esakal | अक्षर नातं
sakal

बोलून बातमी शोधा

mrunalini chitale

अक्षर नातं

sakal_logo
By
मृणालिनी चितळे

मी कॉलेजमध्ये असतानाची गोष्ट. एकदा आमच्या सरांनी सांगितलं म्हणून मी कॉलेजच्या नोटीस बोर्डवर माझ्या हस्ताक्षरात नोटीस लावली. खाली माझं नाव वगैरे काही नव्हतं; परंतु, माझ्या मित्र-मैत्रिणींनी ते अक्षर माझं आहे हे ताबडतोब ओळखलं आणि वर कॉमेंटही केली, ‘नोटीस लिहिण्यापुरतंसुद्धा सुवाच्य अक्षर काढता येत नसेल, तर दुसऱ्या कुणाला तरी लिहायला सांगावं ना.’ माझं ते तिरप्या वळणाचं, बारीक, गिचमिडं अक्षर मला आवडत होतं असं नाही, परंतु ते इतकं (कु)प्रसिद्ध असेल, असं वाटलं नव्हतं. मला आठवतं त्या काळात आम्ही खूप पत्रं लिहायचो. पत्र न फोडता पाकिटावरच्या अक्षरावरून ते कुणाचं आहे याचा अंदाज करताना मजा यायची. कुणाचं टपोरं सुटंसुटं अक्षर, कुणाचं घोटीव, ठाशीव. कुणाचं कागदावर शाईचा शिडकावा केल्यासारखं. कुणाचं गाण्याच्या उडत्या चालीसारखं, तर कुणाचं खर्जातून आवाज काढल्यासारखं.

अक्षरावरून एखाद्याचा स्वभाव जाणून घेण्याचं शास्त्र आहे, हे ऐकून मजा वाटली. अनुस्वार, काना-मात्रा, वेलांटीची वेलबुट्टी, विरामचिन्हं यावरून म्हणे कोण प्रेमळ, कोण स्वाभिमानी, कोण हेकट याचा अंदाज करता येतो. लग्नासाठी जन्मकुंडली बघण्यापेक्षा अशी अक्षरकुंडली जुळवली, तर लग्नं कदाचित जास्त टिकतील. पण कोण कुणाला सांगणार? आजकालची नवी पिढी तर बालवयापासून संगणकाशी बांधलेली. की-बोर्डवर पोसलेली. मोजकं तेवढं आणि त्रोटक लिहिणारी. मग हस्ताक्षरातून डोकावणारं ‘अक्षर नातं’ त्यांच्यापर्यंत पोचेल की नाही कुणास ठाऊक? अगदी अचानक अक्षर नात्याचा एक वेगळा आविष्कार युरेक बेकर यांची हकिगत ऐकताना आला. बेकर हे स्वत: पोलिश. जन्मानं ज्यू. नाझीच्या ‘घेटो कॅम्प’मध्ये राहायची वेळ त्यांच्यावर आली. दुसरं महायुद्ध संपल्यावर त्यांची सुटका झाली, तेव्हा ते सात-आठ वर्षांचे होते. त्या कॅम्पमध्ये ते कसे गेले, त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील, भावंडे होती की नाही...त्यांना काहीच आठवत नव्हतं. ते जर्मनीत लहानाचे मोठे झाले, शिकले. जर्मन कवी म्हणून प्रसिद्ध पावले. मोठेपणी अचानक एकदा पोलिश भाषेतील बडबडगीतांचं पुस्तक त्यांच्यासमोर आलं. त्या भाषेचा गंधही नसलेले बेकर ते अक्षर, त्यातील शब्द वाचायला लागले. बडबडगीतं म्हणायला लागले. त्यांचं बालपण त्यांच्या स्मृतिकोशातून हद्दपार झालं होतं. ती बडबडगीतं म्हणताना त्यांना त्यांचा भूतकाळ आठवला नाही. परंतु, लहानपणी कधीकाळी गिरवलेली अक्षरं सामोरी येताच त्या अक्षरांशी जडलेलं नातं जागं झालं. विस्मृतीत गेलेली रक्ताची नाती त्यांना कधी आठवली नाहीत, परंतु हाती गवसलेलं हे ‘अक्षर नातं’ आणि त्याची अपूर्वाई त्यांच्या आयुष्यात कायम सोबतीला राहिली.

loading image