कात टाकतोय कामाठीपुरा... 

दीपा कदम deepakadam3@gmail.com
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

कामाठीपुऱ्याची स्वतंत्र ओळखही आहे आणि ती दोनशे वर्षांहून जुनी आहे. मुंबईत खणखणीतपणे स्वत:चं सौंदर्य मिरवणाऱ्या अनेक इमारती या कामाठीपुऱ्यातून पुढे आलेल्या कंत्राटदारांनीच बांधल्या आहेत. नव्या सरकारनं कामाठीपुऱ्याचं ‘क्‍लस्टर डेव्हलपमेंट’ करण्याची घोषणा केल्यानं हा परिसर कात टाकेल अशी आशा आहे.

एका कॉर्पोरेशनमध्ये उपव्यवस्थापक असलेल्या वैशाली मेट्टींना त्यांच्या वरिष्ठांनी ‘घराचा पत्ता बदलता येईल काय?’ अशी विचारणा केली. वैशाली मेट्टींनी त्याला ठामपणे नकार दिला. ‘मी कामाठीपुऱ्यात राहते. तिथंच माझा जन्म झालाय. कामाठीपुऱ्याची तुम्हाला जी ओळख आहे, त्यापेक्षा तो वेगळा आहे आणि मला तो प्रिय आहे. माझ्या पूर्वजांनी हे शहर उभारलंय. ते कामाठीपुऱ्यात राहत होते. मुंबईची ओळख असणाऱ्या या इमारती आम्ही कामाठींनीच बांधल्यात,’’ हे सांगताना वैशालींच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कामाठीपुरा... त्याची स्वतंत्र ओळख करून द्यावी लागत नाही. मुंबईतली ‘अधिकृत’ वेश्‍यावस्ती म्हणून कामाठीपुरा ओळखला जातो. यामुळेच कामाठीपुरा असा निवासी पत्ता सांगण्याचं अनेक जण टाळतात. हे नाव पुसलं जावं असं अनेकांना वाटतं. मुंबईच्या उंच-उभ्या विकासाची स्पर्धा सुरू असताना दक्षिण मुंबईतला हा भाग मात्र अद्याप खुरटलेल्या अवस्थेत आहे, तोदेखील यामुळेच. दक्षिण मुंबईत जमिनीचे भाव, घरभाडी बेसुमार असताना कामाठीपुऱ्यात घरांच्या किमतींना फार उचल नाही. चकचकीत दक्षिण मुंबईवरचा काळा डाग असल्यासारखा कामाठीपुरा दुर्लक्षित राहिला आहे. खरे तर कामाठीपुऱ्याची स्वतंत्र ओळखही आहे आणि ती दोनशे वर्षांहून जुनी आहे. चिकाटीनं काम करणारे कामाठी. त्यांची वस्ती ती कामाठीपुरा. अठराव्या शतकात आंध्रातून आलेल्या तेलुगू भाषक मजुरांच्या कामाच्या चिकाटीमुळे त्यांना ‘कामाठी’ ही ओळख मिळाली. मुंबईच्या किनारपट्टीला १७५७ मध्ये तटबंदीचं काम करण्यासाठी या समाजातील तरुणांची भरती कस्टमनं केल्याची नोंद आहे. मुंबईत या भागात खाजण जमीन होती. तिथं हे मजूर झोपड्या बांधून राहू लागले. इथल्या दलदलीवर १८०४ मध्ये भराव टाकून पक्‍की घरं बांधण्यात आली. वैशाली मेट्टींच्या ज्या कामाठीपुऱ्यातल्या घरात भेट झाली, ती बिल्डिंग त्यांनी १८६३ मध्ये विकत घेतली, त्यापूर्वी ती बांधलेली आहे. १८८१च्या जनगणनेनुसार मुंबईत कामाठी लोकांची संख्या ६७८४ होती. कामाठीपुऱ्यातल्याच तरुणांच्या पुढच्या पिढीनं मुंबईच्या उभारणीत मोलाची भर टाकली. ऐतिहासिक वारसा म्हणून ज्या इमारतींची ओळख आहे त्यात राजाबाई टॉवर, जुने सचिवालय आणि उच्च न्यायालयाची इमारत, महापालिकेची इमारत अशा अनेक इमारतींच्या बांधकामाची कंत्राटे कामाठ्यांनाच मिळाली होती. लोहमार्ग, रस्ते बांधण्यापासून ब्रिटिश वास्तुविशारदानं कागदावर रेखाटलेली इमारत जशीच्या तशी उभी करण्याचं त्यांचं कौशल्य वादातीत होतं. मुंबईत आजही खणखणीतपणे स्वत:चं सौंदर्य मिरवणाऱ्या या इमारती कामाठीपुऱ्यातूनच पुढे आलेल्या बांधकाम कंत्राटदारांनीच बांधल्यात. कामाठ्यांनी बांधलेल्या इमारती, समाजसेवा आणि संयुक्‍त महाराष्ट्रासाठी दिलेला लढा याविषयी मनोहर कदम यांनी ‘तेलुगू भाषिकांचे मुंबईतील योगदान’ हे पुस्तक लिहिलंय. कामाठीपुऱ्याच्या नेहमीच्या ओळखीमागचा चेहरा त्यात पाहता येतो. नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’तून दिसणाऱ्या कामाठीपुऱ्याला छेद देणारा असा हा चेहरा आहे. 

बाजारांचे स्वतंत्र वार, अनोख्या वेळा
गेल्या काही वर्षांत येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांचं प्रमाण कमी झाले आहे. एक हजारापेक्षाही कमी वेश्‍या इथं आहेत. ज्या आहेत त्या धंद्यासाठी बहुधा बाहेर जातात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या इथल्या शाखेचे कार्यकर्ते श्रीकांत तारकर सांगतात, की अजूनही रात्री कामाठीपुऱ्याच्या तोंडावर मुली उभ्या असतात. पण त्याचं प्रमाण खूपच कमी आहे. याचं एक कारण म्हणजे वाढलेली घरभाडी. ती परवडत नसल्याने मुंबईच्या बाहेर वेश्‍यांची वस्ती वाढू लागली आहे. 

इथल्या सोळापैकी दोन गल्ल्या सोडल्या तर बाकीचा भाग मुंबईच्या रहाटगाड्यालाच जुंपलेला आहे. या गल्ल्यांमध्ये भंगार गल्ली, नव्याने उभा राहिलेला कापड बाजार, तृतीयपंथीयांच्या वस्तीची देड गल्ली, चिंधी बाजार, चप्पल मार्केट, चोर बाजार हे भाग येतात. या प्रत्येक बाजाराचे स्वतंत्र वार आणि अनोख्या वेळा आहेत. म्हणजे चिंधी बाजार, चप्पल मार्केटमध्ये जायचं तर पहाटेची पहिली ट्रेन पकडूनच तिथं पोहोचावं लागतं. १९९५ च्या दंगलीनंतर याच एका गल्लीमध्ये कापड बाजार सुरू झाला. 

कामाठीपुरा हा क्रॉफर्ड मार्केटच्या एका टोकाला आहे. तेथे मोबाईल सामान, भांड्यांच्या, कपड्यांच्या दुकानांत काम करणारे विक्रेते या सर्वांना प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी कामाठीपुरा सोयीचा. पंचवीस हजार लोकसंख्येच्या कामाठीपुऱ्यात मारवाडी मोठ्या प्रमाणात भाड्याने राहतात. मराठी आणि तेलुगू भाषकांची काही प्रमाणात स्वत:ची घरं आहेत. एक वा दोन मजली असलेल्या इमारतींच्या जवळपास ८०० चाळी आहेत येथे. वेश्‍यावस्तीचा त्रास कमी झाल्यानं या वस्तीला कंटाळून उपनगरांत राहायला गेलेले आता कामाठीपुऱ्याकडे परतत आहेत. 

रुप पालटणार
शहर वसवण्यात मोलाची भूमिका बजावणारे नागू सयाजी, एल्लाप्पा बाळाराम, विश्‍वनाथ तुल्ला, शंकर पुप्पाला अशा अनेकांचा मात्र कामाठीपुऱ्याला विसर पडला आहे. ३९ एकरमध्ये पसरलेल्या कामाठीपुऱ्यातील जुन्या समस्या कायम आहेत. अरुंद गल्ल्या आणि अस्वच्छतेने त्याला घेरलेले आहे. वारांगनांची वस्ती म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला इथे कायम दुय्यम स्थान दिले गेले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कामाठीपुऱ्याचे ‘क्‍लस्टर डेव्हलपमेंट’ करण्याची घोषणा केली आहे. अर्थात हे काही पाहिल्यांदाच होतेय असे नाही. २००९ पासून वेगवेगळ्या स्वरूपात अशा घोषणा झाल्याचे स्थानिक आमदार अमीन पटेल सांगतात. या वेळी मात्र क्‍लस्टर विकासासासाठी ‘म्हाडा’ पुढाकार घेत असल्यानं कामाठीपुऱ्याचं रूप पालटण्याची अधिक शक्‍यता असल्याचं पटेल यांना वाटतं. मुंबईत अलीकडे विभागांची नावं बदलण्याचा ट्रेंड आला आहे. जुनी ओळख पुसून टाकणं हा त्यामागचा हेतू. तेव्हा अप्पर वरळीच्या धर्तीवर उद्या कामाठीपुऱ्याचं ‘अप्पर मुंबई सेंट्रल’ झालं तर नवल वाटू नये. कामाठीपुऱ्यावरचा डाग त्यातून पुसून निघेल. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या नशिबातला कामाठीपुरा मात्र तसाच असेल. तो वेगळ्या ठिकाणी उभा राहील एवढेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepa kadam article kamthipura

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: