एक तरी ओवी...

mrunalini-chitale
mrunalini-chitale

चालताचालता सुंदर दृश्‍य दिसलं की पावलं जशी हळूहळू पडू लागतात, तसंच वाचतानाही होतं. कधी भाषेचं सौंदर्य, तर कधी अर्थगर्भ शब्दरचना यामुळे आपण तीच ओळ परतपरत वाचत राहतो. ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना तर हा अनुभव वारंवार येतो. पुढील ओवीतील ‘अनाक्रोश क्षमा’ या शब्दापाशी मी अशीच रेंगाळत राहिले. ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे,

हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाण तेणे महिमा ज्ञानासि गा  (१३/३५२ ) ज्ञानी माणसाचं वर्णन करणाऱ्या या ओवीत किती सखोल अर्थ भरला आहे. समोरच्याला जो सहजपणे क्षमा करतो, स्वत:ला क्‍लेश होऊ न देता माफ करून टाकतो तो ज्ञानी. खरंच शक्‍य असते का अशा प्रकारची क्षमा? आपल्या आयुष्यात अनेक वेळा मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. समोरची व्यक्ती कधी शब्दाने वार करत असते, कधी कृतीतून. प्रत्येक वेळी प्रतिकार वा प्रतिवार करणे शक्‍य नसते. कधी वयाचा मान राखून, तर कधी समोरच्याचा हुद्दा लक्षात घेऊन आपण क्षमा करून टाकतो. पण ही क्षमा असते की निव्वळ शब्दांचे खेळ असतात? क्षमा केल्याचा अभिनिवेश असतो. आभास असतो. मग एखाद्या चुकार क्षणी गतस्मृतीमधील नकोशा आठवणी जाग्या होतात. मनाला घायाळ करून जातात. मन आक्रंदत राहतं. ‘अनाक्रोश क्षमा’ हे शब्द मनात पिंगा घालत असताना मला कधीतरी वाचलेली एक गोष्ट आठवली. एक वैफल्यग्रस्त उद्योगपती. बायकोची बेईमानी, मुलांचं मस्तवाल वागणं, पार्टनरने केलेली फसवणूक यामुळे रंजीस आलेला. मन:शांती मिळविण्यासाठी गुरूकडे जातो. सर्वांविषयीचा राग विसरून ध्यानधारणा करण्याचा सल्ला गुरू त्याला देतात, परंतु प्रयत्न करूनही त्याला मन:शांती लाभत नाही. तेव्हा चिडून तो गुरूंना म्हणतो, ‘‘मी सगळ्यांना माफ केलं. घरदार, ऐषआराम यावर लाथ मारून मी इथं आलो, तरीही मला मन:शांती मिळत नाही.’’ यावर गुरू हसून म्हणतात, ‘‘तुझी लाथ बरोबर बसलेली दिसत नाही.’’ एखाद्याला क्षमा करणं असो वा गतआयुष्य विसरणं असो, त्यामागे त्रागा असेल, राग-उद्वेगाची भावना असेल किंवा क्षमा करण्यात सहजभाव नसून, अहंभाव असेल तर क्षमा केली असं समजणं खरंच किती निरर्थक असतं. ‘एखाद्या व्यक्तीनं केलेल्या चुकीबद्दल, अपमानाबद्दल मी माफ करू शकते, पण विसरू शकत नाही,’ या उक्तीतील फोलपणा ही ओवी वाचताना मला लखकन जाणवला. ज्ञानेश्वरांना अपेक्षित असलेल्या, अनाक्रोश क्षमा करू शकणाऱ्या ज्ञानी माणसाच्या पासंगालाही आपण पुरू शकत नाही, परंतु एकेक ओवी अनुभवताना ज्ञानमंदिराकडे घेऊन जाणारं दार किंचितसं तरी किलकिलं होऊ शकतं असा आशावाद बाळगायला काय हरकत आहे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com