esakal | बॉलिवूड,‘सीबीआय’ आणि बरेच काही... 
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी पाटण्याला रवाना होताना.

चंदेरी दुनियेतील पडद्यामागच्या क्रूर वास्तवाचे धुणे सध्या जाहीरपणे धुतले जाते आहे. माध्यमातून ‘न्यू नॉर्मल’वाला ‘कोरोना’ही मागे फेकला गेला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरूनही राजकारण केले जात आहे.

बॉलिवूड,‘सीबीआय’ आणि बरेच काही... 

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

चंदेरी दुनियेतील पडद्यामागच्या क्रूर वास्तवाचे धुणे सध्या जाहीरपणे धुतले जाते आहे. माध्यमातून ‘न्यू नॉर्मल’वाला ‘कोरोना’ही मागे फेकला गेला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरूनही राजकारण केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुंबई समुद्रकिनाऱ्यासाठी ओळखली जाते. दाटीच्या वस्तीसाठी, अनागोंदीतही तग धरणाऱ्या व्यवस्थेसाठी, गुन्हेगारीसाठी आणि अर्थात बॉलिवूडसाठीही. सिनेमाप्रेमी नागरिक दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा पाहतात, नववर्षाला अन ईदलाही. वास्तवात काट्याकुट्यांचे आयुष्य जगताना काही काळ तरी लाईटस, साउंड, कॅमेऱ्याच्या झगमगाटात बुडवून टाकायला लोकांचे मन आसुसलेले असते. तेवढाच विरंगुळा किंवा तेवढीच झिंग. दरवर्षी दरसाल दोन हजार   सिनेमे तयार होतात. त्यात एक लाख ८३ हजार कोटींची उलाढाल होते. पांढरा पैसाच खूप आणि काळा तर अबब म्हणावा असा. दरवर्षी ३६५ सिनेमे तयार होतात. म्हणजे दरदिवसाला एक. त्यातल्या प्रत्येक सिनेमाशी दहा हजार लोक किमान जोडले गेलेले असतात. 

छोटा पडदा, मोठी उलाढाल 
छोटा पडदा आता उलाढालीत फारसा मागे नाही. तब्बल ७१ हजार कोटी तिथे गुंतवले अन्‌ उडवले जातात. घराघरात माध्यमे असतात; अन्‌ त्यात नवनवी स्वप्ने दाखवण्यासाठी हजारो तरुण मुंबई जवळ करतात. हिरो बनण्याचे स्वप्न बाळगणारी पोरे गाव सोडून येत, अमिताभ, शाहरूख होण्याच्या नादात पेट्रोलपंप, हॉटेल यात काम करत राहतात. अशा शेकडोंत उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान आणि मुख्यत्वे बिहारमधून आलेल्यांचा भरणा मोठा. त्यातले काहीच यशस्वी होतात. छोटे- मोठे यश टिकवणे, या उद्योगात तगून राहणे सोपे नसतेच.

अशाच पार्श्वभूमीचा एक तरुण सुशांतसिंह राजपूत. फरक एवढाच की हा पिटातला नाही तर अभियांत्रिकीचे शिक्षण देशात अव्वल गुण मिळवून पूर्ण केलेला तरुण. देखणेपणाला नृत्याची, चांगल्या अभिनयाची जोड असल्याने चांगल्या रीतीने यशस्वी झालेला. छोट्या पडद्यावर महानायक म्हणून गाजला; अन्‌ मोठया रुपेरी दुनियेतही स्थिरावला. या स्थिरावण्यानेच जे खुपू लागले ते पार जीवनाच्या अंतापर्यंत गेले. यश बॉलिवुडी असेल तर ते बरेच ‘बॅगेज‘ घेऊन येते. पैसा येतो, छोकऱ्या येतात अन्‌ त्याचबरोबर एकाकीपणाही.

तो पाचवीला पूजला जातो म्हणा ना. जुने बंध नको होतात, कुटुंब परके वाटू लागते. सुशांतलाही तसेच झाले असावे. प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेला पोरगा एकटेपणाच्या गर्तेत पोहोचला कसा हे  त्याच्या अभागी पित्याला उमगले नसेल. परक्‍या झालेल्या या मुलाचे जाणे चटका लावणारे, पण ते इतके कटू होईल, असे वाटले असेल का कुणाला?

रोजचे मरण 
तरुण वयात इहलोक सोडून गेलेला सुशांत आता रोज मरतो आहे. हे मरण माणुसकीच्या खांद्यावरचे नसून, ते अतिलोभाच्या, संपत्तीच्या दुर्गंधीचे आहे. त्यात सेलेब्रिटी आहे, पैसा आहे, विवाहाच्या आणाभाकांना फाटा देऊन ‘नातिचरामि’चा आदर्श मान्यच नसलेले जीवन आहे. सर्वसामान्यांना अप्राप्य. चंदेरी दुनियेतील पडद्यामागच्या क्रूर वास्तवाचे धुणे सध्या जाहीरपणे धुतले जाते आहे. माध्यमातून ‘न्यू नॉर्मल’वाला ‘कोरोना’ही मागे फेकला गेला आहे.
बिहारमधल्या परिस्थितीमुळे हजारो लाखो रोजगारासाठी मुंबईकर होतात. त्यांच्यासाठी येथे यशस्वी झालेला सुशांत अर्थात ‘आयकॉन’. त्याच्या मृत्यूची चौकशी नीट होत नसल्याचे कारण देत बिहारचे पथक आले. त्यातल्या अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याने खरे तर संशय वाढला अन्‌ मग संघराज्यात कायम रंगणारा वाद सुरू झाला. तपास हा त्या त्या राज्याचा अधिकार असताना मुंबई पोलिसांच्या कार्यकक्षेत हस्तक्षेप झाला.

‘मेरे अंगनेमें...’
सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीबद्दलची तक्रार खरे तर बिहारमध्ये न करता मुंबईत करायला हवी. पण ही नियमबाह्यता संशयासमोर फार थिटी ठरणारी आहे, हे लक्षात आलेच नाही. आता सर्वाधिक व्यावसायिक कौशल्य असलेल्या मुंबई पोलिसांच्या वकुबाला साजेसे वर्तन झाले नाही असे थेट सर्वोच्च न्यायालयानेच नमूद केले आहे. ‘मेरे अंगनेमे तुम्हारा क्‍या काम है’ हा खरे तर या प्रकरणातला वैध प्रश्न. पण राजकीय वास्तवात ‘मी- तू’पणाचे खेळ रंगणार असल्याने ते मागेच पडले. प्रादेशिक विरुद्ध राष्ट्रीय, निवडणूकपूर्व युती ते नंतरची तिहेरी आघाडी असे सगळे विरोधाभास आता समोर येणार हे निश्‍चित. त्यातच बॉलिवूडच्या रोजगारक्षमतेची जाणीव करून देत पुढची पिढी सक्रिय झाली. ती संशयग्रस्त करण्याचा प्रयत्न होणार, हे दिसतेच आहे.

आंतरराज्यीय व्याप्ती असलेली प्रकरणे ‘सीबीआय’कडे जातात. बॉलिवूडमध्ये एकेकाळी गुन्हेगारांचा पैसा पार्क केला जाई. ‘राम तेरी गंगा मैली’ची चर्चा होते, तशीच बॉलिवूडचीही होते. ‘सीबीआय’ प्रकरणे, त्यामागचे हिशेब हे सगळे सूज्ञांपासून लपलेय थोडेच? पण या सगळ्यातून सत्य बाहेर येणार की नाही, हा प्रश्न अनेकांना सतावतोय. विशेषतः समाजमाध्यमांवर व्यक्त होत असलेल्या तरुणाईला या प्रकरणात हा प्रश्न फारच तीव्रतेने भेडसावतोय असे दिसते.

Edited By - Prashant Patil