पाण्यासाठी... पाण्यामुळे...

mrunalini chitale
mrunalini chitale

कोणत्याही लहान गावात गेलं, की पाणी आणण्यासाठी जाणाऱ्या बायका हमखास दृष्टीस पडतात. एक घागर डोक्‍यावर आणि एक कमरेवर घेऊन नदीकिनारी वा विहिरीवर जात-येत असतात. काही कामे कितीही कष्टाची असली, तरी त्याची जबाबदारी बाईचीच हे गणित वर्षानुवर्षे आपल्या मनात पक्कं असतं. पाणी आणण्यासाठीचे बायाबापड्यांचे कष्ट पाहिले की आजही घराघरांत नळ असण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही, ही जाणीव अस्वस्थ करून जाते. परंतु, हे कष्टप्रद काम कुणाचं विसाव्याचं ठिकाण होऊ शकतं, हे मात्र पुढील किस्सा कानावर येईपर्यंत मनात आलं नव्हतं. ही घटना आहे काही वर्षांपूर्वीची. घडली आहे गुजरातमधील एका दुर्गम भागात वसलेल्या छोट्याशा गावात. या गावातील महिलांना पाणी आणण्यासाठी रोज चार-पाच किलोमीटरची पायपीट करावी लागे. त्यांचा वेळ आणि कष्ट कमी व्हावेत, यासाठी ग्रामपंचायतीनं महत्प्रयासानं गावापर्यंत पाइपलाइन आणली. नळकोंडाळे बसवले आणि हातपंपही; परंतु काही दिवसांत त्यांची मोडतोड झाल्याचं लक्षात आलं. दुसऱ्या गावाहून माणसं बोलावून ते दुरुस्त करण्यात आले.
दरम्यानच्या काळात बायकांना पाण्यासाठी हेलपाटे घालायला लागणं अपरिहार्य होतं. पंप दुरुस्त झाले. महिना-दीड महिना व्यवस्थित चालले. परत पहिले पाढे पंचावन्न. असं दोन-तीन वेळा घडलं. कोण नतद्रष्ट व्यक्ती यामागे आहे, याचा छडा लावण्याचा गावकऱ्यांनी चंग बांधला. अखेरीस गावातली काही टारगट पोरं पंपाची मोडतोड करत असल्याचं लक्षात आलं. त्यांना दमात घेतल्यावर त्यांनी जे कारण सांगितलं ते त्याहून धक्कादायक होतं. गावातील काही तरुण स्त्रिया त्या पोरांना खाऊचं आमिष दाखवून असं करायला सांगत. कारण काय, तर पाणी आणण्याच्या निमित्तानं त्यांना रोज घराबाहेर पडायची संधी मिळे. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या चक्रातून बाहेर पडून मोकळा वारा अनुभवता येई आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणींना भेटून सुख-दु:खाच्या गोष्टी बोलता येत. गावात नळ आल्यामुळे त्यांच्या मोकळेपणावर बंधनं आली होती. थोडक्‍यात, पाणी आणण्यासाठी उपसाव्या लागणाऱ्या कष्टांची त्यांना तमा नव्हती. त्या निमित्तानं मिळणारी मोकळीक अधिक मोलाची वाटत होती. मुख्य म्हणजे पाणी आणण्याचा वेळ आणि कष्ट वाचत असले, तरी वाचलेला वेळ स्वत:साठी खर्च करायची मुभा त्यांना नव्हती. फक्त कष्टाचा आणि कामाचा प्रकार बदलत होता. उलट पाण्याच्या निमित्तानं मैत्रिणींच्या संगतीत मिळणारा विरंगुळा हरवला होता. पाणीप्रश्नाला अनेक कंगोरे आहेत; पण त्यातील हा कंगोरा आपल्याला तोंडात बोटं घालायला लावण्याइतका जबरदस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com