मर्द आम्ही मराठे खरे

मृणालिनी चितळे
Tuesday, 19 February 2019

आज १९ फेब्रुवारी! शिवजयंती! महाराजांचा पराक्रम आठवताना त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी प्राणांची बाजी लावून जिंकलेला एकेक गड डोळ्यांसमोर येतो. काळाच्या ओघात गडांचं महत्त्व लोप पावलं असलं तरी, कोणत्याही गडावर गेलं की मनात वीरश्रीची भावना आपसूक जागी होते. त्याची प्रचिती घ्यायची असेल तर रविवारी सकाळी सिंहगडावर जायला हवं. पहाटे तीन वाजल्यापासून सिंहगडाशी जन्मगाठ बांधून घेतलेले वीर त्याच्या पायथ्याशी अवतरू लागतात. गाड्या, स्कूटर, सायकलीवरून गर्दीचा ओघ सुरू होतो. कुणाला पुण्यापासून चालत जायचं असेल तर रात्री एक वाजता गडाच्या दिशेने चालत सुटणारे महाभाग भेटू शकतात.

पुण्याच्या रस्त्यावरून पहाटे पाचला माणसांनी खचाखच भरलेली बस दिसली की समजावं ती आता सिंहगडच्या रस्त्याला लागणार. दर रविवारी सिंहगडावर जाणारा ‘सिंहगड वारकरी संघ’ आहे. या संघाचं कुठे कार्यालय नाही की पदाधिकारी. तुम्ही नियमित गडावर जायला लागलात की त्याचे आपोआप सभासद होता. सभासद झालं की चढता-उतरताना ओळखीचा चेहरा दिसला की ‘लढ बापू’ म्हणून हाळी द्यायची, की झाली तुमची मेंबरशिप कन्फर्म्ड. आठवड्यातून एकदा तरी आपली पायधूळ झाडणाऱ्यांमध्ये सर्व स्तरांतील, सर्व वयोगटांतील वारकरी स्त्री-पुरुष आहेत. ऐंशी वर्षांचे चिरतरुण आहेत. ‘बायपास’च्या दिव्यातून गेलेले निधड्या छातीचे वीर आहेत. इथं येणाऱ्या एका मावळ्याचे गुडघे दुखायला लागले. गड उतरताना ताण येऊ नये म्हणून तो आता उलटे म्हणजे पायवाटेकडे पाठ करून उतरतो, तर एक मावळा मुंबईहून निघून रात्री बारापर्यंत पुण्यात पोचतो. भल्या पहाटे गड फत्ते करून परत मुंबई गाठतो. जे कट्टर गडवादी आहेत ते आपण किती वेळा गेलो याचं रेकॉर्ड ठेवतात. पाचशे/सातशे वेळा गड चढल्याचा पराक्रम पेढे वाटून साजरा करतात. एकदा एक जण भेलकांडत गड उतरताना दिसला. ‘वर जाऊन लावून आला की काय’ अशी शंका मनात आली, तोच कुणीतरी माहिती पुरवली की त्याचा आज पन्नासावा वाढदिवस, म्हणून त्यानं पाच वेळा खाली-वर करायचं ठरवलंय.

एका गडप्रेमीच्या मुलाचं लग्न नेमकं रविवारी होतं. ‘उद्या गडावर गेलात तर याद राखा’ अशी घरून तंबी मिळाली. हे गृहस्थ पहाटे तीनला घराबाहेर पडले, ते सहा वाजता घरी येऊन वेळेत लग्नाला हजर झाले. सिंहगडाची ही ओढ म्हणजे कुणाला वेड वाटतं, कुणाला व्यसन, तर कुणाला शुद्ध खुळचटपणा. कुणाला काहीही वाटो, पण गडप्रेमींच्या मनात असतं शिवरायांविषयीचं अथांग प्रेम, नरवीर तानाजीच्या बलिदानाविषयीचा अभिमान नि देवटाक्‍यांतील पाण्यातून झरणारी ऊर्जा; या साऱ्यातून लाभत असावं रोजची लढाई लढण्यासाठीचं नैतिक पाठबळ.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial