प्रियांका वाचवतील राज्यातील काँग्रेस?

उत्तर प्रदेशाखालोखाल ४८ खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राकडे त्यांचे लक्ष न जाते तर नवल. येथे काँग्रेस नव्याने बहरावी यासाठी प्रयत्न सुरू झाले असावेत.
Priyanka Gandhi
Priyanka GandhiSakal

आजकाल प्रियांका गांधी सक्रिय झाल्या आहेत. उत्तर प्रदेश सर्वाधिक खासदार निवडून देणारा प्रदेश. पक्षाची कोणतीही संघटनात्मक बांधणी नसताना प्रियांका तेथील भूमीवरून ‘महिला हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशी बांधणी करत आहेत. महिलांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. त्यांना आता स्वत:ला शोधायचे आहे. या महिलाशक्तीला महत्त्व देत ती केंद्रस्थानी आणण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. भाऊ राहुल गांधी टीकेचे धनी होत असताना त्या आता पक्षासाठी धडपडताना दिसताहेत.

उत्तर प्रदेशाखालोखाल ४८ खासदार निवडून देणाऱ्या महाराष्ट्राकडे त्यांचे लक्ष न जाते तर नवल. येथे काँग्रेस नव्याने बहरावी यासाठी प्रयत्न सुरू झाले असावेत. त्या गडचिरोलीसारख्या अविकसित नक्षलग्रस्त भागात आगामी आठवड्यात येत आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा ओसरल्याची भाकिते करत किंवा तो ओसरेल अशी खात्रीवजा अपेक्षा बाळगत राजकीय पक्षांनी आखणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवूनही महाराष्ट्रात भाजपला सत्ता स्थापन करता न आल्याने येथून नव्या समीकरणांना प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्राने दाखवलेल्या महाविकासाच्या आघाडीगंगेत हात धुऊन घेण्यासाठी केवळ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर ममता बॅनर्जी मुंबईत दाखल होत असतील, तर काँग्रेसने मागे राहून उपयोगाचे नाही. भाजपला रोखण्याच्या हालचाली महाराष्ट्रात सुरू होत्या तेेव्हा काँग्रेस फारशी उत्सुक नव्हती. सत्तेचे लाभ पदरी पाडून घेण्यासाठी आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून सरसावले, तेव्हा राहुल गांधींनी नाइलाजाने या सरकारला ‘मम’ म्हटले. आता ज्यांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नव्हते, त्यांनाच महाराष्ट्रात लक्ष्य करण्याची चळवळ सुरू होत असेल, तर त्यावर आक्षेप घेतले जाणे उचित होते. काँग्रेस एवढे तरी करू शकेल काय, असा प्रश्न नेतृत्वाची तऱ्हा पाहिली असता राजकीय वर्तुळाच्या मनात उमटत होता.

आघाडी सरकार तयार होत असताना पदरी पडलेले सर्वोच्च पद कोणते होते, तर विधानसभेचे अध्यक्षपद. ते काही महिने सांभाळून राजीनामा देत नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले. त्यानंतर वेगवेगळी कारणे पुढे करत आघाडी सरकारने ही निवडणूक टाळली आहे. विधानसभेतली मतांची टक्केवारी बघितली तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने १६ टक्क्यांच्या आसपास मते मिळवली, तर काँग्रेसने १५ टक्के. नेत्यांनी गंभीरपणे न घेतलेल्या या निवडणुकीतही काँग्रेसने ही कामगिरी केली होती. या कामगिरीची जाणीव देत पक्षात प्राण फुंकण्यासाठीच नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला असावा. काँग्रेसला खिजगणतीत न धरण्याचा ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी, शिवसेनेचा डाव जिव्हारी लागल्यानेच पक्षात जरा हालचाली सुरू झालेल्या दिसतात. प्रशांत किशोर हे मोदींना पर्याय देण्यासाठी सरसावलेले व्यूहरचनाकार काँग्रेस चालवण्याचे कंत्राटही मिळवू बघत होते. अहमद पटेलांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर डोळा ठेवत त्यांनी तशा हालचाली सुरू केल्या असे म्हणतात. असली उठाठेव अमान्य झाल्याने ते राहुल गांधींना पुढे आणण्याचे सोडून राष्ट्रीय पर्याय उभा करायला सरसावले आहेत. त्यांचा हा हस्तक्षेप न आवडल्याने काँग्रेसने नाराजी पोहोचवली आणि सेनानेते संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’, ‘मातोश्री’बरोबरच गांधी बहीण-भावांकडे चकरा मारू लागले आहेत. मुळात हे दोघे काही करू शकतील, असा कुणाला विश्वास नाही.

बंडखोरांचे मुद्दे

पक्षातले २३ बंडोबा कुठलीही स्वप्रकाशित राजकीय कारकीर्द नसलेले, तरीही त्यांचे म्हणणे बरोबरच आहे, अशी स्थिती आली असताना प्रियांका सक्रिय झाल्या आहेत. आज काँग्रेसचा जेमतेम एक खासदार चंद्रपुरात निवडून आला आहे. तेथेही उमेदवार बदलला नसता तर राज्यात काँग्रेस निरंक झाली असती. आता हे मागे टाकत पुढे जायचे आहे. भाजपचा भर ओसरत असेल तर ती जागा व्यापायची आहे. परिस्थिती पूर्वीसारखी नाही. ‘राष्ट्रवादी’ हा मुळात काँग्रेसमधून फुटून निघालेला पक्ष. कुशल नेत्यांची दमदार फळी असलेला. हा पक्ष भाजपपासून तुटलेल्या सेनेला नाचवतो आहे. छेद देणारी पावले उचलणे आवश्यक आहे. प्रियांका हे काम खरेच मनापासून करणार का? आईची चिकाटी त्यांच्यात आहे का हा प्रश्न. शिवाय मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या गडचिरोली दौऱ्याची प्रदेश कार्यालयाला माहिती नाही.

राज्यातील भवितव्य काय?

‘अच्छे दिन’चे लाभ पदरी न पडलेल्या युवकांनी कन्हैयाकुमारच्या भाषणाला पुण्यात गर्दी केली. ही घटना नोंद घेण्याजोगी खरीच: पण युवकांना नेमके काय हवेय हे कॉंग्रेस शोधू शकेल का? गडचिरोलीत १४ हजार मुलींना सायकली वाटल्या जाणार आहेत. सायकल हे केवळ वाहन नाही तर निवडून येण्याचे साधन आहे हे नितीशकुमार जाणतात. प्रियांकांचीही मोर्चेबांधणी तशीच आहे काय? खरे तर मतांच्या दृष्टीने वैराण झालेल्या उत्तर प्रदेशाऐवजी प्रियांकाताईंना राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश अशा संघटनात्मक बळ असलेल्या भागात फिरवले तर काँग्रेसला लाभ होईल. देशात २० टक्के मते मिळवणाऱ्या या पक्षाचे पुढे होणार तरी काय आहे? महाराष्ट्रापुरते बोलायचे तर आमच्या विधानसभेचे अध्यक्षपद आम्हाला द्या, असा आग्रहही नेतृत्वाला धरता आलेला नाही. सत्तेच्या सावलीत जीव रमवायची संधी नव्या सत्ताप्रयोगामुळे येथे राज्यात मिळाली खरी; पण याचा लाभ पक्षाला घेता येतो का, ते आता पाहायचे.

अचानक उमेदवार बदलला

संघपरिवाराच्या घरातून पळवून आणलेला नागपुरातील विधान परिषद निवडणुकीचा उमेदवार काँग्रेसने ऐनवेळी बदलला. या आयात उमेदवाराच्या आर्थिक निरुत्साहामुळे काँग्रेस नेते वैतागले होते म्हणे. ऐनवेळी बदल झाले, ते पक्षात एकजिनसीपणा नसल्याचे द्योतक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com