शक्तिप्रदर्शन! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मार्च 2019

अमेरिका आणि रशियाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाश संशोधनात केलेली प्रगती सर्वश्रुत आहे, तर चीननेही एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला या क्षेत्रातील दमदार प्रगतीचे दर्शन जगाला घडविले.

उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी करून भारताने अवकाश संशोधन क्षेत्रातील ओळख ठळक केली आहे. संभाव्य धोक्‍यांना तोंड देण्यासाठी अशा प्रतिरोधाची गरज होतीच.

उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने अवकाश महासत्तांच्या पंक्तीत स्थान मिळविले, ही प्रत्येक भारतीयासाठी निःसंशय अभिमानाची बाब आहे. अणुचाचणी करून भारताने आण्विक प्रतिरोध (न्यूक्‍लिअर डिटरन्स) साध्य केला होता आणि आता शत्रुराष्ट्रांच्या उपग्रहांना पाडण्याची तांत्रिक क्षमता आपल्याकडे असल्याचे सिद्ध करून अवकाश युद्धातील प्रतिरोधही प्राप्त केला आहे. त्यासाठी जे तंत्रज्ञान उपयोगात आणले गेले, त्याची रचना अतिशय गुंतागुंतीची तर असतेच; परंतु अवकाशात फिरत असलेल्या उपग्रहाचा नेमका माग घेऊन भेद करणे, हे अतिशय आव्हानात्मक असे काम आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान डंकर्कच्या गाजलेल्या लढाईनंतर ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी केलेले भाषण बरेच गाजले. ‘आम्ही जमिनीवर लढू, समुद्रात लढू आणि हवाई क्षेत्रातही प्राणपणाने झुंज देऊन आमच्या देशाचे रक्षण करू...,’ असे उद्‌गार त्यांनी काढले होते. आता एकविसाव्या शतकातील युद्धतंत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. जमिनीवर, समुद्रावर आणि हवाई क्षेत्रापुरते युद्ध मर्यादित राहिलेले नसून, अवकाशातही लढले जाणार आहे. ‘स्पेस’ आणि ‘सायबर स्पेस’ ही क्षेत्रे भविष्यात महत्त्वाची ठरणार आहेत. पृथ्वीच्या जवळच्या कक्षेतून मार्गक्रमण करणाऱ्या भारताच्याच जुन्या उपग्रहावर क्षेपणास्त्राने अचूक मारा करून तीन मिनिटांतच तो पाडला आणि ही चाचणी फत्ते झाली. अवकाशात उपग्रह सोडून त्याद्वारे हेरगिरीचे प्रकार होतात, हे कधीच लपून राहिलेले नव्हते. भारत अशा प्रकारच्या हेरगिरीचे लक्ष्य ठरत असेल, तर त्याचा मुकाबला करण्यासाठी भारताकडेही शक्ती असली पाहिजे; तशी ती प्राप्त केल्याचे भारताने दाखवून दिले. संरक्षण विकास व संशोधन विभागाच्या (डीआरडीओ), तसेच भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांनी या यशस्वी मोहिमेद्वारे देशाची मान उंचावली आहे. यांच्यापैकी कोणी या यशस्वी मोहिमेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली असती, तर ते जास्त उचित ठरले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केल्याने औचित्याचा प्रश्‍न निर्माण झाला. लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असताना तर याचे गांभीर्य आणखी वाढते. ‘राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांच्या निवेदनांच्या बाबतीत आचारसंहितेतील तरतुदींबाबत अपवाद केला जातो,’ असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. हे मान्य केले तरी लोकशाही ही जशी नियम, कायदेकानूंवर चालते, तशीच ती निकोप संकेतांवरही चालते, हे लक्षात घ्यायला हवे. आपण पाडू तोच पायंडा, या शैलीने वागणाऱ्या नेत्याकडून अशी अपेक्षा ठेवणेही धाडसाचेच म्हणावे लागेल. मात्र, या औचित्यभंगामुळे भारताच्या कामगिरीचे महत्त्व कमी लेखले जाऊ नये. मुळात दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नांनंतर शास्त्रज्ञांना असे यश मिळत असते. या मोहिमेची तयारी २००८ पासून चाललेली होती. दीर्घकाळ चाललेल्या पायाभूत कामांच्या बळावरच यशाचा सुवर्णक्षण हाती गवसतो.

अमेरिका आणि रशियाने विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाश संशोधनात केलेली प्रगती सर्वश्रुत आहे, तर चीननेही एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला या क्षेत्रातील दमदार प्रगतीचे दर्शन जगाला घडविले. त्या देशाने २००३ मधील मानवी अवकाश मोहीम यशस्वी केली. अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमार्फत दळणवळण, हवामानविषयक अंदाज अशा अनेक उपयोगांप्रमाणेच उपग्रहामार्फत टेहळणी करणे, प्रतिस्पर्धी देशांची गोपनीय माहिती मिळविणे, हेही होत असते. अवकाश संशोधन क्षेत्रातील स्पर्धेला हेही परिमाण असल्याने आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी या क्षेत्रातील तांत्रिक क्षमता वाढविण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. ‘मिशन शक्ती’ हे त्यादृष्टीनेही महत्त्वाचे पाऊल. वास्तविक, शांततापूर्ण आणि विधायक कामांसाठी अवकाश तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा, अशीच भारताची भूमिका आहे. ज्याप्रमाणे पारंपरिक युद्धतंत्राच्या बाबतीत भारत आंतरराष्ट्रीय नियम आणि करारांना बांधील आहे; त्याचप्रमाणे अवकाश मोहिमांच्या बाबतीतही भारताने या मर्यादा नेहमीच पाळल्या आहेत आणि ही चाचणीदेखील त्याला अपवाद नाही, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलेच आहे. मुळात बाह्य अवकाश ही साऱ्या मानवजातीची ठेव आहे आणि त्यादृष्टीनेच त्याकडे पाहायला हवे. अवकाश तंत्रज्ञानात प्रगती केलेल्या सर्वच देशांकडून ही अपेक्षा आहे. अवकाशही युद्धखोरीने व्यापून गेले, तर त्यात नुकसान आहे ते साऱ्या मानवजातीचेच. त्यामुळे राष्ट्राराष्ट्रांत शांतता, सहकार्य आणि सौहार्द निर्माण होण्यासाठी प्रयत्न करीत राहणे सर्वांत महत्त्वाचे. परंतु, दुर्बलांच्या हितोपदेशाला किंमत दिली जात नाही, हेही आंतरराष्ट्रीय व्यवहारातील वास्तव आहे. त्यामुळे सर्व स्तरांवर आपले किमान सामर्थ्य निर्माण करीत राहणे आवश्‍यक ठरते. उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीकडे त्या दृष्टिकोनातून पाहायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mission Shakti makes India a space power and India A-Sat missile in editorial