गिरणगावची ‘चित्तर’कथा

दीपा कदम
Wednesday, 11 March 2020

जगाच्या पाठीवर ‘गिरण्यांचं शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील गिरणी कामगारांचा लढा वेगवेगळी कला साकारणाऱ्या कलावंतांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. गिरणगाव, सुरू असलेल्या गिरण्या आणि शिल्लक राहिलेला गिरणी कामगार यांच्या चळवळीचा स्त्रोत जाणून घेऊन त्यांनी ‘ॲक्‍टिव्हिस्टा २०२०’ हे प्रदर्शन भरविलं आहे. आपण काय गमावलं, कमावलं याचा हिशेब मांडण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होऊ शकेल.

‘डाफरब्वॉय... बाबीन... जॉबर... स्नॅशहॅंड... एलसीसीपीसी...’ मुंबईतल्या लाखो गिरणी कामगारांसाठी या पदव्याच होत्या, त्यांची ती ओळख होती. हे शब्द मराठी की इंग्रजी याच्या मुळाशी जाण्याची गरजच त्यांना कधी पडली नाही. पण या शब्दांभोवतीच मुंबईतल्या गिरणी कामगारांचं भावविश्व विणलेलं होते. आता ही ओळख पुसली गेली आहे. या ओळखीचा अभिमान असणारे आता उतारवयाकडे लागले आहेत. गिरण्याच्या जागांवर असणाऱ्या चाळीही आता थकलेल्या वाटतात. ‘गिरण्यांच्या जागेवर मिळालेली घरं विकू नका...’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात गिरण्यांच्या घरांची लॉटरी काढल्यानंतर आवर्जून हे आवाहन केलं. हे अनेकार्थांनी दखल घेण्याजोगं आहे.

ताज्या घडामोडींसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इतिहासात स्थान मिळवायला एखादी घटना किती जुनी असावी लागते, याचे काही निकष असतात काय? पण जेव्हा तुमच्या नजरेसमोर ती माणसं, त्याचं जगणं आजही चालतंबोलतं आहे, तरीही ते इतिहासाचा भाग झालेला असणं हे खरंतर भीषण आहे.  मुंबईतल्या गिरणगावात असणाऱ्या चाळींमध्ये किंवा डिलाइल रोड, वरळी, नायगावच्या बीडीडी चाळींच्या घरांसमोरच्या काळोख्या जागेत हा इतिहास आजही कलंडलेला दिसतो. या जिवंत इतिहासाला कलेच्या माध्यमातून टिपण्याचं काम काही कलाकारांनी एकत्र येऊन केलं आहे. 

सध्या परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये ‘ॲक्‍टिव्हिस्टा २०२०’ हे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाचे संयोजक राजू सुतार हे कलावंत आणि चळवळ यांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता असल्याचं सांगत होते. प्रदर्शनात मांडली जाणारी चित्रं, छायाचित्रं, चित्रफिती आणि इन्स्टॉलेशन्स याविषयी ते भरभरून बोलत होते. त्यांनी सांगितलं, की वेगवेगळ्या प्रकारची कला साकार करणाऱ्या कलावंतांनी गिरणी कामगारांचा लढा समजून घेण्याचा प्रयत्न केला. गेले काही महिने त्यांनी गिरणगाव, सुरू असलेल्या गिरण्या, आणि शिल्लक राहिलेला गिरणी कामगार यांच्या चळवळीचा स्त्रोत समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर साकारलेलं हे प्रदर्शन आहे.

गिरण्या बंद पडल्या म्हणजे नेमकं काय झालं, तर लाखो लोक जे पिढ्यानपिढ्या या शहरात वास्तव्यास होते, त्यांनी मूळ गाव सोडून हे शहर आपलंसं केलं. त्यांची मुलं तर गिरणी कामगार म्हणूनच जन्माला आली. गिरण्यांच्या चाळींच्या आवारातच ती वाढली. गिरणी कामगार म्हणून जन्माला आलेली ही पिढी नंतर शेती किंवा इतर उद्योगांकडे कशी वळणार? गिरण्या बंद झाल्या तेव्हा चाळिशीच्या घरात असलेल्या पिढीचं बिथरणं स्वाभाविक होतं. गिरण्या बंद पडणं म्हणजे त्यांच्या हाताची ऊर्जा हिरावली जाणं होतं. त्याची नोंद कलेच्या माध्यमातून अधिक टोकदारपणे टिपण्याची आवश्‍यकता वाटत होती.

‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली...’ असं ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे लिहू शकले. गिरणीमध्ये काम करतानाचा त्यांचा अनुभव ते कवितेतून व्यक्त करू शकले. त्यामुळे अशाप्रकारे चळवळींचा अभ्यास करून कला साकारताना त्यात जिवंतपणा किती असेल? हे कृत्रिम नाही का वाटत? या प्रश्नावर सुतार म्हणतात, दृश्‍य स्वरुपात असणाऱ्या चळवळी संपुष्टात येत आहेत, हे वास्तव आपण स्वीकारायला पाहिजे. पूर्वी कलावंत चळवळींचा भाग असायचे. जे त्यांच्या कविता आणि शायरींमधून उमटायचं. कलावंतांमधल्या संवेदनशीलतेला वेगळ्या पद्धतीची आव्हानं देता यावीत, गिरणी कामगारांच्या चळवळीसारख्या विषयांपर्यंत पोहचावं यासाठी कृत्रिमरीत्या नव्हे, तर जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची ही वेळ आहे.

या प्रदर्शात स्नेहल एकबोटे यांनी काढलेली कृष्णधवल छायाचित्रं आहेत. जगाच्या पाठीवर ‘गिरण्यांचं शहर’ म्हणून ज्या मुंबईची ओळख होती, तो रंग या शहरावरून पुसला गेल्यानंतर शिल्लक राहिलेली मुंबई... गिरण्यांच्या जागेवर उभे राहिलेले टॉवर आणि या गिरण्यांच्या समाधीची निशाणी असणारी चिमणी या शहरावरचा अधिकार सांगत अजूनही ताठ मानेनं उभी आहे. गिरण्यांच्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या टॉवरमधून खाली पाहणाऱ्यांच्या मनात गिरण्यांच्या चाळींवरची कौलं पाहून त्यांना या चाळी म्हणजे शहरावरची ठिगळं वाटत असतील? गिरण्यांच्या जमिनींवर उभी राहिलेली पंचतारांकित हॉटेल, मॉल, या चाळींना टुकटुक करून खिजवत असतील? ही छायाचित्रं पाहिल्यावर मनाला हे प्रश्न पडतात. या चाळींमध्ये राहणाऱ्यांनी या शहराला उद्योगनगरीचं चैतन्य दिलंय, हे त्यांच्या कदाचित खिजगणतीतही नसेल.

मुंबईत कापसाचा व्यापार १७५०पासून होता. १८६०मध्ये दिनशॉ मानकजी पेटिट यांनी ५० पेक्षा जास्त भागधारकांना घेऊन मुंबईत पहिली कापड गिरणी उभारली. केवळ चार लाख ७३ हजार ८४५ रुपये इतकं भांडवल पहिली कापडगिरणी उभारताना लागलं होतं. ताडदेव, भायखळा, माझगाव, लालबाग, परळ या भागातील मोकळ्या जागांवर दगडी तटबंदी बांधून गिरण्या उभारण्याची स्पर्धा सुरू झाली. तब्बल ५२ गिरण्या १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत उभ्या राहिल्या. घरातल्या पुरुषांसोबतच बाया, मुलं गिरण्यांमधील लहान- मोठी कामं करण्यामध्ये गुंतलेली असत. गिरण्यांपासून जवळच घरं असल्यानं कामगारांच्या झुंडीच्या झुंडी पायी चालत गिरण्यांमध्ये जात. अख्खं कुटुंब गिरणीमध्येच राबत असल्याने गिरण्यांच्या आवारातच आणि आजूबाजूलाही चाळी बांधण्यात आल्या. ज्यात कामगारांनी संसार थाटले. गिरणी आणि चाळीच्या अवतीभोवती कामगारांचं सांस्कृतिक जग बहरलं. आपल्या हक्कांविषयी जागरूक असल्यानं हा वर्ग कम्युनिस्ट चळवळीशी इमान राखू लागला. त्यानंतर गिरणी कामगार चळवळीची झालेली वाताहत हा इतिहास काही जुना नाही.

समकालीन इतिहासही डोळे उघडे ठेवून जाणून घेणं आवश्‍यक असतं. त्या इतिहासातूनच आपणास हिशेब लावता येतो, की आपण काय कमावलं आणि काय गमावलं? या प्रदर्शनात वैशाली ओक हिनं भल्यामोठ्या भाकरीच्या चतकोरापेक्षाही कमी जागेत घरासाठी गर्दी केलेल्या कामगारांच्या दहीहंडीचं मांडणशिल्प उभारलं आहे. गिरणगावची चित्तरकथाच ती. भाकरीचा तेवढासा तुकडा निवांत खाण्यासाठी, त्या तुकड्याएवढी तरी जागा आज ना उद्या मिळेल या आशेवर लाखो कामगार आजही जगताहेत. असे पावणेदोन लाख गिरणी कामगार आहेत येथे. आणि सरकारचं नियोजन आहे पंधरा हजार घरं देण्याचं. याचाच अर्थ एक लाख साठ हजार गिरणी कामगारांना, त्या अखेरच्या मुगल बादशहा बहादूरशहा जफर याच्याप्रमाणेच ‘दो गज जमीन भी न मिली कू-ए-यार में’ असंच म्हणण्याची वेळ येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article deepa kadam on girangav