निवडीच्या परंपरेतील नवता...

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 14 मार्च 2020

पूर्वी काँग्रेसचे श्रेष्ठी प्यादी हलवत, आता भाजपचे. परंपरेत नवता येते ती एवढीच. काँग्रेसच्या जागी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आदित्य ठाकरे, बाकी सगळे तसेच असते. शिवसेनेने राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी यांच्या केलेल्या निवडीतून हीच बाब पुन्हा स्पष्ट झाली.

पूर्वी काँग्रेसचे श्रेष्ठी प्यादी हलवत, आता भाजपचे. परंपरेत नवता येते ती एवढीच. काँग्रेसच्या जागी भाजप आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आदित्य ठाकरे, बाकी सगळे तसेच असते. शिवसेनेने राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदी यांच्या केलेल्या निवडीतून हीच बाब पुन्हा स्पष्ट झाली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मराठी माणसाच्या हक्‍काची लढाई लढण्यासाठी सोफास्टिकेटेड चेहरा दिल्लीत पाठवण्याचा पायंडा शिवसेनेने पाळला, लोकसभेत पराभव झाल्यावर मागच्या दाराने हव्या त्या माणसाला खासदार करण्याचे व्रत भाजपने अमलात आणले अन्‌ बेटकुळ्या दाखवून शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसपुढे शरणागती पत्करण्याचा नेहमीचा मार्ग काँग्रेसने चोखाळला. राज्यसभेच्या सात जागांसाठीचे सात उमेदवार निश्‍चित झाल्यानंतर महाराष्ट्राबद्दलची टिप्पणी करावी लागेल ती अशी. बिनविरोध निवडणुका होतील असे वाटत होतेच. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवड सन्मानाची, ती बिनविरोध झाली हे योग्यच. 

विषय आहे तो राजकीय पक्ष मागील दाराने सोयीचे चेहरे राज्यसभेत पाठवतात हा. शिवसेना आज राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळणारा पक्ष, त्यामुळे पहिली चिकित्सा शिवसेनेची. मराठी माणसाच्या हक्‍कांसाठी झटणे, भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणे, हे शिवसेनेचे ध्येय. त्यांच्या आजवरच्या वाटचालीत किती मराठी माणसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असा प्रश्‍न विचारायची सोय नाही. मराठी माणसासाठी सुरू असलेल्या ‘सेनायज्ञा’ची राष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जावी, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आस, त्यासाठी ते राज्यसभेत फर्डे इंग्रजी बोलणाऱ्यांना आवर्जून पाठवत. आजोबांनी निर्माण केलेली ही परंपरा नातू पुढे नेतो आहे. त्यातली नवता आहे ती आपल्या वर्तुळातील पावन करण्याची. प्रियांका चतुर्वेदी काँग्रेसमध्येच राज्यसभेची, लोकसभेची स्वप्ने पाहात. तेथे फुटकळ वाद झाल्याने त्या शिवसेनेत आल्या.

राजकारणातील घोडदौडीसाठी नेमक्‍या याच काळात सज्ज झालेल्या आदित्य ठाकरे यांचा विश्‍वास त्यांनी संपादन केला. ‘पुढची दोन वर्षे केवळ काम करा, पदाची लालसा व्यक्‍तही करू नका’ अशा अटींवर त्यांना पक्षाने प्रवक्‍ते केले, असे जुने शिवसैनिक सांगत. पण, उगवतीच्या सूर्याला महत्त्व देण्याच्या जगरहाटीनुसार आदित्य यांचे मत महत्त्वाचे ठरले. प्रियांका खासदार झाल्या. प्रियांका चतुर्वेदींना संधी देऊन महिलांना न्याय दिल्याचे युवा सेनेकडून सांगितले जाते आहे. प्रचंड लोकसंग्रह असलेले, जात सोयीची नसताना औरंगाबादेतून सातत्याने निवडून येणारे; पण या वेळी पराभूत झालेले चंद्रकांत खैरे शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय. ‘‘आदित्य साहेबांनी इंग्रजी येत नाही म्हणून मला डावलले असावे,’’ असे जाहीर विधान त्यांनी करणे हे शिवसेनेतील असंतोषाचे प्रतीक तर नव्हे? आदित्य ठाकरे यांच्याबद्दल महाविकास आघाडीतील बहुतेक सगळेच प्रेमाने बोलत असताना त्यांच्या मर्जीतले उमेदवार, त्यांच्या मतदारसंघात पर्यटनस्थळासाठी शंभर कोटी असे निर्णय का घेत आहेत, माहीत नाही. घराणेशाही वारसाहक्‍काने चालत तर येते, पण त्याबद्दलची नाराजी वाढली, की होत्याचे नव्हते होते. आदित्य हे काँग्रेसच्या पतनाचा अभ्यास करतील, तर ते त्यांच्या फायद्याचे ठरू शकेल. आदित्य ठाकरेंप्रमाणेच प्रियांका संयत वागतात; पण संसदीय जबाबदारी कशी निभावतात ते आता कळेल. घोडामैदान समोरच आहे.

पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस भारी 
फौजिया खान या राजकारणातील जुन्याजाणत्या महिलेची राज्यसभेवर निवड झाली आहे. परभणीसारख्या मागास भागात राहून त्यांनी अल्पसंख्याक समाजाचा चेहरा अशी स्वतःची ओळख निर्माण केली. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्याबाबत अत्यंत सावध पावले टाकली. महाविकास आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशाऱ्याने चालत असल्याचा समज रूढ होतो आहे. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी दुसरा उमेदवार काँग्रेसचा असावा, असा प्रस्ताव शिवसेनेकडून पुढे केला गेला. या चर्चेनुसार काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळावी अशी आखणी होती. अतिरिक्‍त मते शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’ची होती; पण ‘राष्ट्रवादी’ने प्रस्तावावर आकांडतांडव न करता तो हलकेच हाणून पाडला.

मध्य प्रदेशात झटका बसल्याने महाराष्ट्रात बेटकुळ्या दाखवायच्या काय, यावर निर्णय घेण्यास काँग्रेसला उसंत मिळाली नसावी. एकुणात, पुन्हा ‘राष्ट्रवादी’ भारी ठरली. काँग्रेसने तरुण बिगरमराठा चेहरा राजीव सातव यांच्या रूपाने पुढे केला. राहुल गांधी यांचे नेतृत्व अडचणीत असताना त्यांचे सहकारी गणले जाणारे सातव छाप पाडू शकतील काय, ते पाहायचे.

राहता राहिला प्रश्‍न भाजपचा. लोकसभेतल्या लाटेची पुनरावृत्ती होईल, या आत्मविश्‍वासाने साताऱ्यात उदयनराजेंना जेमतेम चार महिन्यांनी पुन्हा पोटनिवडणुकीत उतरवले गेले. हरलो तरी सन्मानाने वागवण्याची हमी छत्रपतींच्या वंशजांनी थेट नरेंद्र मोदींकडून घेतली होती म्हणतात. ते राज्यसभेत पोहोचले, त्यांच्यामुळे मराठा मते मिळतील अशी अटकळ. भाजपला दलित समाजात पाय रोवणारा चेहरा अजून तयार करता न आल्याने रामदास आठवलेंची गरज होतीच, त्यांनाही पुन्हा संधी मिळाली. एकच जागा उरली होती, ती डॉ. भगवान कराड या निष्ठावंतांना दिली गेली. एकनाथ खडसेंचे नाव मागे पडले. त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येईल असे म्हणतात. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजप प्रयत्न करेल हे निश्‍चित; पण येथे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा बडा नेता नाही; अजितदादांचा प्रयोग फसला. केव्हातरी नव्याने दिल्ली पट मांडेलही. पूर्वी काँग्रेसचे श्रेष्ठी प्यादी हलवत, आता भाजपचे. परंपरेत नवता येते ती एवढीच. काँग्रेसच्या जागी भाजप, बाळासाहेबांच्या जागी आदित्य. बाकी सगळे तसेच असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mrunalini naniwadekar