेण्यासंबंधीचा नाही. ज्यांना नोबेल अथवा दुसरं एखादं प्रतिष्ठेचं पारितोषक दिलं गेलं, त्यांच्या कामात खोट निघाली किंवा त्यांनी ते मांडण्यात लबाडी केली असंही काही बाबतीत उघडकीला आलं आहे. प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांत एखादी मोठी खोट किंवा लबाडी दिसून आली तर तो शोधनिबंध मागे घेतला जातो. आजपर्यंत किमान पाच नोबेल विजेत्यांवर आपले प्रसिद्ध झालेले संशोधनपर निबंध मागे घेण्याची वेळ आली आहे. आपली चूक आपण होऊन कबूल करून प्रांजळपणे मागे घेणं वेगळं आणि दुसऱ्यांनी लबाडी उघडकीला आणल्यानंतर नाइलाजाने मागे घ्यावं लागणं वेगळं. संशयाचा फायदा दिला तरी ही सर्वच प्रकरणं पहिल्या प्रकारची आहेत असं म्हणता येत नाही. सामान्य माणूस समजतो, तसं पारितोषिकांना विज्ञानात काही महत्त्व नाही. नसायला पाहिजे. एखादा खेळाडू ऑलिम्पिक पदक मिळवण्याच्या ध्येयाने झपाटून तयारी करतो. पदक हे त्याचं ध्येय असतं, यशाची व्याख्या असते. तसं विज्ञानात ‘नोबेल’ मिळवण्याच्या ध्येयाने कुणी संशोधन करत नाही. संशोधनातल्या यशापयशाच्या व्याख्येत कुठल्याही पारितोषिकाला काही स्थान नाही, हे समजूनच आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. नोबेल मिळाल्याने कुणी शास्त्रज्ञ अलौकिक होत नाही. नोबेल न मिळालेल्या कित्येकांचं संशोधन तितक्याच दर्जाचं, काकणभर अधिक चांगलंही असू शकतं. पण त्यांना नोबेल न मिळण्यामागे केवळ नशीब किंवा विज्ञानाच्या क्षेत्रातली विषमता, वंशवाद आणि राजकारण असू शकतं आणि याचीही कित्येक उदाहरणं आहेत.

‘कोणी’पेक्षा ‘काय’ हे महत्त्वाचे...

याचा अर्थ पारितोषके बंदच करावीत असा नाही घेतला तरी चालेल. पण विज्ञानात व्यक्तिपूजेला स्थान नाही. कुणी मोठा, कुणी छोटा नाही. शोधाला महत्त्व आहे, शोधणाऱ्याला नाही हे जाणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. नुकतेच भारत सरकारने विज्ञानातील देशांतर्गत पारितोषिके कमी करण्याचं धोरण जाहीर केलं. त्यावर वादंगही झाले. पण हे वाद अनावश्यक आहेत. वैज्ञानिकांना पारितोषके देण्यापेक्षा संशोधनासाठी निधी वेळेवर उपलब्ध करून दिला जातो की नाही,विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या त्यांच्या खात्यात वेळेत जमा होतात की नाही, नवीन प्रकल्पांच्या प्रस्तावावर वेळेत आणि पारदर्शकपणे निर्णय घेतले जातात की नाही, नोकरशाही संशोधकांशी अरेरावीने वागत नाही ना, हे पाहणं अधिक महत्त्वाचं. सरकारवर टीका करायची तर यासाठी केली पाहिजे. पारितोषिक कुठलंही का असेना, हेडलाईन वाचून विसरून जाण्याची ती बातमी असली पाहिजे. हेच निखळ विज्ञानासाठी योग्य ठरेल.

(लेखक विज्ञान संशोधक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com