esakal | वाचाळता की राजकारण?
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

संजय राऊत चाणाक्ष अन्‌ हुशार नेते. एरवी ते तोलूनमापून विधाने करणारे म्हणून ओळखले जातात. पक्षाची दिशा दर्शवणारी विधाने ते करत असतात. मात्र, सध्या ते जे बोलत आहेत तो निव्वळ वाचाळपणा आहे, की त्यामागे काही राजकारण आहे? 

वाचाळता की राजकारण?

sakal_logo
By
मृणालिनी नानिवडेकर

मुंबई महानगरात एकेकाळी गुंडाराज होते, ते सत्ताधीशांच्या आशीर्वादाने फोफावले होते, असे म्हणत. लेखक, पत्रकार त्यावर कादंबऱ्या लिहीत. महानगर गुन्हेगारी टोळ्यांना सामावून घेत जगल्याने या जागतिक दर्जाच्या शहरात बॉम्बस्फोट घडले. ते कोणत्याही धर्माच्या नव्हे, तर मानवतेच्या नावावरचा डाग होते. सत्ताधारी राज्यकर्त्यांशी धागेदोरे असल्याशिवाय, किंबहुना त्यांच्यातील काहींचा वरदहस्त अन्‌ बऱ्याच जणांची डोळेझाक असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे अवैध काम प्रत्यक्षात येऊ शकत नाही, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. ती खरी का खोटी, असे प्रश्‍न भेडसावणारा काळ टोळीयुद्धावर नियंत्रण आल्याने मागे पडला. पण अशा विस्मृतीत गेलेल्या विषयाला उकरून काढण्याचे काम महाविकास आघाडी सरकारचा प्रत्यक्ष भाग नसलेल्या; पण महत्त्वाचा नेता असलेल्या खासदार संजय राऊत यांनी केले आहे. महाविकास आघाडीचे ते शिल्पकार. गेल्या काही दिवसांपासून ते काही कारणाने नाराज आहेत, असे म्हणतात. ‘आपण नाराज नाही’ असे जाहीरपणे नमूद करून प्रत्यक्षात ते सरकारला अडचणीत का आणत आहेत, हा प्रश्‍न शिवसेनेतील बड्या नेत्यांना पडला असावा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

न उलगडणारे कोडे
महाराष्ट्र ही युद्धातील पराक्रमाची भूमी; तशीच धारदार विचारांचीही जन्मभूमी. तलवारीचे पूजन इथे झाले, तसेच तिखट जिभेचाही या प्रदेशाने कायम अंगीकार केला. बुद्धिवंतांना तसेही वाणीचे कौतुक; पण सध्या येथे वाचाळवीरतेला केवळ उधाण आलेय. सत्ताधारी बाकांवर बसल्यावर भाषा सावधगिरीने वापरायची असते, उक्‍तीपेक्षा कृतीवर भर द्यायचा असतो; पण आजवर भाजपसमवेत चालवलेल्या सरकारला कायम घरचाच आहेर देण्याची शिवसेनेला सवय झाली आहे. शिवसेनेच्या वरच्या फळीतले नेते राऊत राज्यात सत्तारूढ आघाडीतील सहकारी पक्षावर का बोलले, ते न उलगडणारे कोडे आहे. वाटेल ते आरोप सहन करायला काँग्रेसला कृपा करून भाजप समजू नका, असा थेट हल्ला नागपूरचे मंत्रिमहोदय डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे. विकास आघाडीत जे काही राजकारण यानिमित्ताने चालेल ते चालेल. चिडलेल्या भाजपने या निमित्ताने पुन्हा सवयीनुसार टीकाटिप्पणी केली आहेच. राजकीय मंडळींना परस्परांची उणीदुणी काढणे आवडते, त्यामुळे ते होत राहील. भाजपमध्येही प्रजापती, मुन्ना यादव यांसारखी मंडळी आहेत, त्यामुळे प्रश्‍न सत्तेच्या बाहेर गेलेल्या भाजपचा अन्‌ त्यांचा संजय राऊतांशी असलेल्या संबंधांचा नाही, तर प्रश्‍न नव्यानेच उजेडात आलेल्या माहितीचा आहे.

...तर चौकशी हवी
 मुंबईतील पोलिस आयुक्‍तांच्या नेमणुका खरोखरच गुंडांच्या सल्ल्याने होत असत का? ‘तुमचा दाऊद तर आमचा गवळी’ ही भाषा फार जुनी नाही. पोस्टिंग, पदोन्नती या वादातल्या अधिकाऱ्यांनी पोलिस दलात एकमेकांचा काटा काढण्यासाठी टोळ्यांचा वापर केला, हेही वास्तव आहे. महानगरात दिवसाढवळ्या हत्या झाल्या, खंडण्या मागितल्या गेल्या. नंतर बनावट चकमकींचे युग आले. महानगरातील निष्पाप मंडळींनाही या प्रकाराची किंमत मोजावी लागली. उद्योग दूर गेले. ते राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने घडत होते, हे संजय राऊतांसारखा जबाबदार नेता सांगत असेल, तर त्या प्रकाराची चौकशी व्हायला हवी. आज करीम लालाच्या वारसांपासून हाजी मस्तानच्या नातलगांपर्यंत अनेकजण राजकीय बडी मंडळी त्यांच्या घरी कशी येत, याबद्दल मुलाखती देत सुटले आहेत आणि प्रसारमाध्यमेही त्यांच्या त्या मुलाखतींना प्रसिद्धी देत आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा विषय एकेकाळी चलनात होता, त्यात ओल्याबरोबर सुकेही जळले; पण त्यामागचे सत्य एवढे विदारक आहे काय? सरकार स्थापन झाले ते नैतिक आधारावर नव्हे, तर दिलेला शब्द फिरवला गेला म्हणून. ते स्थिरस्थावर व्हायला वेळ लागेल; पण तोवर स्टेपनी कोण अन्‌ चालक कोण, असे प्रश्‍न जाहीर मंचावरून होणे, हे सरकारमध्ये सगळे आलबेल नाही का काय, असा प्रश्‍न निर्माण करणारे आहे. शिवाय, आज शिवसेनेतील महत्त्वाचा नेता जे विधान करतो, ते दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च नेता शांतपणे फिरवतो आहे.  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात संजय राऊतांना माफ करताहेत, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कडक शब्दांत फटकारे देत आहेत. वारसाचे प्रश्‍न दूर, जी वक्‍तव्ये होत आहेत ती का, ते तपासणे भाग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या उपमुख्यमंत्रिपदावरून अजितदादा पवार निर्णयांचा धडाका लावताहेत; अन्‌ शिवसेना मात्र वादळे निर्माण करते आहे. खरे म्हणजे राऊत अत्यंत चाणाक्ष अन्‌ हुशार नेते, तोलूनमापून विधाने करणारे. पक्षाची दिशा दर्शवणारी विधाने ते करत असतात. सध्या ते अकारण वाद सुरू करत आहेत, की त्यामागे काही राजकारण आहे?