विकासाच्या जाळ्यात कोळी संस्कृती

दीपा कदम deepakadam3@gmail.com
Wednesday, 4 March 2020

मुंबईची संस्कृती आणि चव टिकवण्यात ज्या समाजानं महत्त्वाची भूमिका बजावली, तो कोळी समाज विकासापासून कायमच दूर राहिला आहे. पण, आता कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा विचार होत असला, तरी त्यामुळं मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्यालाच नख लावलं जाण्याची शक्‍यता असल्यानं हा नाजूक विषय झाला आहे.

मुंबईची संस्कृती आणि चव टिकवण्यात ज्या समाजानं महत्त्वाची भूमिका बजावली, तो कोळी समाज विकासापासून कायमच दूर राहिला आहे. पण, आता कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाचा विचार होत असला, तरी त्यामुळं मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्यालाच नख लावलं जाण्याची शक्‍यता असल्यानं हा नाजूक विषय झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुंबईच्या किनारपट्टीला पसरलेल्या अरबी समुद्राच्या साक्षीनं घर बांधणं दोनच समुदायांना परवडू शकतं. एक ज्यांच्यापुढं घर घेण्यासाठी ‘किंमत’ हा प्रश्नच येत नाही आणि दुसरं म्हणजे ही मुंबईच ज्यांची ‘जायदाद’ आहे अशा कोळी समाजाला. १८८१च्या जनगणनेत कोळी (कोंकणी) ११ हजार आणि कोळी (घाटी) १२ हजार अशी लोकसंख्या होती. मुंबईचा आद्य रहिवासी असण्याचा मान कोळी समाजाकडं जातो. मुंबईच्या किनारपट्टीवर ४५ कोळीवाडे आणि १०० गावठाणे आहेत. हे कोळीवाडे आणि गावठाण विकसित करण्याची परवानगी देण्यासाठी विशेष विकास नियंत्रण नियमात सुधारणा करण्याच्या प्रस्तावावर मुंबई महापालिका गंभीरपणे विचार करीत आहे. या कोळीवाड्यांमध्ये तेरा मजल्यांपर्यंत बांधकाम करण्याची परवानगी दिली जाण्याचा पर्याय आहे.

मुंबईचे कोळीवाडे आणि गावठाणांच्या पुनर्विकासाच्या निमित्तानं बांधकाम व्यवसायात ‘तेजी’ येईल, इतकं सोपं व्यावहारिक गणित महापालिकेसमोर आहे. मात्र, कोळीवाड्यांबाबत पुनर्विकासाचा विचार करताना मुंबईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेव्यालाच नख लावलं जाण्याची शक्‍यता असल्यानं हा नाजूक विषय झाला आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या कोळीवाड्यांना झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) लागू करण्याचा प्रयत्न झाला होता. यातूनच कोळीवाड्याविषयीच्या उदासीनतेवर प्रकाश पडू शकतो. कुलाबा, वरळी, शीव, माहीम, वर्सोवा या जागांवर कोळीवाडे आहेत. ज्या जागेवर टोलेजंग टॉवरमध्ये घर असावं, अशी इच्छा कोणाचीही होऊ शकते. असे इमले उभारण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांना खुरडलेले कोळीवाडे लवकरात लवकर किनाऱ्यावरून धुपून निघावेसे न वाटले तरच नवल. 

मुंबईचा राजा असलेल्या कोळी समाजाची घरं ही राजाला शोभेलशी असतील, या भ्रमात कोणी हे कोळीवाडे पाहायला जाण्याचा विचार करीत असेल, तर वास्तव तसं अजिबात नाही. मुंबईची संस्कृती आणि चव टिकवण्यात ज्या कोळी समाजानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ते कोळीवाडे आता अक्षरश: कोसळलेत... शेवटच्या घटका मोजतायत. हे कोळीवाडे बकाल झाले असले, तरी मुंबईतल्या झोपडपट्ट्या आणि कोळीवाडे यांच्यामधला फरक मात्र इथं पोचल्यावर आपल्या नाकाला ताबडतोब जाणवतो. सुक्‍या आणि ओल्या माशांच्या एकमेकांत मिसळलेल्या दरवळानं तुम्ही मत्स्यप्रेमी असाल, तर तुमची भूक चाळवेलच. एक-दोन मजली बैठी घरं, गच्चीवर जाण्यासाठी अगदी निमुळत्या पायऱ्या आणि लाल, पिवळे, हिरवे, केशरी, गुलाबी अशा चटपटीत रंगांनी सजलेली घरं कोळ्यांमध्ये असणाऱ्या चैतन्याला शोभेशीच असतात.

या घरांच्या मागं असलेल्या किनाऱ्यावर बोंबील आणि इतर सुकी मच्छी बांबूला लगडलेली असतात. सुकत असलेल्या बोंबलावर पातळ जाळी अंथरलेली असते. नजरेला सुखावणाऱ्या या दोन-चार गोष्टी सोडल्या, तर कोळीवाडे पायाभूत सुविधांच्या बाबतीत झोडपट्ट्यांनाही मागं टाकतील. एकमेकांना चिकटून उभ्या राहिलेल्या घरांच्या मधून वाहणारं सांडपाणी, पडझड झालेल्या घरांना पुन्हा उभं करण्यात येणाऱ्या अडचणी, बोळ म्हणावं इतक्‍या अरुंद रस्त्यांच्या कडेनं हे कोळीवाडे टिकून राहिलेत.

कोळीवाड्यांमध्ये गेल्यानंतर दर्याच्या राजाचे हे वाडे मुंबईच्या विकासाबाबत निश्‍चितच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. कुलाबा, वरळी, माहीम, धारावी, शीव या कोळीवाड्यांमध्ये तर मुंबईचा इतिहास शोधण्यासाठीच्या खाणाखुणा आहेत. पण, झोपडपट्‌टीच्या जवळ नेऊन ठेवल्या गेलेल्या या कोळीवाड्यांच्या या अवस्थेला जबाबदार कोण? अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. ‘‘कोळी समाजाला कधीच टॉवरमध्ये राहायचं नाही. माशाच्या पाट्या आणि जाळी घेऊन तीनशे चौरस फुटांच्या घरात मासेमारीचा धंदा कसा जगेल? कधी ‘एसआरए’, कधी टॉवर अशी आमिषं कोळी समाजाला दाखवली जातात. पण, हा समाज या भूलथापांना बळी पडत नाही. मासेमारी आणि कोळ्यांची संस्कृती टिकावी, हा आमचा आग्रह आहे,’’ तांडेल ठणकावून सांगतात.

मुंबईच्या विकासाचा, उत्कर्षाचा साक्षीदार असलेला कोळी समाज मात्र यापासून कायम विन्मुख राहिला आहे. मासेमारी या पारंपरिक धंद्यातूनच संस्कृती, भाषा, समाज एकसंध ठेवताना कोळी समाज दिसतो. गावांमध्ये ज्याप्रकारे तंटानिवारण समिती किंवा समाजाचे पंच न्यायनिवाडा करतात, त्याप्रमाणे मुंबईतल्या प्रत्येक कोळीवाड्यामध्ये पंचाचे न्यायनिवाडे चालतात. ‘‘मुंबई हेच आमचं गाव आहे. प्रत्येक समाज मूळ गावात आपला समाज टिकवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक कोळीवाड्यात पंच असतात. लहान-मोठे तंटे हे पंचच मिटवतात. पंचांमार्फत मिटलं नाही, तरच कोळी समाज न्यायालयाची पायरी चढतो,’’ तांडेल समाजात असलेल्या बांधीलकीविषयी बोलत होते. मासेमारी आणि कोळ्यांची संस्कृती, यावर खरंतर स्वतंत्रच लिहायला हवं.

ब्रिटिशांनीदेखील कोळी समाजाला मान देत गिरगाव चौपाटीवर मोकळ्या जागांवर बोटींचे नांगर टाकायला परवानगी दिली होती. कोळ्यांच्या संस्कृतीला हात लावायचा नाही, हा नियम कटाक्षानं त्यांनीदेखील पाळल्यानं ताजे मासे ब्रिटिशांना खिलवणारा हा कोळी समाज १८व्या शतकापासून मासेमारी करण्यासाठी कर देत मुंबईच्या उत्पन्नात भर टाकत होता. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा मुंबईच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा या कोळी संगीतावर थिरकल्या होत्या.

ओबामादेखील कोळ्यांची टोपी घालून मिरवले होते. तांडेल सांगतात, ‘‘मुंबईला कोळी समाजानं संस्कृती, चमचमीत मासे, कोळी गीतं असा ऐवज दिला. पण, त्या मोबदल्यात मुंबईनं काय दिलं...’’  या प्रश्नाचं उत्तर कोळीवाड्यांकडं पाहिल्यावर नकारात्मक मिळतं. निदान पर्यटनाला समोर ठेवून एखादातरी कोळीवाडा ‘हेरिटेज’ म्हणून जतन करण्याची वेळ आली आहे. मुंबईत कोळी समाज कधीपासून निवासी असेल, याचा शोध घेत अभ्यासक बाराव्या शतकापर्यंत गेलेले दिसतात. मुंबईत पहिली बोलली जाणारी भाषा ही कोळी समाजाचीच असावी, असा एक कयास आहे. मुंबई या नावाविषयी अनेक वदंता सांगितल्या जातात. त्यापैकी मुंगा या कोळी समाजाच्या देवीवरून मुंबादेवी, जिला मुंबईचं कुलदैवत मानलं जातं, अशीही वदंता आहे. पुढच्या आठवड्यात होळीचा सण आहे, जो कोळी समाजाचा प्रमुख सण मानला जातो. नऊ मार्चला होळी असली, तरी वरळी कोळीवाड्यात मात्र एक दिवस अगोदर आठ मार्चला होळी असेल. मुंबईतल्या पहिल्या होळीचा मान वरळी कोळीवाड्याला असल्यानं ही मानाची होळी एक दिवस अगोदर शतकानुशतकं साजरी होतेय. मुंबईच्या इतिहासात कोळ्यांना असणारं मानाचं स्थान भविष्यातही अबाधित राहील काय, याविषयी मात्र कोळीवाड्यांची सध्याची अवस्था पाहून शंका वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article deepa kadam