स्व-अर्थ

मृणालिनी चितळे
Tuesday, 28 May 2019

मार्क ट्‌वेन या तत्त्ववेत्त्याच्या संदर्भातील घटना. एकदा गाडीनं जात असताना चिखलात पडलेलं कुत्र्याचं पिलू पाहून त्यांनी गाडी माघारी घेतली. पिलाला कोरड्या जागी नेऊन पुसलं, बिस्किट खायला दिलं. त्यांच्यासोबत असलेला मित्र त्यांना म्हणाला, ‘किती नि:स्वार्थ बुद्धीनं तू प्राणिमात्रांवर प्रेम करतोस.’ यावर ट्‌वेन उत्तरले, ‘मी त्या पिलासाठी जे काही केलं, ते त्याचं भलं व्हावं या उद्देशापेक्षाही अधिक मला स्वत:ला बरं वाटावं यासाठी केलं. त्याला तसंच सोडून गेलो असतो, तर माझंच मन मला खात राहिलं असतं. त्याच्यावर दया दाखविण्यात माझाही स्वार्थ होता.

आपल्या रोजच्या आयुष्यातील छोट्या-मोठ्या घटनांकडे सजगतेनं पाहिलं तर लक्षात येतं, की ‘निरपेक्ष’ असं विशेषण लावून आपण करत असलेल्या गोष्टींना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील स्वार्थ चिकटलेला असतो. एखाद्याला पैशांची मदत करताना, आपल्या मनात जी ‘फील गुड’ची भावना निर्माण होते, तो आपला स्वार्थ असतो. आपल्या मुलांवर प्रेम करणं नैसर्गिक भावना असली, तरी असंच प्रेम त्यांनी आपल्यावर करावं, ही अपेक्षा असते. परंतु, हे न ओळखता आपण अनेकदा आपल्या कृतीला नि:स्वार्थीपणाची झालर लावून ठेवतो. स्वार्थ म्हणजे ‘स्व’चा अर्थ- स्वत:च्या जगण्याचा अर्थ! एवढा किमान भाव समजून घेतला की नि:स्वार्थीपणाचं उदात्तीकरण आणि स्वार्थी शब्दांत दडलेला नकारात्मक भाव आपोआप गळून पडेल. अर्थात स्वत:च्या जगण्याचा अर्थ समजून घेणं सोपं नसतं. तो न समजल्यामुळे अनेक गोष्टींना आपण हेतू जोडत असतो. ‘मी तिच्यासाठी इतकं केलं, पण तिला किंमत नाही. त्याच्यासाठी एवढं केलं, पण त्याला जाणीव नाही.’ यातील ती, तो, ते, म्हणजे कधी आपली मुलंबाळं असतात, कधी मित्रमंडळी, कधी संस्था. ‘त्या वेळी मी केलं, ते मला वेळ होता म्हणून केलं. मला हौस होती म्हणून केलं. त्यातून मला आनंद मिळत होता म्हणून केलं. मी केलं नसतं तर मला रुखरुख लागून राहिली असती,’ हे कळायला लागतं, तेव्हा करण्यातील आनंद उमगायला लागतो, न करण्यातील बोच कमी होते आणि अपेक्षांचं ओझं हलकं होऊन जातं. ‘कधी कुणाकडून अपेक्षाच ठेवू नयेत, म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख भोगायला लागणार नाही,’ हे वाक्‍य ऐकायला खूप छान वाटतं. कुणा संत-महात्म्याला ते जमत असेलही; परंतु आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं अपेक्षा ठेवणार, फक्त अपेक्षांचा परीघ आपल्यापुरता ठेवणं महत्त्वाचं. आपण करतो ती कोणतीही गोष्ट, मग भले ती समाजसेवा असली, तरी ती आपल्या अंतर्मनाला सुखावत असते, आपला ‘स्व’ फुलवत असते हे समजून घेता आलं, तर अपेक्षांचं ओझं हलकं करायला आणि ‘स्व’चा अर्थ ओळखायला नक्कीच मदत होऊ शकते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial