मुंबईच्या ह्दयाची वाट

दीपा कदम
Thursday, 16 January 2020

देशाच्या विविध भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांची मुद्रा आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर, त्यातही खासकरून जुन्या, दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांवर उमटलेली दिसते. तेथील रस्त्यांना, गल्ल्यांना एक व्यक्‍तिमत्त्व आहे आणि बोलका सामाजिक-आर्थिक इतिहासदेखील आहे.

गेल्या आठवड्यातील एक बातमी होती. दक्षिण मुंबईतील दाना बंदर या परिसरातील पंधरा हजार चौरसमीटर जागेवरील अतिक्रमण पालिकेने हटविल्याची. आता अशा बातम्या कोणत्याही शहरासाठी नव्या नाहीत. अतिक्रमण हा नागरी जीवनाचा जणू भागच बनलेला आहे. या बातमीचे वैशिष्ट्य होते, ते अतिक्रमण ज्या रस्त्यांवर झाले होते त्यांच्या नावात. त्यातील एक रस्ता ओळखला जात होता ‘कल्याण रस्ता’ म्हणून आणि दुसरा ‘ठाणे रस्ता’ म्हणून. आता मुंबईच्या भौगोलिक रचनेची थोडीशीही ओळख ज्यांना आहे, त्यांच्यासाठी हा प्रश्नच असेल, की दक्षिण मुंबईत कल्याण-ठाणे हे रस्ते कुठून आले? पण या दक्षिण मुंबईत केवळ कल्याण-ठाणेच नव्हे; तर देशातील काही शहरे, राज्यातील काही जिल्हेदेखील सहज भेटतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येथे शेअर मार्केट आहे. रिझर्व्ह बॅंक आहे; पण तेवढ्यामुळेच ही आर्थिक राजधानी बनलेली नाही. कितीही कष्ट करण्याची तयारी असणाऱ्यांमुळेही मुंबईला हे बिरूद लाभलेले आहे. देशाच्या विविध भागांतून आलेल्या अशा कष्टकऱ्यांची मुद्राच आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवर, त्यातही खासकरून जुन्या, दक्षिण मुंबईतल्या रस्त्यांवर उमटलेली दिसते. तेथील रस्त्यांना, गल्ल्यांना एक व्यक्‍तिमत्त्व आहे आणि बोलका सामाजिक-आर्थिक इतिहासदेखील. या दक्षिण मुंबईत दीडशे वर्षांपासून सोलापूर रस्ता आहे. अक्‍कलकोट गल्ली आहे. शिवाय मशीद बंदर, गिरगाव, प्रभादेवीपासून माटुंग्यापर्यंत आपल्याला वेगवेगळे रस्ते भेटतात. कालिकत रोड, कोचीन रोड, कारवार रस्ता, अहमदाबाद रोड, मदनपुरा, मंगलोर स्ट्रीट, नवाब टॅंक रोड, बंगालपुरा स्ट्रीट, सुरती स्ट्रीट , सिंधी लेन, इस्त्राईल मोहल्ला ही त्यातली काही ठळक नावे. ती साधारण १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात इथल्या रस्त्यांना मिळाली. मुंबईचे आर्थिक माहात्म्य आणि तिचा कॉस्मोपॅलिटन चेहरा समजून घ्यायचा असेल, तर त्याची वाट मुंबईच्या या रस्तेनामांना पुसता येईल. देशाच्या विविध भागांतून लोक पोटापाण्यासाठी येथे आले आणि या शहराचा भाग बनले. स्वतः मोठे होतानाच शहरालाही मोठे केले. हे शहर म्हणजे समुद्रच. येथे माणसाचे अस्तित्वच हरवण्याची भीती. त्यामुळे माणसे एकमेकांना धरून राहू लागली. विशिष्ट भागांतील, विशिष्ट व्यवसायाची माणसे आपल्या माणसांजवळ येऊन राहू लागली. ते सर्वांच्या फायद्याचे होते. एकेका भागातून येथे आलेल्यांनी मग आपली ओळखही येथील वस्त्यांना, रस्त्यांना दिली. आज त्यांच्या शहरांची, गावांची नाममुद्रा मिरवणारे हे रस्ते शहराचा अविभाज्य भाग बनलेत. उदाहरणार्थ, अलाहाबादवरून आलेली मदन कुटुंबे. त्यांचा ‘झुलाई’ म्हणजे हाताने शिवणकाम, विणकाम करण्याचा पारंपरिक व्यवसाय होता. त्यांची वस्ती मदनपुरा बनली. मुंबईच्या पहिल्या गॅझेटमध्येही याचा उल्लेख आहे. नवाब टॅंक हे माझगाव जवळच्या रस्त्याचे नाव. म्हैसूरच्या टिपू सुलतानाच्या वंशजाचे निवासस्थान या माझगावात होते. त्यांनी तेथे मशीद आणि पाण्याचा हौद बांधला म्हणून त्या रस्त्याला नवाब टॅंक अशी ओळख मिळाली. 

आगळेवेगळे शहर
२०० वर्षांपासून मुंबई जर इतके वैविध्य घेऊन बहरली असेल, तर ती कॉस्मोपॉलिटनच होणार. एकाचवेळी इतक्‍या जाती-धर्मांची माणसे एका शहरात सापडणारे हे आगळेवेगळे शहर आहे. त्याची विविधता या बारीकसारीक कंगोऱ्यांसह समजून घेण्यात अनोखी मजा आहे. विविध जातीपातींच्या लोकांची ओळखही मुंबईने जपली आहे. त्यांच्या श्रद्धास्थानांचीदेखील. शहरात राहणाऱ्या जवळपास प्रत्येकाच्या जाती-धर्माच्या, व्यवसायाच्या खाणाखुणा हे शहर अंगावर मिरवते. त्याचाही इतिहास दोन शतकांपूर्वीइतकाच जुना. बोहरा गल्ली, खोजा स्ट्रीट, मंगलदास मार्केट, कासार गल्ली, सुतार गल्ली अशा गल्ल्यांवर जातीधर्माचे मोहर उमटलेली आहे. आग्रीपाडा, म्हातारपाखाडी रोडही ओळख टिकवून आहेत. कोळ्यांसोबतच मुंबईतले आद्य निवासी म्हणून ज्यांची नोंद आहे, त्यात सोमवंशी क्षत्रीय किंवा पाचकळशींचा समावेश होतो. माझगावमध्ये म्हात्रे आडनावाच्या पाचकळशींची वस्ती आहे. तिथल्या रस्त्याचे नाव म्हातारपाखाडी आहे. आगरीपाड्याची ओळख ही अशीच मुंबईच्या जन्मापासूनची असावी अशी वाटणारी. येथील आगऱ्यांमध्ये भातशेती करणारे, मीठ उत्पादक आणि भाजी उत्पादक असे तीन प्रकारचे आगरी आहेत. त्यांची दक्षिण मुंबईतच वस्ती होती, त्यांच्यावरून आगरीपाड्याला ओळख मिळाली. याच टोकाला सुरती गल्लीदेखील आहे. मुंबईत गुजरातेतून सफाई कामगार येण्याचा एक ट्रेंड होता; तर ही सुरती गल्ली ही तिथल्या सफाई कामगारांच्या व्यवसायावरून मिळालेली खूण.

 शहराचा कॉस्मोपॉलिटन चेहरा हा असा कष्टकरी हातांमुळे तयार झालेला आहे. त्यांच्या वस्त्या मुंबईच्या संस्कृतीचाच भाग आहेत. कुलाबा ते माझगाव या भागात अंगमेहनतीची कामे करणाऱ्या घाटावरच्या कामगारांचा भरणा, तर गिरणी कामगारांत मात्र कोकणाकडील कामगारांचा. सांगली, सातारा अहमदनगर, मावळ प्रांतातील अवर्षणग्रस्त भागातील कामगारांची मोठी संख्या कौली बंदर, गोदी बंदर, कुलाबा ससून डॉक, लोखंड आणि पोलाद विभागात आहे. गोदी कामगारांविषयीच्या अभ्यासक असणाऱ्या कृष्णा म्हस्के यांनी नोंदविलेले एक निरीक्षण मार्मिक आहे. येथील पारंपरिक व्यवसाय असलेल्या मासळी विक्रीची ने-आण करणाऱ्यांत अहमदनगर, मावळ प्रातांतून आलेले अनेक जण आहेत. हातगाडीवरून मासे आणणे, लिलाव करणे, बर्फाची व्यवस्था, अशी अनेक कामे ते करतात. यातील बहुतांश वारकरी आहेत. ते मासे अजिबात खात नाहीत; पण व्यवसायनिष्ठ आहेत. अगदी पहाटेपासून मासे विक्रीच्या या व्यवसायात हा वर्ग शतकांपासून आहे. कामामध्येच देव पाहणाऱ्या कष्टकरी मुंबईचा हा प्रातिनिधिक चेहराच म्हणावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepa kadam article on mumbapuri