esakal | नाइट लाइफ... अंधारातले, उजेडातले
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai-night-life

मुंबईत अशी एक मुंबई आहे की ती रात्रीही जागी असते. त्या निशाचरांची मुंबई ही अनुभवण्याची चीज आहे. मुंबईच्या रात्रीला ‘लाइफ’ असावं, अशी कल्पना आदित्य ठाकरे यांनी उचलून धरली. मात्र खाऊ गल्ल्या,  मॉल आणि मल्टिप्लेक्‍स रात्रभर सुरू ठेवणं म्हणजे ‘रात्रीची मुंबई’ साजरी होईल काय? 

नाइट लाइफ... अंधारातले, उजेडातले

sakal_logo
By
दीपा कदम

मुंबई म्हणजे लोकलची घामेजलेली गर्दी, वाहतूक कोंडी, कळकट झोपडपट्ट्या असं एक काळे-पांढरं चित्र रंगवलं जातं. पण मुंबई त्याहून अधिक आहे. या शहराला स्वत:चं खानदानी सौंदर्य आहे. मलबार हिल किंवा हॅंगिंग गार्डनवरून खाली पसरलेली मुंबई एकदा पाहा... पेडर रोडच्या वळणावळणाच्या रस्त्यानं एकदा खाली येऊन पाहा... वरळीच्या किल्ल्यावरून किंवा बांद्य्राच्या हिल रोडवरून फेरफटका मारून पाहा... या शहराची नजाकत कशात आहे ते समजेल. या सौंदर्याला चार चाँद लागतात ते रात्रीच्या वेळी. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते अनुभवण्यासाठी स्टेशनास्टेशनांच्या वारुळांतून मुंग्यांसारखे बाहेर पडणारे चाकरमानी आपापल्या घरी परतण्याची वाट पाहावी लागेल. दिवसभराचं पोटार्थी चक्र थांबलं की मग मुंबईचं रात्रजीवन अलवारपणे बहरू लागतं. कोटातल्या, नरिमन पॉइंटच्या मोकळ्या रस्त्यांतून समुद्राची गाज ऐकू येऊ लागते. मरीन लाइन्समधील ‘राणीच्या रत्नहारा’चे पिवळे दिवे गडद लखलखू लागतात. कैक गल्ल्यांना रौनक येऊ लागते. पूर्वी त्यात हाताच्या बोटांवर मोजता याव्यात एवढ्याच गल्ल्यांची गणना होई. त्या बदनाम गल्ल्या. फोरास रोड, बावनखणी, कामाठीपुरा आणि नंतरच्या काळात बच्चूभाईची वाडी...या मुंबईतल्या वेश्‍यावस्ती. नामदेव ढसाळांसारख्या जहाल कवीने कवितांतून अजरामर केलेल्या या वस्त्या. अधोविश्वाला कवेत घेऊन वावरणाऱ्या. या गोलपीठाला दोनशे वर्षांहून मोठा इतिहास आहे. ९०च्या दशकापर्यंत ही वस्ती व गुन्हेगारी जगत हे मुंबईच्या रात्रजीवनातील एक समीकरण होते. आता हे निशाचर गुन्हेगारी जगत एवढे सफेदपोश झाले आहे, की त्यांना काळोखाची गरज उरलेली नाही. तशात मुंबईला जमिनीची मोठी भूक. त्यातून कामाठीपुऱ्यातील जमिनीचे भाव वाढले आणि कामाठीपुरा आटोपला. तेथील वेश्‍यावस्ती उपनगरांमध्ये जाऊन स्थिरावली. 

सॅटर्डे नाइट फीवर... 
आर्थिक उदारीकरणानंतर वांद्रे, अंधेरी या उपनगरांत बहरलेले ‘पब कल्चर’ आता नव्याने कात टाकू लागलेल्या लोअर परेल वा अपर वरळी, महालक्ष्मी येथे रंगू लागले आहे. त्याची उपलब्धता आणि सेवा क्षेत्राला आलेल्या बरकतीने येथील उच्च मध्यमवर्गीयांच्या खिशात खुळखुळू लागलेला पैसा यामुळे मुंबईला नव्याच तापाची लागण झाली. तो म्हणजे- ‘सॅटर्डे नाइट फीवर’. शनिवारची रात्र म्हणजे ‘पब हॉपिंग’ करणाऱ्यांची पर्वणीची रात्र. या एका रात्रीत मोठमोठ्या पबमध्ये करोडोंचा गल्ला जमतो. ही संस्कृती डान्सबारहून पूर्णतः भिन्न. आता येथील डान्स वा नव्या कायदेशीर भाषेत ‘ऑर्केस्ट्रा बार’ला एकूणच उतरती कळा लागलेली असली, तरी तो छमछमाटी शौक पूर्ण करण्याच्या अनेक छुप्या वाटा आहेतच. मुंबईत अधिकृत रात्रजीवन सुरू झाल्यास त्याचे हे एक प्रमुख आकर्षण असू शकते. पब, डिस्कोथेककडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नव्यानव्या क्‍लृप्त्या रचल्या जाऊ शकतात. 

पहाटे तीनपासून बहरतात बाजार
हे मुळात व्यापारी शहर. दक्षिण मुंबईच्या अनेक गल्ल्यांमध्ये रात्री तीननंतर छोटे छोटे बाजार भरतात. चोर बाजार, डेढ गली बाजार, चिंधी बाजार, दादरचा फूल बाजार, पान बाजार, ससून डॉक, भाऊचा धक्का येथे पहाटे तीनपासून चहलपहल सुरू होते. रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात खरेदीसाठी गर्दी जमते. चोर बाजारात मिळणारे अँटिक सामान, डेढ गल्लीतील चपला-बूट याबाबत अनेकांनी लिहिले आहे. गोल मार्केटमधले चिंधी मार्केटही अनेकांच्या आकर्षणाचा विषय. घराघरांतून गोळा केलेले जुने कपडे इथे विकले जातात. दादरचं फूल मार्केट, विड्याच्या पानांचं, भाजीचं मार्केटही असंच पहाटेच जागं होतं. इथल्या उद्यमशीलतेची ओळख असणाऱ्या धारावीचा एक कोपरा तर रात्रीच जागा होतो. कुठल्याही कोपऱ्यात दिवसाच्या कोणत्याही प्रहरी इडली-वडा मिळू शकतो. ते पक्वान्न शिजतं याच धारावीत. पाचशेहून अधिक दाक्षिणात्य कुटुंबांचा हा गृहोद्योग आहे. पहाटे पाचच्या पूर्वीच मुंबईकरांचा इडली-वड्याचा नाश्‍ता तयार होत असतो.

दक्षिण मुंबईला ‘लंडनची जुळी बहीण’ म्हटले जाते. जाणते अभ्यासक रफीक बगदादी पर्यटकांना त्याची सफर घडवतात. प्रामुख्याने परदेशी पर्यटकांना या महानगरीच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धतेची माहिती देतात. मुंबईकरांना त्यांच्या धकाधकीत या समृद्धीकडे पाहण्यास वेळ कुठे असतो? रात्री मात्र हा इतिहास बोलू लागतो. नाइट लाइफ (- या शब्दाला आपल्याकडे असलेली काहीशी काळी छटा लक्षात घेऊन आता शिवसेनेच्या वतीने मांडली जाणारी ‘मुंबई २४ तास’ ही संकल्पना.) ही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची कल्पना. तिला मूर्त रूप देण्यासाठी ते पाच वर्षे पाठपुरावा करत होते. रात्रजीवन सुरू झाल्यास साताठशे कोटींची उलाढाल होईल, रोजगार वाढेल, गोव्याकडे वळणारे देशी-विदेशी पर्यटक इकडे वळू शकतील, असा हॉटेल व्यावसायिकांचा दावा आहे. या रात्रजीवनांतर्गत नरिमन पॉइंट, काळा घोडा, वरळी, बीकेसी, वांद्रे आणि निवासी वस्त्यांपासून दूर असणारे मॉल, लहान-मोठी हॉटेले, खाऊ गल्ल्या सुरू ठेवण्याचा विचार केला जातोय. समाज नि संस्कृती सोवळ्यात नाही ठेवता येत. त्यात बदल होत असतात. पण खाऊ गल्ल्या, मॉल आणि मल्टिप्लेक्‍स रात्रभर सुरू ठेवणं म्हणजे ‘रात्रीची मुंबई’ साजरी होईल काय? हे तर ताकाला जाऊन भांडं लपवण्यासारखं होऊ शकतं. तरुणांना आणि देशविदेशांतील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही कल्पना खुलेपणानं स्वीकारण्याची तयारी शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाला पेलवेल काय, याची शंका आहे. रात्रजीवनात संगीताच्या, काव्यवाचनाच्या मैफिलींना स्थान मिळाले, कोटातल्या एखाद्या चौकात छान ऐतिहासिक ‘लेसर शो’सारखा उपक्रम सुरू झाला...अनेक कल्पना पुढे येऊ शकतील. यातूनच मुंबईचा सांस्कृतिक चेहरा निखरून उठेल. मुंबईच्या निशेला नवी ओळख मिळेल.

दीपा कदम deepakadam३@gmail.com