रंग मुंबईचे : चवीत गाव शोधणारं महानगर

दीपा कदम deepakadam3@gmail.com
Wednesday, 29 January 2020

ग्रामीण भाग तुलनेनं दूर असल्यानं मुंबईकर निरनिराळ्या खाद्य महोत्सवांमध्ये गावाकडची चव शोधत असतात. खरं तर मुंबईत या सगळ्याच गोष्टी बारा महिने खरेदी करता येतात. मात्र तरीही बचत गटाच्या महिलांनी आणलेल्या खाद्यपदार्थांच्या चवीमध्ये मुंबईकर खरेदीच्या निमित्तानं स्वत:ची नाळ शोधू पाहतात. 

बांद्य्राला ‘एमएमआरडीए’ मैदानाच्या आसपास कार्पोरेट कंपन्यांमध्ये काम करणारे चार जण दुपारच्या वेळेत ‘महालक्ष्मी सरस’मध्ये कोणाला तरी शोधत होते. नगरवरून तूप विकायला येणाऱ्या आजींचं नाव त्यांना माहीत नव्हतं, चेहऱ्याची पुसटशी ओळख होती. वर्षातून एकदाच तर त्या भेटतात. पाचशे स्टॉलच्या रांगेमध्ये एका कोपऱ्यात स्टॉल असलेल्या शांताबाई जगदाळे दिसल्या आणि या चौघांची शोधाशोध सार्थ ठरली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मावशी, तुमचा चेहरा लक्षात होता. तुमच्याकडूनच तूप न्यायचं म्हणून वेळात वेळ काढून आलो...’ साठी ओलांडलेल्या शांताबाईंची ‘तूप विकणाऱ्या मावशी’ अशीच ओळख आहे. नेवासे तालुक्‍यातल्या मोरगव्हाणमधील तेजस्विनी महिला बचत गटाकडून गाईचं तूप बनवलं जातं. ‘सरस’च्या पहिल्याच आठवड्यात त्यांचं जवळपास तीनशे लिटर तूप हातोहात खपलं. सहाशे रुपये लिटरचं हे तूप विकताना ते कसं शुद्ध आहे, त्यात भेसळ नाही याची खात्री त्या पटवून देतात. भाव कमी करून मागणाऱ्या ग्राहकांकडे त्या पाहतही नाहीत. ‘एमबीए’ची डिग्री घेतलेल्यांनाही लाज वाटेल असं शांताबाईंचं विक्रीकौशल्य होतं. हे तूप घेऊन शांताबाई देशभरात महिला बचत गटांची प्रदर्शनं असतात तिथं जातात. पण मुंबईतलं ‘महालक्ष्मी सरस’ मात्र त्यांच्यासाठी खास आहे. देशात इतर कुठेच विक्री होत नाही इतकी तुपाची विक्री या ‘सरस’मध्ये होते म्हणून शांताबाई खूष नाहीत, तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ‘सरस’मध्ये आलेल्या मुंबईकरांचं निरीक्षण करण्यात रमलेल्या असतात. ‘काय सांगू बाई तुला मुंबईची तऱ्हा.. ’ दुपारी गर्दी कमी असल्यानं डोक्‍यावरचा पदर सावरत त्यांनी बोलायला सुरुवात केली, ‘नंबर एकचं गिऱ्हाईक मुंबईतच भेटतं. इथे प्रत्येक जण कमावतो ना. नवरा-बायको दोघंही कमावतात, म्हणून बाई तिचं ती खरेदी करते. फक्‍त महालक्ष्मी सरसमध्ये बाया मैत्रिणीसंग येतात. नवरे सोबत असले, तरी बाईच्या पर्समधून नोटा निघतात. आणि नोटापण कशा...हिरव्या निळ्याशार कडक...’ नोटा कडकच असतात, त्यात काय एवढं. सहज विचारलं. ‘दिल्लीपासून केरळपर्यंतची प्रदर्शन पाहिली.

हरियाना, नागपूर, नाशिक सगळीकडे जाते. पण मुंबईकरांच्या पाकिटातून कडक नोट बाहेर येते. बाकी कुठेही जा. जुन्या, फाटलेल्या नोटा. सेलोटेप लावलेल्या नोटा. रुमालात बारीक घडी घालून ठेवलेल्या नोटा. चुरगळलेल्या नोटा...तिथं नोटा तपासून घेणं हेच काम असतं. मुंबईकरांच्या पाकिटातून मात्र सरळ, स्वच्छ हिरवी नोट बाहेर येते. गावाकडं गेल्यावर मुंबईवरून आलेल्या नवीन नोटांचं केवढं कौतुक असतं...’ हे मात्र माझ्यासाठी नवीन होतं. ग्रामीण भागापेक्षा मुंबईत करकरीत नोटा मिळतात, हे शांताबाईंनी अचूक हेरलं होतं. ‘इथं लोकं पैसे देत- घेत राहतात, दडपून ठेवत नाहीत. सारखं काहीतरी घेत राहतात. ’ 

कोऱ्या नोटांची मिजास 
मुंबईतल्या कोऱ्या नोटांचं कौतुक मुंबईकरांना नसेलच; पण ग्रामीण भागात गेल्यावर हातात आल्यावर नोटा पाहिल्यावर त्यांचं महत्त्व कळतं. मुंबईत रिक्षाचालकही दुमडलेली, सेलोटेप लावलेली नोट पुढे केली, तर परत आपल्या हातावर ठेवतो. ग्रामीण भागात मात्र नोटेचा हा रुबाब चालत नाही. तिला चुरगळलेल्या स्थितीत आपला प्रवास सुरू ठेवावा लागतो.... मुंबईच्या या कोऱ्या नोटेची मिजास काही औरच आहे. नोटांच्या वितरणाचा प्रवासच मुळात मुंबईतून सुरू होतो. त्यामुळे कडक नोटाच थेट मुंबईकरांच्या पाकिटात वस्तीला येतात. रिझर्व्ह बॅंकेमध्ये जुन्या नोटा बदलून देणं किंवा करकरीत नोटा देण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. करकरीत नोटा, नवीन नाणी खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात. त्यासाठीचे एजंटदेखील रिझर्व्ह बॅंकेच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये पाहायला मिळतील.

दोघांनाही एकमेकांची ओढ!
विक्रेता आणि ग्राहक या दोघांनाही एकमेकांची लागलेली ओढ दुसऱ्या कुठल्या शहरात पाहता येणार नाही. पुणे जिल्ह्यातून हातसडीचा तांदूळ विकायला आलेल्या सुमनबाईंनीदेखील हे मान्य केलं. ‘महालक्ष्मी सरस’ सुरू होण्याच्या एक महिनाअगोदर मुंबईचे ग्राहक फोनवरून तांदळाची ऑर्डर देतात. मुंबईत आणलेला माल परत घेऊन जावं लागत नाही. माल चोख असेल तर किंमत द्यायला मुंबईकरांची ना नसते. या वेळी मात्र गावाकडे भरपूर पाऊस पडला. त्यामुळे आंबेमोहोर आणि इंद्रायणी तांदळाचा वास नेहमीपेक्षा थोडा कमी झाला. चव मात्र ढळली नाही.’ यंदाच्या पावसात शेतीचं खूप नुकसान झालं, तेव्हा मुंबईकरांनी समजून घ्यायला पाहिजे, असंही सुमनबाई आवर्जून सांगतात. मुंबईतल्या ग्राहकाला दर्जा आणि चव पटली की तो तुम्हाला शोधत येतो, असा अनुभव राज्यातल्या नियमित येणाऱ्या जवळपास सर्वच महिला बचत गटांचा होता.

धपाटे नि ठेच्याचं कौतुक
मुंबईकर खरेदीवेडा आहेच खरा. तुम्ही म्हणाल याचं काय कौतुक!  पुण्यात, नाशकातही अशी प्रदर्शनं होतात आणि लोकं रेटून खरेदी करतात. तरीही खरेदीच्या बाबतीत ते मुंबईच्या जवळपासही नाहीत. ‘महालक्ष्मी सरस’मध्ये या वर्षी केवळ तेरा दिवसांत पंधरा कोटींपेक्षा अधिक विक्री झाली. गेल्या वर्षी बारा कोटी झाली होती. मंदीचं सावट असतानाही ‘सरस’च्या आयोजकांसाठी ही विक्री समाधान देणारी ठरेल. ‘महालक्ष्मी सरस’च्या अगोदर महसूल विभागनिहाय, जिल्हा आणि तालुकानिहायदेखील ‘सरस’ची प्रदर्शनं होतात. मात्र कुठल्याही विभागात एक कोटीच्या पुढे विक्री होत नाही.

सणांमध्ये, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये अशी ओळख जगाच्या पातळीवर टिकवण्याचा प्रयत्न होतो. तशी ती मुंबईकरही करतात; पण पुण्याप्रमाणं मुंबईला ग्रामीण भाग तुलनेनं दूर असल्याने मुंबईकर अशा महोत्सवांमध्ये गावाकडची चव शोधत असतो. मुंबईत पुढील एक-दोन महिने निरनिराळ्या महोत्सवांचे असतील. जे वेगवेगळ्या समाजाचे, प्रादेशिक असतात. साधारण २५ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कोकणी जत्रेपासून प्रादेशिक महोत्सव मुंबईत सुरू झाले. नुकताच साताऱ्याचा ‘माणदेशी महोत्सव’ पार पडला. तिथंही अशीच गर्दी पाहायला मिळाली. अशा महोत्सवांमध्ये मुंबईकर नेमकं खरेदी तरी काय करतात? तर अनेकांना धपाटे आणि मिरचीच्या ठेच्याचं कौतुक असतं. शेंगदाणा चटणी, मासवडी, हुरड्याचं थालीपीठ, खपली गव्हाची खीरपासून कोंबडीवडे, मासे चाखायचे असतात आणि घराकडे परतताना हळद, गावरान गूळ, मटकी, पोहे, ज्वारी, हुरड्याचं पीठ, हातसडीचे तांदूळ, घाण्याचं तेल, गावरान मसाले अशा सगळ्या गावाकडच्या चवींना स्वयंपाकघरात मानाचं स्थान द्यायचं असतं. खरं तर मुंबईत या सगळ्याच गोष्टी बारा महिने खरेदी करता येतात. तरी बचत गटाच्या महिलांनी आणलेल्या या चवीमध्ये मुंबईकर खरेदीच्या निमित्तानं स्वत:ची नाळ शोधत असतील. शहरामध्ये राहून त्यांना गावाचा गंध येत असेल...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article deepa kadam