अशी ही ‘बेस्ट’च्या बसची तऱ्हा!

Bus
Bus

कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मुंबईकरांच्या आयुष्यात `बेस्ट’च्या बसचा ‘थांबा’ येतोच. `बेस्ट’च्या बसनेे दिवसभरात ५० लाख मुंबईकरांच्या प्रवासाला उत्तम साथ दिली, तर या बसचे होणारे अधिकचे लाडही मुंबईकरांना सुखावणारे ठरतील.

भरपूर हुशार; पण खट्याळ मुलीचे बापाकडून वारेमाप लाड होतात. कधी डोळ्यांनी रागे भरून, तर कधी अबोला धरतो; पण तिचे कोडकौतुक करायचे थांबवत नाही. मुंबईची बस ही अशी लाडावलेली. महापालिकेने तिला मांडीवर घेतल्यापासून तिच्या भरणपोषणाची जबाबदारी पालिकेने स्वीकारलीय. ३३ लाख प्रवासी या बसने दिवसाला प्रवास करतात, तरी हिला अद्याप बाळसं धरलेले नाही, की ती अजून स्वत:च्या पायावर चालू लागलेली नाही. मात्र, कधी रुसून आगाराच्या कोपऱ्यात जाऊन बसली.

तर मात्र मुंबईकरांची वाट अडखळते... रस्ते सुने सुने होतात... रेल्वे स्थानकाच्या बाहेर गर्दी ओसंडून वाहते. रिक्षा, टॅक्‍सीवाले उद्दाम होतात... ऑफिस, घराची वाट आणखी दुरावते.

अशी ही बस आर्थिकदृष्ट्या मात्र कायम क्षीण राहिली आहे. देशात असा कोणताही उपक्रम नसेल, ज्याला दर महिन्याला एखाद्या महापालिकेकडून १०० कोटी किंवा एखाद्या वर्षाला १५०० कोटींचे अनुदान मिळाले असेल. बरं हे कशासाठी तर, पालिकेनेच ‘बेस्ट’ला दिलेले दोन हजार कोटी रुपयांचे अनुदान परत करण्याची क्षमता ‘बेस्ट’मध्ये तयार व्हावी म्हणून... ‘बेस्ट’ने या पैशातून काही बसगाड्या खरेदी कराव्यात, काही भाड्याने घ्याव्यात आणि प्रवासीक्षमता वाढवावी, यासाठी हा घाट घातला गेला. जुने कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज. या आराखड्यानुसार तीन हजार एसी मिडी बसगाड्या मुंबईच्या रस्त्यांवर पुढील वर्षात धावण्याचे नियोजन आहे. माफक दरात ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. त्यांचे किमान भाडे फक्त सहा रुपये. खरे तर ‘भाबडे’ स्वप्न रंगवून हा डोलारा उभा करण्यात आला आहे. या स्वप्नवत नियोजनानुसार लंडनवासीयांप्रमाणे मुंबईकर सार्वजनिक बसने प्रवास करतील. पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने मुंबईच्या रस्त्यांवर तीन हजार मिडी बस या जुन्या तीन हजार ३०० बसच्या जोडीने धावतील. म्हणजे, सहा हजार बसचा ऐवज मुंबईच्या रस्त्यांवर धावेल.

कायम डगमगत्या ‘बेस्ट’वर इतका पैसा लावला जातोय, तर त्याची क्षमता तरी काय असेल बरे... हे समजून घ्यायला मुंबईकर असण्याची गरज नाही.  मुंबईच्या बाहेरून आला असाल, तर ‘बेस्ट’ने सुलभ होणारा प्रवास चटकन जाणवतो. फार दूर नाही; ठाणे, पुण्यातल्या बस अन्‌ मुंबईतल्या बसमधला फरकही सहज ओळखता येतो. केंद्राने ‘जेएनएनयूआरएम’मधून शहरांना बस खरेदीसाठी अनुदान दिल्यावर या शहरांमधल्या सार्वजनिक वाहतुकीसाठी असलेल्या बसची अवस्था सुधारली. पण, मुंबईच्या बसचे कौतुक मुंबईकरांना कायम असते. शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते मैत्रिणीला डबलडेकर बसमधून घरापर्यंत पोहोचती करणाऱ्या प्रियकरापर्यंत मुंबईकरांच्या आयुष्यात बसचा ‘थांबा’ येतोच. दीड तास कळ सोसायची असेल, तर केवळ  २० रुपयांत अर्ध्या मुंबईचा फेरफटका मारता येतो. डबलडेकर बसच्या खुल्या डेकमध्ये निलांबरी बसमध्ये शाळकरी मुलांचे वाढदिवस साजरे करण्याचा ट्रेंड मुंबईत वाढतो आहे.

‘बेस्ट’च्या जन्माच्या आधीपासून आधुनिक बसमध्ये मिरवण्याचा मान मुंबईकरांना मिळालेला आहे. इतर शहरांमध्ये शिग्राम, रेकले, पालख्या, घोडागाडी होत्या. त्या वेळी ९ मे १८७४ मध्ये मुंबईत पहिली ट्रॅम सुरू झाली. कुलाबा ते क्रॉफर्डमार्गे पायधुणी आणि बोरीबंदर ते काळबादेवीमार्गे  पहिल्या टप्प्याच्या प्रवासाला तीन आणे होते, त्यानंतर १८९९ मध्ये एक आणा भाडे आकारण्यास सुरुवात झाली. घोड्यावरच्या ट्रॅमनंतर विजेवरची ट्रॅम १९०७मध्ये सुरू झाली. लालबागच्या पुलाचे काम सुरू असताना डांबरी रस्त्यामधून ट्रॅमसाठी टाकलेले लोखंडी फाटे बाहेर आल्याने या ट्रॅमच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. या ट्रॅममध्येही काही काळ पहिला आणि दुसरा वर्ग होता. पहिल्या ट्रॅमखाली धावत्या गाडीतून उतरताना मालवणकर नावाचा माणूस पडला आणि त्यांचा पाय कापावा लागला होता. दुमजली ट्रॅमदेखील मुंबईत १९२०मध्ये धावलेली आहे.

‘बेस्ट’च्या म्युझियममध्ये आपल्याला हा इतिहास पाहता येतो. एका डब्याची विजेची ट्रॅम, दोन डब्यांची ट्रॅम, ट्रॉली बस आणि त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपातल्या बस पाहिल्यानंतर या बसचा ठसा मुंबईवर किती पक्‍का असेल, हे लक्षात येते.

कर्जाच्या विळख्यात
शहराच्या जडणघडणीत वाटा असलेली ‘बेस्ट’ कर्जाच्या विळख्यात अखंड बुडाली आहे. लंडनची टीएफएल (ट्रान्सपोर्ट फॉर लंडन)प्रमाणे मुंबईकरांनी वाहतुकीसाठी बसच्या पर्यायाचा विचार करावा, असा प्रयत्न ‘बेस्ट’कडून सुरू आहे. ‘टीएफएल’देखील पूर्ण तोट्यात आहे. पण, पूर्ण क्षमतेने तिचा वापर होत असल्याने सेवाक्षेत्र म्हणून ती तूट लंडनच्या प्रशासनाने मान्य केली आहे. इथे मात्र ‘बेस्ट’ने तिच्या क्षमतेचा पूर्ण वापर केलाय का, हा कळीचा प्रश्‍न आहे. दीड कोटीच्या आसपास मुंबईची लोकसंख्या पोहोचलीय. ८० लाखांच्या आसपास लोक नियमित घरातून बाहेर पडतात. त्यापैकी ४० ते ४५ लाख लोकलशिवाय प्रवास करतात. महापालिकेच्या अर्थसंकल्पातही ४५ लाख मुंबईकर ‘बेस्ट’च्या बसने प्रवास करू शकतील, असे लक्ष्य ठेवले आहे. ते चुकीचे नाही.

जागतिक ओळख असणाऱ्या शहरातील सार्वजनिक वाहतूक  परवडणारी असणे आणि नागरिकांनी तिचा अधिकाधिक वापर करणे, ही त्या शहराच्या पायाभूत सुविधेतील महत्त्वाची ओळख असते. 

मुंबईत खासगी वाहतुकीला मिळालेली मोकळीक आणि सार्वजनिक वाहतुकीतील महत्त्वाची कडी असलेली ‘बेस्ट’ कमकुवत होण्याने वाहतुकीला बकाल अवस्था आली आहे. जगातली कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फायद्यात नाही. त्यामुळे ‘बेस्ट’चे हे स्वप्न पूर्ण होण्याची शक्‍यता धूसर आहे. तूट वाढण्याची शक्‍यताच जास्त. मात्र, ‘बेस्ट’ने दिवसभरात ५० लाख मुंबईकरांच्या प्रवासाला साथ दिली, तर या लाडावलेल्या बसचे अधिकचे लाडही मुंबईकरांना सुखावणारे ठरतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com