एप्रिल फूल

mrunalini chitale
mrunalini chitale

‘आजी गं!’ नेहमीसारखी अथर्वची आरोळी कानावर आली. पुस्तकावरची नजर न काढता  मी शांतपणे विचारलं, "काय रे?' "अगं, मांजर तुझ्या स्वयंपाकघरात घुसून दूध पितंय.' "अरे, मग  हाकल ना' असं म्हणत, स्वत:च्या दुखऱ्या टाचेची पर्वा न करता मी स्वयंपाकघराच्या दिशेनं धाव घेतली. माझी तारांबळ बघून जागच्या जागी नाचत तो ओरडला, "एप्रिल फूल, दांडी गुल.'  त्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना मनात उसळलेला राग आणि टाचेतून उठलेली कळ आतल्या आत जिरली. आता मुलांचा "एप्रिल फूल'चा प्रयोग घरात सर्वांवर आठवडाभर तरी चालू राहणार. त्यांनी फसवायचं नि बाकीच्यांनी फसायचं. कधीकधी फसल्याचं नाटक करायचं. वर्षानुवर्षं चालू असलेली ही प्रथा. तिचा उगम केव्हा आणि कसा झाला याची मला माहिती नाही. कुणाला हवी असेल तर आपले "गुगल'गुरुजी पुरवू शकतील, परंतु त्या माहितीपेक्षा ही प्रथा जगभर शतकानुशतके चालू आहे हे अधिक महत्त्वाचं. थोर तत्त्ववेत्ते मार्क ट्‌वेन यांचं याबाबत एक मिश्‍कील विधान आहे. त्यांनी म्हटलं आहे, "एप्रिल फूल' या दिवसाचं वैशिष्ट्य असं, की या दिवशी वर्षातील उरलेल्या दिवशी आपण काय असतो याची जाणीव अधिक तीव्रतेने होते इतकंच. हे वाचलं आणि आत्तापर्यंत "एप्रिल फूल' साजरा करताना त्या दिवसासाठी लढविलेल्या क्‍लृप्त्या तर आठवल्याच, शिवाय उरलेल्या दिवसांत अधूनमधून अमलात आणलेल्या युक्‍त्या आठवल्या. कधी स्वत:ला वाचविण्यासाठी, तर कधी समोरच्याला गंडविण्यासाठी. जोवर असा हा बनवाबनवीचा खेळ खेळल्यामुळे कुणाचं नुकसान होणार नसेल, कुणी पैशात बुडणार नसेल वा कुणाच्या जिवावर उठणार नसेल, तोवर असे खेळ निरुपद्रवी असतात. "मी कधीच कुणाला "एप्रिल फूल' केलं नाही वा मी स्वत: झालो नाही,' असं सांगणारी व्यक्ती अजून जन्माला यायची आहे.

भल्याभल्यांना हा मोह आवरत नाही, तिथं आपल्यासारख्या पामरांची काय कथा. गंमत म्हणजे हा खेळ खेळताना कधी आपणच मूर्ख ठरत असतो. कधी स्वत:ला फसवत असतो आणि समोरचा फसला याचा आनंद मानत असतो. शाळेत जायचा कंटाळा आला म्हणून पोट दुखण्याचं केलेलं नाटक असो वा ॲसिडिटीच्या नावाखाली हादडलेलं आईस्क्रीम असो, हे आपणच आपल्याला केलेलं "एप्रिल फूल' तर असतं. बिनचूक वागण्याचा खटाटोप करणाऱ्यांना मात्र आपलं काही चुकलं किंवा आपल्याला कुणी बनवलं हे कबूल करणं फार अवघड जातं. मग स्वत:चा वेडेपणा आठवून स्वत:वर हसता येणं फारच लांब. खरंतर स्वत:वर हसता आलं, की आयुष्य कसं हसरं होऊन जातं. तेव्हा येणाऱ्या "एप्रिल फूल'साठी खूप साऱ्या शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com