सतरंगी गर्दीला ‘डर्बी’ची झिंग

दीपा कदम deepakadam3@gmail.com
Wednesday, 5 February 2020

पुणे, बंगळूर, दिल्ली, काही प्रमाणात हैदराबादमध्येही अश्वशर्यती होतात. पण, मुंबईतल्या ‘डर्बी’चं महत्त्व काही औरच. महालक्ष्मी मैदानावर मुख्य ‘डर्बी’ सुरू होते, तोवर संध्याकाळ झालेली असते. वाऱ्याच्या वेगानं घोडे धावत असतात. सतरंगी गर्दीला उधाण आलेलं असतं. कॅन्व्हासवर उतरवावं असं ते मुंबईचं विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी या मैदानावर एकदा तरी जायला हवं.

रुळांवर पाणी साचून लोकल बंद पडल्याशिवाय मुंबईकरांना पावसाळा सुरू झाल्यासारखं वाटत नाही, त्याचप्रमाणे घराघरांतले पंखे बंद झाल्याशिवाय थंडी आल्यासारखे वाटत नाही. अशी ‘पंखा-बंद’ थंडी मुंबईत पडते फेब्रुवारीमध्ये. अधूनमधून का होईना; पण छान गारवा असतो हवेत. अशा वातावरणात मुंबईचा मूडही जरा सांस्कृतिक वगैरे होऊन जातो. एरवी हे शहर सतत भाकरीसाठी पळत असतं. या वातावरणात ते जरा फुलांकडं पाहू लागतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मानवी मनाची ती गरज भागविणाऱ्या विविध सांस्कृतिक उत्सवांचा बहर पाहायला मिळतो तो याच महिन्यात. नुकतीच ‘मुंबई कलेक्‍टिव्ह कॉन्क्‍लेव्ह’ झाली. हा डाव्या विचारवंतांनी सुरू केलेला सांस्कृतिक-वैचारिक आदान-प्रदानाचा मंच. तेथील चर्चांनी तापलेले वातावरण थंडावतं न थंडावतं, तोच येथे ‘काळा घोडा महोत्सव’ सुरू होईल. शहराचं कलासंचित पाहण्यासाठी तिथं रसिकवृंदांचे थवेच्या थवे जमतील. या सोबतीला पुन्हा मुंबई चित्रपट महोत्सव ‘मामी’ आहेच. यानिमित्तानं होणारं सांस्कृतिक-वैचारिक अभिसरण शहराला समृद्ध करीत असतं.

हे सुरू असतानाच, तिकडं महालक्ष्मी रेसकोर्सच्या हिरवळीवर वेगळीच धांदल सुरू असते. अश्वशर्यतीची. तिचं नाव ‘डर्बी’. पुणे, बंगळूर, दिल्ली, काही प्रमाणात हैदराबादमध्येही अश्वशर्यती होतात. पण, मुंबईतल्या ‘डर्बी’चं महत्त्व काही औरच. या अश्वशर्यतींना मोठा इतिहास आहे. त्या इथं सुरू झाल्या १८व्या शतकाच्या उत्तरार्धात. २५ नोव्हेंबर १७९७ च्या ‘बॉम्बे कुरिअर’मध्ये या अश्वशर्यतीचा उल्लेख आहे. या शर्यतींवर पैजा लागल्याची नोंद १८८०च्या पूर्वीची आहे. या पैजांचे रूपांतर कालांतरानं जुगारात झालं. आता ‘महालक्ष्मी रेसकोर्स’वरील दीड-दोन मिनिटांच्या या अधिकृत जुगारात कोट्यवधींची उलाढाल होते. त्याचा सर्व कारभार चालतो ‘रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्‍लब’मार्फत. वर्षाला ७० शर्यती घेण्याची मुभा या क्‍लबला आहे. त्या शर्यतींपैकी ‘डर्बी’ महत्त्वाची. ती फेब्रुवारीच्या प्रारंभी महालक्ष्मी मैदानावर होते. २२५ एकरांचं हे हिरवंकंच मैदान. मध्ये रस्ता आणि त्यापलीकडं विस्तीर्ण सागर... याला ‘मुंबईचं फुफ्फुस’ का म्हणतात, हे कळतं. मुख्य ‘डर्बी’ सुरू होते, तोवर संध्याकाळ झालेली असते. वाऱ्याच्या वेगानं घोडे धावत असतात. सतरंगी गर्दीला उधाण आलेलं असतं. कॅन्व्हासवर उतरवावं असं ते मुंबईचं विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी या मैदानावर एकदा तरी जायला हवं.

ब्रिटिश डामडौल कायमच
या ‘डर्बी’चा उगम मुळात ब्रिटनमधला. तेथील सरे प्रांतात बाराव्या अर्ल ऑफ डर्बीनं सुरू केलेल्या अश्वशर्यतीचं हे नाव. ब्रिटिश सत्तेनं मुंबईला ज्याप्रमाणे मुंबईपण दिलं, विविध वास्तू दिल्या, क्रिकेट दिलं, त्याप्रमाणेच ही अश्वशर्यतही. आजही ती त्याच ब्रिटिश डामडौलानं सुरू आहे. ड्रेस कोड काटेकोरपणे पाळला जातो. पुरुषांसाठी थ्री पीस सूट असा वस्त्रनियम आहे. ललनांच्या वेशभूषेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या डोईवरच्या टोप्या. अवघी लंडन फॅशनच तिथं पाहावयास मिळते. पायघोळ गाऊन, आखूड मिडीज... वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक टोप्या मात्र मस्ट. यात आणखी एक वेगळेपण असतं. म्हणजे, एरवीच्या पर्सऐवजी इथं या वनिता मंडळाच्या हाती दिसते अश्वांची समग्र माहितीपुस्तिका. बेटिंगसाठी मैदानात उतरलेल्या महिलांची हौस पाहण्यासारखी असते. ते पुस्तक हाती लागलं; पण ते अगम्य होतं. शेजारी बसलेल्या फारूक यांना गोंधळ लक्षात आला. ते गेली २५ वर्षे नियमित शर्यतीसाठी येतात. त्यांनी सांगितलं, या पुस्तकात प्रत्येक घोड्याचा इतिहास असतो, त्याचं वय, वजन किती, त्यानं या मोसमात किती शर्यतीत भाग घेतला, तिथं त्याची कामगिरी कशी राहिली... हे सर्वच असतं. घोड्याप्रमाणे जॉकीपण महत्त्वाचा असतो. या सर्वांचा बारकाईनं अभ्यास करून निर्णय घ्यायचा असतो.

त्या दिवशी कंबरेत वाकलेली पारशी जोडपी, स्थूल गुजराती कुटुंबं यांबरोबरच तुरळक प्रमाणात मराठी कुटुंबंही विशेष गॅलरीमध्ये होती. त्यालाच लागून असलेल्या सर्वसाधारण गॅलरीतील माहोल मात्र वेगळा होता. मुंबईतले हे दोन वर्ग रेसकोर्सवर ठळकपणे दिसू शकतात. स्टेडियममध्ये अश्व ज्या दिशेनं येतात, त्याच्या डाव्या बाजूला क्‍लबचे सदस्य, शहरातील निमंत्रित, तर उजव्या बाजूला आम जनता. काही नियमित रेसरसिक ‘डर्बी’साठी सहकुटुंब आले होते. इथल्या अधिकृत जुगारामध्ये तर हा वर्ग भाग घेतो; पण हातावर टाळी देत घोड्यावर पैसे लावणारेही या गर्दीत अनेक सापडतात. पैसे बुडाल्यावर विन्मुख झालेले दिसतात; पण ‘व्हीआयपीं’च्या गॅलरीमध्ये मात्र कोण जिंकलं, कोण हरलंय, हे ओळखणं कठीण. उन्मादाचा एक ‘कश’ ओढण्यासाठी आलेल्यांना डाव जिंकण्याशी नव्हे, तर खेळण्याशी मतलब होता.

मुंबईला लाभलेला वेगळा ‘जॅकपॉट’
पैसे लावून नशीब आजमावणारे शर्यत सुरू झाल्यावर जिवाच्या आकांतानं स्वतः लावलेल्या घोड्याला ‘चिअर अप’ करीत असतात. मैदानात उसळलेला वारूदेखील या आवाजानं बेभान होत वाऱ्यावर स्वार होत या आवाजाला साथ देतो. जायंट स्टार, फ्लाइंग विझिट, फॉरेस्ट फ्लेम, सालाझार, गोल्डन ओक्‍स या नावांचे अश्व धावत होते आणि त्यांच्या एकेका टापेसरशी गर्दीच्या दिलाची धडकन तेज होत होती. माणसे जणू उन्मादी समाधीत गेली होती. या वेळेची ‘डर्बी’ जिंकला तो ‘वॉर हॅमर’ नामक अश्व.

दक्षिण मुंबईत समुद्रकिनारी असलेला हा एकमेव मोकळा पट्टा आहे, जिथं सकाळ-संध्याकाळ खास दुरूनदेखील चालायला येणारे मुंबईकर आहेत. मुंबईत इतकी मोकळी जागा शोधूनही सापडणार नाही. महालक्ष्मी रेसकोर्सच्या आजूबाजूला दाटीवाटीने टॉवर उभे राहिले आहेत. ‘मेट्रो’साठी रेसकोर्सच्या जागेचा काही पट्टा गेला आहे. दर पाच वर्षांनी रेसकोर्सच्या जागेवर व्यावसायिकांची नजर जात असते. पण, या अश्वशर्यतीची झिंग अशी और आहे. खासकरून येथील नवकोट नारायणांच्या, लब्धप्रतिष्ठित धनिक-वणिकांच्या, नवश्रीमंतांच्या मनात, की केवळ त्यांच्या हौसेमुळे तरी मुंबईतील ही मोकळी जागा अजून अतिक्रमणापासून वाचली आहे. मुंबईला लाभलेला हा वेगळाच ‘जॅकपॉट’ म्हणावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article deepa kadam on horse derby