भाष्य :  वृक्षवल्ली एकमेकांचे सोयरे 

मृणाल वनारसे 
शुक्रवार, 3 जुलै 2020

वनस्पतींना संवेदना असतात ही माहिती काही भारतीय नागरिकांना नवी नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी ही वस्तुस्थिती जगासमोर आणली त्याला आता शंभर वर्षे उलटून आहेत. आता संशोधन खूपच पुढे गेलंय. 

नेमेची येतो मग कोट्यवधी रोपे लावण्याचा पावसाळा! नागरिक आणि प्रशासन झाडे लावण्याच्या कामी नव्याने सज्ज होत आहेत. झाडांचेही समूह असतात. त्यांच्यात देवाणघेवाण असते, हे लक्षात घेऊन वृक्षारोपण व्हायला हवे. किती झाडे लावली, याच्या आकड्यापेक्षा ती लावल्याने परिसंस्थांना मदत झाली की नाही, हे महत्त्वाचे असते. 

वनस्पतींना संवेदना असतात ही माहिती काही भारतीय नागरिकांना नवी नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी ही वस्तुस्थिती जगासमोर आणली त्याला आता शंभर वर्षे उलटून आहेत. आता संशोधन खूपच पुढे गेलंय. वनस्पतींना केवळ संवेदना होतात एवढेच नव्हे तर वनस्पती त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती साठवू शकतात आणि एकमेकांत संदेशांची देवाणघेवाण करू शकतात, हेदेखील आता वनस्पतीशास्त्रज्ञ दाखवून देऊ शकले आहेत. मेंदू जसे काम शरीरासाठी करतो काही प्रमाणात तसेच काम वनस्पतींसाठी वनस्पतींची मुळे करतात, असेही काही प्रयोगांत दिसून आले आहे. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जो मार्ग दाखवला तिथपासून आतापर्यंत बरीच मजल आपण मारलेली असली तरी व्यवहारात या संशोधनाचे काय करायचे हे आपल्याला अजून फारसे उमजलेले नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"वनस्पतींना असलेल्या जाणीवा' या विषयाचा व्यवहारात उपयोग असे म्हणताना याकडे लक्ष वेधायचे आहे, की आपण जेव्हा खास "पर्यावरणासाठी' म्हणून काही प्रकल्प हाती घेत असतो, रोपे लावत असतो, बिया पसरत असतो तेव्हा या ज्ञानाचा कसा उपयोग करून घेता येईल? आपण जाणतो की माळरानावर, टेकड्यांवर, नदीकाठी असलेला झाडोरा (विरळ असला तरी) कुणी न लावता उगवून आलेला असतो. या उगवून येण्याची सुरवात कधी झालेली असू शकते? सांगता येत नाही. कित्येक झाडं (बारीक बुंध्याची असली तरी) वयानं आपल्या सगळ्यांपेक्षा खूप खूप मोठी असू शकतात. या झाडाची "पिले' आजूबाजूला वाढत असतात. आपल्याला ओळखू आले नाही तरी सुट्या सुट्या दिसणाऱ्या वृक्षवनस्पती समुहात बंध असतात. त्यांच्यात संदेशांची देवाणघेवाण चालते. संदेश वहनासाठी जमिनीखाली त्यांना बुरशी मदत करते. हवेतूनही त्यांची संदेशांची देवाणघेवाण चालते. कशा प्रकारचे संदेश झाडे एकमेकांना देत असतात? टोळधाड येत आहे, सावधान! अशा प्रकारचे संदेश. काहीवेळा तर एखादया "आजारी' झाडाला अन्नाची, पोषक द्रव्यांची रसद पुरविली जाते. असेही बंध झाडांमध्ये असतात. झाडे असे म्हणताना खरेतर त्यात झाडे, झुडूपे, वेली सारे काही आले. त्यांचे परागीभवन घडवून आणणाऱ्या कीटकांच्या सोबत त्यांचे नाते असते. त्यांचा एकमेकांत काही एक ताल असतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

आपले आपण उगवून आलेल्या, वर्षानुवर्षे टिकून असलेल्या वनस्पतीसमुहांमधे कोणत्या प्रकारचे नाते असते याविषयीचे संशोधन अजूनही पुरेश्‍या प्रमाणात झालेले नाही, उपलब्ध नाही. भारतात तर अशा प्रकारचे संशोधन झालेले फारसे आढळून येत नाही. अशा स्थितीत ही नागरिकांत याविषयी अनभिज्ञता किंवा मतमतांतरे असावी, ही त्यांची चूक नाही. परंतु झाड म्हणजे बेट नव्हे. एका झाडाचे दुसऱ्या झाडाशी नाते असते. जमिनीखालून आणि हवेतूनही त्यांच्यात संदेशांची देवाणघेवाण चालते, बुरशी त्यांना मदत  करते. एवढे ज्ञान तरी आता सर्वसामान्य होऊ शकते. अशा काही गृहीतकांच्या आधारे पुढील निरीक्षणे, प्रयोग करता येऊ शकतात. 

त्यामधे प्रयोगशाळांचा सहभाग जिथे आवश्‍यक आहे, तिथे तो मिळायला हवा, यासाठी शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था यांचा सहभाग हवा. परंतु हे सर्व होण्याआधी आपण सजग नागरिक, रोपे लावण्याआधी, बिया पसरण्याआधी नैसर्गिक झाडोऱ्याकडे बघण्याची आपली दृष्टी नक्कीच तयार करू शकतो. आता लागवडीसाठी आपण परदेशी झाडे सोडून देशी/स्थानिक झाडांचा आग्रह धरतो ही  अतिशय स्वागतार्ह गोष्ट. परंतु एवढं पुरेसं नाही. कारण आपल्याला नुसती झाडे लावायची नाहीत. केवळ होर्डिंगवर लावण्यासाठी हवे असेल तर एकही झाड न लावता जरी कोटी कोटीचे आकडे लिहिले तरी कमी नुकसान होईल. आपल्याला जर परीसंस्थांना मदत करायची असेल तर मुळात आधी त्या कशा चालतात याची माहिती करून घ्यायला हवी. 

एक पुण्यातली नेहेमीची टेकडी. तिच्याकडे या दृष्टीने पाहू जाता किती काय काय गोष्टी दिसतात! तिथे आज दिसणारा झाडोरा अनेक  स्थित्यन्तरांतून गेलेला आहे. लावलेल्या देशी आणि परदेशी झाडांच्या गर्दीत मूळचा झाडोरा अंग चोरून उभा आहे. उन्हाळ्याच्या  सुरवातीला गणेर किंवा सोनसावर नामे झाडाच्या ओंजळीएवढ्या पिवळ्याधम्मक फुलांनी कितीकांचे मन मोहवून घेतले. हजारोंनी  फोटो निघाले असतील. परंतु हेच गणेर नैसर्गिक स्थितीत कसे वाढते, कसे पसरते याविषयी आपल्याला खूप कमी माहिती आहे. 

टेकडीच्या माथ्यावर त्याची विस्तारित कुटुंबे आहेत. (टेकडीच्या पायथ्याशी गणेर फारसा आढळत नाही ही आणखी एक लक्षणीय गोष्ट.) वरवर सुट्या सुट्या दिसणाऱ्या त्या झाडांत काही संपर्क असेल का? आपण प्रश्न तर विचारून बघूया. असे प्रश्न विचारू लागलं म्हणजे अनेक नवे प्रश्न पडू लागतात आणि पहिल्याने हे कळतं की इथे काही करण्याआधी इथे काय चालू आहे ते नीट पहावं. या  नंतरची पायरी अशी असू शकते की जिथे जिथे आपल्याला अशी कुटुंबे दिसतात किंवा आणखी काही महत्वाच्या गोष्टी दिसतात त्यांना  संरक्षण. तिथे माणसाचा, गुरांचा, पाळीव प्राण्यांचा वावर कमी व्हावा यासाठी साधे दगडकाट्याचे संरक्षण. टेकडीवर देखील घळया  दिसतात. त्यांच्या बाजूने रान वेगळेच दिसते. या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन जर असे आसरे निर्माण करण्याचं काम नागरिक करू  शकले तर परिसंस्थांना मदत नक्कीच होईल. बिया किती पसरल्या किंवा रोपे किती लावली याचा आनंद आपल्या मनावर कोरला  गेलाय. आपण या गोष्टी करतो तेंव्हा त्या आपल्यासाठी किती आणि निसर्गासाठी किती याकडे नव्याने बघता यावं यासाठी हा  लेखनप्रपंच. झाडे लावू नयेत किंवा बिया पेरू नयेत असे नाही. ते करण्याआधी काय काय करावे याकडे लक्ष वेधणे असे उद्दिष्ट आहे. 

कल्पना करा. एक कुटुंब आहे. पडझडीला आलेलं...पण कुटुंब आहे. माणसं एकमेकाला धरून आहेत. एकमेकाच्या गरजा जाणणारी आहेत. त्यांना त्यांचं अन्नपाणी राखण्यासाठी एखादं संरक्षक कुंपण मिळतं. त्यांचं कुटुंब भक्कम होतं. अशी अनेक कुटुंबे भक्कम होतात. हळूहळू त्या कुटुंबांच्या मधलं देवाणघेवाणीचं जाळं तयार होत राहतं भक्कम होत राहतं. जंगल आकार घेत राहतं. त्यात काही नव्या  मित्रांची साथ मिळते. पण ती मोजकीच. यात किती कोटी झाडं लावली गेली हा विचार कुठे आहे? परिसंस्था भक्कम करणे हा विचार  आहे. आपल्या टेकड्या, आपली माळराने, आपले नदीकाठ ही कोंबून झाडे लावण्याची कुरणे नव्हेत. जरा संवेदनेने पहायला हवे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrunal vanarase writes article about environment

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: