क्रिया... प्रतिक्रिया...!

मृणालिनी चितळे
मंगळवार, 12 मार्च 2019

रोज ११ वाजता कामावर जायचं म्हणजे भर गर्दीची वेळ. वाटेत लागणारी अरुंद गल्ली. तिथं असणारी एकेरी वाहतूक. त्यामधून शिताफीनं वाहन काढत असताना आपल्या ड्रायव्हिंगचं सारं कसब पणाला लागतं. त्यात कुणी वाहतुकीचा नियम तोडला की होणाऱ्या माझ्या या प्रतिक्रिया. कधी मी माझ्या गाडीची काच खाली करून रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असल्याचं सांगते. मग समोरचा जरासा... जरासाच ओशाळवाणा चेहरा करतो. त्याची दुचाकी वा चारचाकी एकदम रस्त्याच्या कडेला घेतो. कधीकधी कडेला असलेल्या खड्ड्यात जातो. मग माझ्यातील ‘भूत’दया जागी होते. माझ्या गाडीचे आरसे आत वळवून इंच इंच लढवत गाडी काढते.

रोज ११ वाजता कामावर जायचं म्हणजे भर गर्दीची वेळ. वाटेत लागणारी अरुंद गल्ली. तिथं असणारी एकेरी वाहतूक. त्यामधून शिताफीनं वाहन काढत असताना आपल्या ड्रायव्हिंगचं सारं कसब पणाला लागतं. त्यात कुणी वाहतुकीचा नियम तोडला की होणाऱ्या माझ्या या प्रतिक्रिया. कधी मी माझ्या गाडीची काच खाली करून रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असल्याचं सांगते. मग समोरचा जरासा... जरासाच ओशाळवाणा चेहरा करतो. त्याची दुचाकी वा चारचाकी एकदम रस्त्याच्या कडेला घेतो. कधीकधी कडेला असलेल्या खड्ड्यात जातो. मग माझ्यातील ‘भूत’दया जागी होते. माझ्या गाडीचे आरसे आत वळवून इंच इंच लढवत गाडी काढते. कधीकधी मात्र भली थोरली गाडी घुसविणाऱ्याला मी एकेरी वाहतुकीची जाणीव करून देते तेव्हा तो मुर्दाड चेहऱ्यानं सांगतो, ‘मला माहीत आहे.’ त्यानं पुढं न उच्चारलेलं वाक्‍य मला ऐकू येतं. ‘उगाच शहाणपणा शिकवू नका.’ मग मात्र माझ्या रागाचा पारा चढतो. अगदी ‘भ’ची बाराखडी नाही, तरी ‘यूजलेस’... ‘मूर्ख’... ‘नियम पाळायची अक्कल नाही’ असे वाकबाण त्याच्या दिशेनं सोडत राहते.

कधीकधी तर सभ्यतेचे आणि रहदारीचे सर्व नियम मोडून भरधाव एखाद्यानं गाडी घुसवली आणि माझ्या गाडीच्या समोर आणून उभी केली तर? तर मी गाडी बंद करून गाडीत ठेवलेलं पुस्तक काढते आणि वाचायला सुरवात करते. दोघांच्या पाठीमागे वाहनांची रांग लागते. हॉर्न वाजायला लागतात; परंतु मी ठाम राहते. शेवटी समोरचा गाडीवाला कशीबशी कण्हत, कुथत, ठेचकाळत गाडी मागे घेतो. एका संध्याकाळी निवांत बसलेली असताना एकेरी वाहतुकीसंबंधी ४/८ दिवसांनी घडणारे प्रसंग आठवले नि त्या पाठोपाठ जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानातील एक वाक्‍य. ‘आपली प्रत्येक क्रिया ही कुणाच्या तरी वागण्यावरची प्रतिक्रिया असते?’ माझं वागणं निरखून पाहताना कधी मी समर्थन करत गेले तर कधी विश्‍लेषण. कधी आपण बरोबर असल्याचं पटलं तर कधी आपल्या अपेक्षा जास्त असल्याचं लक्षात आलं. कधी माझं वागणं मला कोड्यात टाकणारं वाटलं तर कधी हास्यास्पद. एका क्षणी वाटलं याच अलिप्त भावानं कुटुंबांतर्गत होणारे वादविवाद, निर्माण होणारे ताणतणाव, अपेक्षांचे गोंधळ या संदर्भात आपण ज्या प्रतिक्रिया देत असतो, त्याकडे पाहता आलं तर? छोट्यामोठ्या प्रसंगात आपण इतकं का रागावतो, रुसतो तर कधी गहिवरतो आणि भरभरून प्रेम करतो, याकडेही निरभ्र नजरेनं पाहता आलं, आपल्या प्रतिक्रिया प्रतिसादात बदलत्या आल्या तर? तर कदाचित नात्यांच्या संदर्भात बसलेल्या काही गाठी, काही निरगाठी सुटायला मदत होऊ शकेल असं नाही वाटत?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial