राजधानी मुंबई : अज्ञानी बाबाची भयावह गोष्ट

गेल्या काही वर्षात ड्रग सेवनाबद्दलची अणि विशेषत: मुंबई या व्यापाराचे मुख्यालय झाल्याच्या ज्या बातम्या येताहेत, त्या धक्कादायक आहेत.
Cruse
CruseSakal

शाहरुखखान हा लोकप्रिय अभिनेता. सुपरस्टार झाल्यावर आपल्याला जे जे मिळाले नाही ते ते आपल्या मुलाला मिळावे असे त्याने ‘सिमी गरेवाल शो’मध्ये कधीतरी सांगितले. ते गमतीने का तळमळीने ते कळायला मार्ग नाही. थकलेला बाबा वेळ देवू शकत नसल्याने मुलगा ड्रगसेवनात ओढला गेला का, तेही कळायला मार्ग नाही. प्रश्न शाहरुखच्या मुलापुरता मर्यादित असता तर गोष्ट वेगळी होती.

गेल्या काही वर्षात ड्रग सेवनाबद्दलची अणि विशेषत: मुंबई या व्यापाराचे मुख्यालय झाल्याच्या ज्या बातम्या येताहेत, त्या धक्कादायक आहेत. मध्यमवर्गीयांची झोप उडवणारी आहेत. आजच्या इतकी ‘पालकपणा’ची भीती कधीच वाटली नव्हती, याची जाणीव करून देणारी आहेत. जगात कोकेन, वीड एमडी याची सर्वाधिक विक्री मुंबईत होते, अशी माहिती तपाससंस्था उघड करत आहेत. पालक करिअर करताहेत. पैसे कमावणे त्यांना आवश्यक आहे. त्या दगदगीत थकलेल्या बापांना अन आयांनाही मुलांचे काय सुरु आहे, याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. तरुणाईच्या वागण्यापासून अनभिज्ञ असलेल्या पालकांच्या अन् समाजाची झोप उडवणारे आहे.

बुडती हे जन...

गेल्या आठवड्यात आमदारांचा अभ्यासवर्ग झाला, तेथेही या चिंतेची प्रचिती आली. अर्थसंकल्पातील रक्कमेचा कसा विनियोग करायचा याबद्दलचा तो अभ्यासवर्ग होता. यामिनी जाधव यांनी एक वेगळा प्रश्न विचारला. त्या मुंबईतील भायखळ्याच्या आमदार. शिवसेनेच्या रणरागिणी अशी त्यांची ओळख. त्यांचा प्रश्न होता नव्या पिढीच्या चिंतेचा. व्यसनाधीनता मुंबईतल्या तरुणाईला विळख्यात घेते आहे. उद्याच्या या नागरिकांना वाचवण्यासाठी आमदार फंडातून नशामुक्ती केंद्रे आपण स्थापन करू शकू का? तशी परवानगी मिळेल का? असे प्रश्न त्या विचारत होत्या. ‘बुडती हे जन देखवेना डोळा’ ही वेदना स्वरातून जाणवत होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अशी केंद्रे उघडणे शक्य आहे, असे सांगितले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील या अभ्यासवर्गाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी योग्य ती पावले उचलून लगेचच जिल्ह्याजिल्ह्यांत समुपदेशन केंद्रे उघडण्याचे आदेश दिले. ती केंद्रे आता सुरु होतील.

सरकारला प्रश्न तर कळला; पण व्याप्तीही कळेल? ती तरुण कुमार मुलामुलींच्या कुटुंबांना कळणे गरजेचे आहे. उच्च नव्हे तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांचे उत्पन्न वाढले आहे. चैनीसाठी पैसा वापरण्याचे अप्रूप राहिलेले नाही. सोशल ड्रिकिंगबद्दल बहुतांश कुटुंबात विरोध नाही. मुले हे पाहात मोठी होताहेत. आईवडिलांना मुलांसाठी वेळ नाही. मुंबईच्या कुटुंबात आजीआजोबा फार ठिकाणी दिसतच नाहीत. केवळ काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे पालक घरी असल्याने मुलांच्या आत्महत्येचे प्रमाण १५ टक्क्यांनी खाली आल्याची पाहणी प्रसिद्ध झाली आहे. मुलाला वेळ देण्यापेक्षा पैसे देण्याचे दिवस आले आहेत. ते अधिक महत्त्वाचे मानले जाते आहे. घराव्यतिरिक्त मुलांसाठी फार काही पर्याय नाहीत. तरुण पिढीसमोर फारसे आदर्शही उरलेले नाहीत. देशासाठी, समाजासाठी काही करायचे याचे बाळकडू मिळतच नाही. मॉलला जाणे हा वेळ घालवण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग ठरलेल्या मुंबईचे अन कुठल्याही क्रयशक्ती असलेल्या शहराचे चारित्र्यच बदलले आहे. काही वर्षांपूर्वी अनिल अवचट आणि आनंद नाडकर्णी या दोघा समाजहितैषी डॉक्टरांनी मादकद्रव्यांविरोधात अभियान मुंबईत सुरु केले होते. आज त्याची गरज आहे.

वीड ,एमडी ही देशात तयार होवू शकणारे पदार्थ. भेसळयुक्त हेरॉईनची एक ग्रॅमची किंमत १५०० रुपये. शुध्द किकेनचा भाव एका ग्रॅमला सात हजार. तेवढे पैसे मोजणारे तरुण आहेत. यातल्या बऱ्याच पदार्थांचा वास येत नाही .त्यामुळे मुले- मुली झुरका मारून घरी जातात,अन काहीच न झाल्यासारखे वागतात. घातक परिणाम शरीरात भिनत जातात. पाच दहा वर्षांनी लक्षात येईल, तेव्हा तरुण देहांची खोकी झालेली असतील. या क्षेत्रात काम करणारे व्यसनमुक्तीचे समुपदेशन करणारे डॉ.युसुफ मर्चंट सांगतात, की ‘म्याऊ म्याऊ’ हा अमली पदार्थ तर महाविद्यालयांलगत विकला जातो आहे. मुंद्रा बंदरावर प्रचंड मोठा साठा नुकताच सापडला. खिसे गरम झाले, की तपास यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याची उदाहरणेही आहेत. हजारो कोटींची समांतर अर्थव्यवस्था मादकपदार्थांच्या तस्करीतून उभी रहाते आहे.अफगाणीस्तानातील अशांततेमुळे व्यापार मुंबईत हलवण्याचे मनसुबे आहेत. रात्र वैऱ्याची आहे अन् दिवसही.

‘कोकेन’चे दाहक वास्तव

मुंबईत येणाऱ्या कोकेनच्या साठ्यातील जेमतेम १० टक्के कोकेन छाप्यात सापडते, असे सांगण्यात येते. हे कोकेन कॉलेजात, सार्वजनिक उद्यानाच्या ठिकाणी मुलांना विकले जाते. एक किलो कोकेनची किंमत पाच कोटी. जागतिक बाजारपेठेने मुंबई हे ‘कोकेनहब’ केल्याची भयावह माहिती गेल्या वर्षी मिळाली. ऑस्ट्रेलिया, कॅनडातून मुंबईत गेल्या वर्षी २४९९ किलो कोकेन आले, असा अंदाज आहे. इजिप्त ब्राझिलमार्गे श्रीलंकेहून मादक पदार्थ मुंबईच्या बंदरात पाठवले जातात. ते ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या यंत्रणा आता बदलल्या आहेत. मोठया दलालांऐवजी तरुण मित्र हे पदार्थ मित्रांना विकतात. त्यांना दलालीचा पैसा नशेखोरीसाठी पुरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com