भाष्य : श्रीलंकेच्या महासंकटाचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Srilanka People
भाष्य : श्रीलंकेच्या महासंकटाचे धडे

भाष्य : श्रीलंकेच्या महासंकटाचे धडे

- मोहन रामन्

श्रीलंका म्हणजे इतिहास आणि सांस्कृतिकदृष्ट्या आपल्या देशाशी प्राचीनतम घनिष्ठ संबंध असलेले पुराणकथांतील रत्नद्वीपाचे नंदनवन. श्रीलंकेबरोबरचे आपले संबंध हे व्हिएन्ना परिषदेत सुनिश्चित केलेल्या राजनैतिक नियमांच्या चौकटीपलीकडचे आहेत. प्राचीन श्रीलंका ही भारताहून अधिक संपन्न होती. या राष्ट्राने बराच काळ स्वातंत्र्य अबाधित राखले. ब्रिटिश आधिपत्याखालील राष्ट्रांपैकी श्रीलंका हा पहिला देश होता, जिथे सर्वप्रथम १९३२मध्ये प्रौढ मतदानाच्या अधिकाराला मान्यता मिळाली होती आणि जेथील प्रशासनाला देशांतर्गत प्रश्नांवर काम करण्याचे अधिकार मिळाले होते. त्यामुळेच वसाहतवादी राष्ट्रांच्या आधिपत्याखाली असून देखील श्रीलंकेला आपल्याप्रमाणे यातना सहन कराव्या लागल्या नाहीत. श्रीलंकेची लोकसंख्या आणि क्षेत्रफळ हे दोन्हीही तमिळनाडूपेक्षा कमी आहे. मात्र अनेक बाबींत साम्य आहे. स्नेहाचा धागाही आहे. चिंचोळ्या सामुद्रिक पट्ट्यामुळे भौगोलिक विभागणी झाली असली तरी दोन्ही देशांच्या सांस्कृतिक एकजिनसीपणाला बाधा येत नाही.

आत्मघात आणि ऱ्हास

आपल्यापैकी अनेक जणांना श्रीलंकेचे कौतुक वाटत होते. त्या देशाकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असे वाटत होते. असे असताना अचानक ऱ्हास कसा सुरू झाला? कोणत्या गोष्टी श्रीलंकेच्या आत्मघातास कारणीभूत ठरल्या? काही दशकांपूर्वी घडलेल्या घटनांत या प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत. क्रूर आणि अमानुष अशा क्रिया-प्रतिक्रिया आणि संघर्ष यांच्या खऱ्या- खोटया कथांमुळे काही पूर्वग्रह निर्माण झाले. ते मनांत रुतून बसले. शांततापूर्ण सहअस्तित्वाचे बौद्ध तत्त्वज्ञान जिथे प्रसार पावले, तिथे अशी संघर्षाची परिस्थिती निर्माण व्हावी, हे संभ्रमात टाकणारे होते. याबाबतच्या सखोल संशोधनातून श्रीलंकेत माजलेल्या अराजकतेच्या कारणांची उकल होईल. पण ज्यांनी एकेकाळी लोकशाही मूल्यांची जपणूक केली त्यांनीच त्याकडे पाठ फिरवली, हेही आपण पाहिले.इतर अनेक नवस्वतंत्र देशांप्रमाणे नव्याने स्वतंत्र झालेल्या श्रीलंकेचे नेतृत्व हे त्यावेळच्या प्रस्थापित उमराव वर्गाने ताब्यात घेतले. या नेतृत्वाला आव्हान दिले ते तळातून जनाधार मिळवत पुढे आलेल्या नेत्यांनी. लोकशाहीची कास धरून त्यांना समाजाला प्रगतिपथावर नेता आले असते. दुर्दैवाने त्यांनी श्रीलंकेतील वंशभेदावर भर देत समाजातील विभाजन अधिक ठळक केले. त्याचे परिणाम घातक झाले. वंश, भाषा, राजकीय विचारधारा आणि धर्म यांचे एक घातक असे रसायन तयार झाले. सर्व विचारधारा, पंथ, वंश यांना समान वागणूक देणाराएकेकाळचा समावेशक असा समाज दुभंगला. हा मार्ग अतिशय चुकीचा होता. या चुकीच्या वाटचालीला विरोध करण्याचा प्रयत्न दोन्हीकडे अनुयायीवर्ग असलेल्या पंथप्रमुखांनी केलाही. पण तो यशस्वी झाला नाही. काहींनी आहे वास्तव स्वीकारत प्रवाहपतीत होण्याचा मार्ग पत्करला. अर्थात त्यांना तात्पुरता फायदाही झाला.

या सगळ्याचा परिपाक म्हणजे वांशिक संघर्ष आणि हिंसाचार. श्रीलंकेत यादवी युद्ध झाले. सरकारने दमनतंत्राचा पुरेपूर वापर केला. जगातील अनेक मित्रदेशांनी श्रीलंका सरकारला सूज्ञ धोरणे अंगीकारण्याचा सल्ला दिला. पण तोवर उशीर झाला होता. दुष्ट प्रवृत्तींनी समाजमनाचा ताबा घेतला होता. उठणारा प्रत्येक आवाज कोणत्या बाजूचा आहे, यावर त्याचे मूल्यमापन ठरू लागले. तो आपल्याला पाठिंबा देणारा आहे, की विरोध करणारा आहे, यावर त्याविषयीचे धोरण अवलंबून राहू लागले. पण याची परिणती भयानक अशा युद्धात झाली. मोठी जीवितहानी झाली.दोन्ही बाजूंकडून वांशिक हत्याकांडे घडली. दहशत माजविण्यात आली.सर्वसामान्य लोकांचा ढाल म्हणून वापर करून हे युद्ध खेळले गेले, हे आणखी गंभीर. यात जे जिंकले आणि जे हरले त्या दोघांच्याही मनावर या युद्धामुळे पडलेले व्रण सहज पुसले जाण्यासारखे नाहीत.

श्रीलंका सरकारने एलटीटीईच्या विरोधात जे युद्ध केले, त्यानंतर खरे तर गरज होती, ती देशाच्या युद्धोत्तर पुनर्बांधणीची. सर्वांगीण पुनर्वसनाची. तसे झाले नाही. त्यामुळे या संघर्षात जे उद्ध्वस्त झाले, त्यांच्या मनात प्रस्थापितांविषयी कमालीचा राग खदखदत राहिला आहे. या जुन्या जखमांवर मलमपट्टी तर झाली नाहीच, पण नव्या जखमा होत राहिल्या. ज्यांना यश मिळाले, त्यांना ते पचवता आले नाही. त्यांचा उन्माद परिस्थिती आणखी बिघडवण्यास कारणीभूत ठरला. निवडणुकीच्या प्रचारात याचे उघडउघड दर्शन घडले. विभाजन आणि त्यातून आलेल्या जखमा भळभळत असतानाच जागतिक मंदी,कोविड अशी संकटे आली. निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली. ठाणबंदी (लॉकडाऊन)मुळे पर्यटनाच्या कण्यावरच घाव घातला गेला. या संकटमालिकेत दहशतवादी हल्ल्याची भर पडली. अर्थव्यवस्था लवकर पूर्वपदावर येईल, अशा भ्रमात राज्यकर्ते राहिले. खर्चाची उधळपट्टी थांबविण्याऐवजी कर्ज काढण्याचा मार्ग अवलंबला गेला. परतफेडीची क्षमताच नसल्याचे ढळढळीतपणे दिसू लागले. या दिवाळखोर अशा सरकारी कारभाराचा देशाला फटका बसला. रासायनिक खते आयात करावी लागू नयेत म्हणून सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्यात आले. या सगळ्या घटनांचा परिपाक म्हणजे सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंनाही पारखे व्हावे लागले. त्यातून त्यांची जी ससेहोलपट होत आहे, त्याची दृश्ये साऱ्या जगाने दूरचित्रवाणीवर पाहिली.

राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व

या दुर्दैवी घटनाक्रमातून भारत व श्रीलंका यांनाही धडा घेता येण्याजोगा आहे. पहिला धडा म्हणजे अबाधित असा ऐक्यभाव. राष्ट्रीय एकात्मता भक्कम असेल तर कोणत्याही आव्हानाला यशस्वीपणे तोंड देता येते. राजकारणी तत्कालिक लाभासाठी समाजात फूट पाडत असतात. सर्वसामान्य मात्र ऐक्याचे धागे टिकविण्याचा प्रयत्न करतात. त्सुनामीच्या संकटाच्या वेळी श्रीलंकेने एकदिलाने त्याचा मुकाबला केला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चर्चिल यांनी ज्या प्रमाणे जनसामान्यांचा पाठिंबा मिळविला आणि त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करण्यास प्रवृत्त केले, ते चांगल्या नेतृत्वाचे लक्षण होते. नेत्याने जर लोकांचा विश्वास संपादन केला असेल तर हे शक्य होते.

कारभारात प्रामाणिकपणा असणे हा दुसरा धडा आहे. श्रीलंकेतील कारभारात भ्रष्टाचार होता. सार्वजनिक हिताला हरताळ फासण्यात येत होता. प्रामाणिकपणे सरकारने प्रयत्न करूनही अपयश आले, तर लोक राज्यकर्त्यांना माफ करतात; पण जर सत्ताधारीच जर संशयाच्या जाळ्यात अडकले असले तरी मात्र लोकांचा विश्वास उडतो. तिसरा धडा आहे, तो लोकशाहीचा. लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलनातून सत्तांतर होऊ शकते. श्रीलंकेत जी काही पोकळी निर्माण झाली, त्याचा फायदा उठवत लष्कर सत्ता ताब्यात घेऊ शकले असते, पण तसे त्याने केले नाही. या देशाचा लोकशाहीवरील विश्वास लक्षणीय आहे. तेथे सुधारणा घडविण्यासाठी व्यवस्थेत अवकाश ठेवलेला आहे. आता तेथील लोकप्रतिनिधीही सध्याच्या संकटाचा लोकशाहीची कास धरूनच मुकाबला करतील, अशी आशा आहे. भारतानेही अहिंसक सत्याग्रहाचा अवलंब करून एक उदाहरण जगापुढे ठेवले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भारताला या गोष्टीचा अभिमान वाटतो. श्रीलंकेतील घटनांचा बोध घेत भारतानेही आपला लोकशाहीवरील विश्वास वृद्धिंगत केला पाहिजे. आपण कशाचे तरी बळी ठरलो, असे मानणे हा पर्याय नाही. जे काही समोर आले, त्याला आपण जबाबदार आहोत, याचा स्वीकार केला, की मार्ग सापडायला मदत होते.

त्यासाठी प्रयत्न करता येतो. अशा प्रसंगी बाहेरून मदत मिळेल, यावर भिस्त ठेवण्यात अर्थ नसतो. खरे तर अशा वेळीच खरे मित्र कोण हे समजते. पाकिस्तान आणि नेपाळची स्थितीही काहीशी श्रीलंकेसारखीच आहे. तज्ज्ञांच्या मते भारतावर श्रीलंकेप्रमाणे संकट कोसळणार नाही. हा आश्वस्त करणारा विचार आहे. पण तरीही सावध राहायला हवे. आयात-निर्यात व्यापारातील भारताची तूट वाढत आहे. रुपयाची घसरण चालू आहे. परकी चलनाची गंगाजळीही कमी होत आहे. आपण चीनकडून जेवढी आयात करतो, त्याच्या फक्त एक पंचमांश एवढीच चीनला निर्यात करतो. त्यातच चीन भारताच्या सुरक्षेपुढे धोका निर्माण करत आहे. स्वनिर्मित जाळ्यात अडकण्याची चूक भारताने कधीही करू नये, अशी अपेक्षा या पार्श्वभूमीवर व्यक्त करावीशी वाटते.

(लेखक निवृत्त ॲडमिरल आहेत.)

Web Title: Mohan Raman Writes Srilanka Crisis Learn History

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..