गरज नजरबदलाची!

Labour
Labour

विविध प्रकारच्या सेवा पुरविणारे मुंबईतील स्थलांतरित कष्टकरी. कोरोनाची साथ पसरल्यानंतर ते आपापल्या गावाकडे परतू लागले आहेत. त्यांना आता त्यांच्या गावातच ‘परदेशी’ ठरवलं जातंय. या स्थलांतरितांच्या नशिबात क्‍लोरिन पाण्याची फवारणी, शेकडो किलोमीटरची चाल आणि गावांत गेल्यानंतर अस्पृश्‍यतेची वागणूक हेच आहे. आगीतून फुफाट्यात जाणं म्हणतात ते हेच. 

मरिन लाइन्सच्या चौकात सिग्नलला टॅक्‍सी थांबताच ती टवटवीत गुलाब घेऊन कडेवरच्या लेकरासह धावतच येत असे. परवा त्या चौकात गाडी थांबल्यावर डोकावून पाहिलं. ती कुठेच दिसेना. दिसणार तरी कशी? मुंबईच थांबलेली आहे. अशावेळी सिग्नल-थांब्यांवरचे हे मिनीबाजार ओस पडले, यात नवल नाही.  राज्यातील कोरोना-कर्फ्यूमुळे या थांब्यांवरची फुलांपासून पुस्तकांपर्यंतच्या वस्तूंची विक्री करणा-यांची साखळी तुटली. इथलं सेवाक्षेत्र  बंद पडलं आहे. पूर्वी नेहमीचा इस्त्रीवाला घराच्या खिडकीतून दिसायचा. इस्त्रीचे कपडे पटकन आणून द्यायचा. दुकान आठ दिवस बंद दिसल्याने फोन केला, तर तो म्हणाला, ‘गांव जानेका जुगाड कर रहा हूं.. पता नही कब आऊंगा.’

बोहरा गल्लीतील बिहारी भेळवाल्याने त्याच्या मुलाला अलीकडेच धंदा शिकवायला सुरूवात केली होती. एकदा भेळ खिलवत असताना तो सांगत होता, ‘गांव में स्कूल तो जाता नही. यहां कुछ तो सिखेगा.’ तिथल्याच एका चाळीबाहेर ते दोघे झोपायचे. त्याचा भेळीचा धंदा जोरदार चालायचा. संध्याकाळच्या वेळी त्याच्याकडे १५ मिनिटांचं वेटिंग असायचं. आता तोही मुलाला घेऊन गावाकडे निघून गेलाय. 

मुंबईत रस्त्यावर खायचं तर वडापाव. हॉटेलात जाऊन खायचं तर इडली वडा, मसाला डोसा हे दाक्षिणात्य पदार्थ. ‘उडप्यांची ही हॉटेलं बंद झाली तरी निम्म्या मुंबईकरांचा भूकबळी जाईल’, असं गमतीनं म्हटलं जायचं. या उडप्यांच्या हॉटेलांत आपल्याला मराठी भाषक वा उत्तरेकडची पोरं कधीच कामाला दिसणार नाहीत. ती उडपीतलीच. रात्रीच्या वेळी ही मंडळी तेथेच हॉटेलच्या निवाऱ्याला झोपायची. कोरोना-कर्फ्यूमुळे हॉटेलं बंद झाली आणि मालकांनी त्यांना वाटेला लावलं.

पण या मंडळींची जीवनेच्छा दुर्दम्य. १५ दिवसांपूर्वी शफीकडे कपडे शिवायला टाकले होते. आता त्याचं काय म्हणून फोन केला तर तो मुजफ्फरनगरमध्ये पोचलाही होता. सांगत होता, ‘दुकान को कितने दिन ताला लगाऊंगा,  दुकान खोलता हूं तो चालवाले और पुलिस दोनो ही चिल्लाते है. सब ठंडा होएगा तो वापिस आउंगा. आप चिंता मत किजिए.’ 

या शहराच्या अर्थव्यवस्थेच्या पायाशी हे असेच सेवाकरी आहेत. त्यातील काहींना भलेही कोणी परप्रांतीय वा भय्ये वा लुंगीवाले म्हणून हेटाळत असोत. मुळातच हे शहर बहुढंगी आणि विविधरंगी असावं, यासाठी पूर्वीपासून जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. व्यापाऱ्यांपासून मजुरांपर्यंत या शहराला कुणाचीच कमतरता भासू नये, यासाठी प्रारंभी ब्रिटिशांनी मोठे प्रयत्न केले होते. १६९०पासून त्यासाठी विविध क्‍लृप्त्या रचल्या होत्या. व्यापाऱ्यांना या शहरात सुरक्षित वाटावं, यासाठी शहराला तटबंदी घालण्यात आली. या व्यापाऱ्यांच्या मागोमाग मजुरांचे तांडे दाखल झाले.१७४८मध्ये तर या शहरातली वस्ती वाढवण्यासाठी ‘कोर्ट ऑफ डायरेक्‍टर्स’ला निवेदनं देण्यात आली होती. येथे येणाऱ्यांकडून पाच वर्षे कर घेण्यात येत नव्हता. देशातलं मुंबई हे असं एकमेव शहर होतं, की जिथे प्रत्येक व्यक्तिला आपाल्या धर्माप्रमाणे आचरणाची मुभा होती.

परिणामी व्यापारी शहराकडं आकृष्ट झाले. स्वाभाविकच मजूरवर्ग वाढला. मुंबईच्या जगण्याशी एकरूप झालेला हा वर्ग आहे. मुंबईचा वेग कायम ठेवण्यात या ‘भैय्यांचा’ मोठा वाटा आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येणारे स्थलांतरित मजूर मागच्या दहा वर्षाच्या काळात पुणे,नाशिक,नागपूर,औरंगाबादकडे वळू लागले आहेत. मात्र आजही त्यांची पहिली पसंती मुंबईच आहे. २०११च्या जनगणनेनुसार राज्यात स्थलांतरितांचं प्रमाण ५७ लाख आहे. त्यापैकी मुंबईत परराज्यांतून आलेल्यांची संख्या ४६लाख आहे. त्यातले १८.१९ लाख उत्तर प्रदेशातून आले आहेत. टॅक्‍सीचालक, भाजीविक्रेते, घरोघरी जाऊन मासेविक्री करणारे, शिंपी, रंगकाम करणारे, गिलावा लावणारे, हातगाडी ओढणारे, प्लंबर, इलेक्‍ट्रिशियन, सुरक्षा रक्षकांपासून भेळपुरी-पाणीपुरी विक्रेते ते सामोसा तळणाऱ्यांपर्यंत पडेल ती कामे करणाऱ्यांत स्थलांतरितांचा हात धरणं स्थानिकांना जमलेलं नाही, हे मान्य करावे लागेल. राज्यांतर्गतही मुंबईकडे स्थलांतराचं प्रमाण वाढतंय. जनगणनेनुसार येथील बेघरांची संख्या ५८ हजारांच्या घरात आहे. त्यात अर्थातच या स्थलांतरितांचं प्रमाण अधिक.

कोरोना साथीमुळे आता उलटं स्थलांतर सुरू झालंय. या जनांचा प्रवाहो गावांच्या दिशेने चालला आहे. त्यांच्या मनात भय केवळ कोरोनाचंच नाही. उलट अनेकांच्या मनात ते नाहीच. मेलेली कोंबडी आगीला घाबरत नाही, असं त्यांचं झालेलं आहे. त्यामुळेच मिळेल त्या मार्गाने, प्रसंगी कंटेनरांत बसून, तेही नाही मिळालं तर पायीपायी त्यांची वारी गावांच्या दिशेने जात आहे. समाज-संसर्गाचं भय त्यामुळे वाढतं आहे. पण त्यांना चिंता आहे ती पोट भरण्याची. हे शहर सहसा कुणाला उपाशी झोपू देत नाही, असं म्हटलं जातं. पण आता तीही एक दंतकथाच ठरणार असं चित्र आहे. 

कोरोनाची साथ स्थलांतरितांसोबत पसरू नये यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद कालच केलीय. त्यांच्या निवाऱ्याची आणि खाण्या-पिण्याची सोय करत शहाणपणाचं पाऊल टाकलं आहे. बेघरांसाठी  २६२ठिकाणी निवा-याची सोय करण्यात आली आहे. त्यात जवळपास ७० हजारांची निवास व्यवस्था आहे. पण आता त्यांना इथं थांबायचं नाही असं दिसतं. एका अर्थाने हेही आता परदेशी ठरले आहेत.

मुंबईत ते परप्रांतीय होते. आता गावांनी त्यांना परदेशी ठरवलंय. कोरोनाची साथ पसरल्यानंतर अनेक भारतीय भारतात परतू लागले. हेच या वर्गाच्या बाबतीतही घडतं आहे. फरक एवढाच, की परदेशातून आलेल्यांची इथं ब-यापैकी ठेप ठेवली जाते. या स्थलांतरितांच्या नशिबात क्‍लोरिन पाण्याची फवारणी, शेकडो किलोमीटरची चाल आणि गावांत गेल्यानंतर अस्पृश्‍यतेची वागणूक हेच आहे. आगीतून फुफाट्यात जाणं म्हणतात ते हेच ते. 

ही साथ ओसरल्यानंतर यातले अनेक जण परत येणार हे नक्की. पण हेही तेवढंच पक्कं आहे, की या सगळ्या कोरोना कहरामुळे मुंबईतल्या निम्नस्तरीय सेवाक्षेत्राची मोठी हानी होणार आहे. यातून मुंबईतल्या परप्रांतीयांच्या प्रश्नाकडं वेगळ्या नजरेनं, या शहराची एक गरज म्हणून आपल्याला पाहावं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com