esakal | मुंबई मॉडेल - कार्यपद्धती आणि बोलबाला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Life

मुंबई मॉडेल - कार्यपद्धती आणि बोलबाला

sakal_logo
By
- मृणालिनी नानिवडेकर

मुंबईचे आयुक्तपद इक्‍बालसिंग चहल यांनी पहिल्या लाटेवेळी स्वीकारले. त्यानंतर धडक कारवाई, निर्णयांवर निर्णय, कामांचे विकेंद्रीकरण आणि प्रसंगी स्वतःच्या संपर्कांचा वापर करून मुंबईला दुसऱ्या लाटेच्या आपत्तीतून बाहेर काढले. मुंबई मॉडेलचे सध्या कौतुक होते आहे, तरीही सावधानता महत्त्वाचीच आहे.

भारताची कोरोनाने दाणादाण सुरू असताना मुंबई सावरते आहे. रुग्णसंख्येचा आलेख घसरतो आहे. मुंबई मॉडेलचा बोलबोला आहे. टिकेचे धनी झालेले महाविकास आघाडी सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे महानगर मुंबई कसे कोरोना संकट दूर करु शकले हे सांगून पत वाढवू शकते. याचे श्रेय आयुक्त इक्‍बालसिंग चहल आणि महापालिका व्यवस्थापनाला आहे. पण जे साध्य केले ते कौतुकास्पद आहे.

कोरोनाचे संकट तसे वैश्विक. त्याची व्याप्ती जागतिक. प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशांनी कोरोनाचा कसा सामना केला, त्या-त्या ठिकाणची लढण्याची परिमाणे काय होती याचा लेखाजोखा पुढची कित्येक वर्षे अभ्यासाचा विषय ठरेल. हिशेब मांडला जाईल. त्यातून चुका कळतील. हे स्वाभाविकच असेल. मानवजात शिकत समजतच पुढे जात असते. देशांच्या कहाण्या जशा तपासल्या जातील तशीच महानगरांच्या प्रतिसादाची चिकित्सा होईल. त्यामुळे मुंबई मॉडेलची चर्चा महत्वाची ठरते. ती सुरू करण्यापूर्वी जगातल्या आघाडीच्या महानगरांनी कोरोना कसा हाताळला ते थोडक्‍यात पाहावे लागेल. न्यूयॉर्कला पहिल्या लाटेने पार गारद केले, मृत्यूंचे हादरवणारे आकडे, अंत्यसंस्कारांसाठी लागलेल्या रांगांची करूण कहाणी सांगत होते. मग उपचारपद्धती विकसित होत गेली. अनुभवातून उपचारपद्धती निश्‍चित होत गेली. तुलनेत लंडन वाचले. तेथे लॉकडाऊन आणि लसीकरण असा दुहेरी प्रयोग उत्तम यश देवून गेला. इटालीला कोरोनाने खूप छळले, दम लागला लढताना. पण रोम, मिलान ही तुलनेने कमी लोकसंख्येची शहरे. त्यांची मुंबईशी तुलना करणे अयोग्य.

मुंबई सावरली

भारतातले बघितले तर दिल्लीत माजलेला हाहा:कार अंगावर काटा आणणारा. बंगळुरूही चिंता वाढवणारे. पहिल्या लाटेत मुंबईचीही दाणादाण उडालेली. खरे तर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे विलगीकरण योग्य झाले असते तर कदाचित महाराष्ट्रातला फैलाव आटोक्‍यात राहिला असता. आज केंद्र सरकारच्या ज्या चुका होताहेत तशीच गोंधळलेली निर्नायकी अवस्था त्यावेळी महाराष्ट्रात होती. त्यामुळेच राज्यातली सगळी मोठी शहरे आजारी होती, मोकळा श्वास घेणे मुश्‍कील झाले होते. दुसऱ्या लाटेतही पुणे, नाशिक, नागपूर ही शहरे फारशी सावरलेली नाहीत. मुंबई मात्र सावरण्याच्या मार्गावर आहे. कोरोना व्यवस्थापनात चमकदार कामगिरी करू शकले नाही, असा आरोप दररोज सोसणाऱ्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला मुंबईचा महाआधार मिळाला. वर्षापूर्वी धक्कातंत्राचा अवलंब करीत आयुक्तपदी नेमलेल्या इक्‍बालसिंग चहल यांनी या संकटाचा सामना करणारे मॉडेल तयार केले. ते अंमलात आणून ते थांबले नाहीत, तर देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी नेले.

कामकाजाचे विकेंद्रीकरण

कोरोनामुळे उडालेली दाणादाण रोखण्यात सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व खुजे ठरले असल्याने चहल यांची प्रशंसा होवू लागली. सध्या तरी दाटीवाटीने वाढलेल्या समस्याग्रस्त मुंबईची कोरोनास्थिती सुधारली आहे. फैलाव नियंत्रणात आहे. सार्वजनिक रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत. प्राणवायू व्यवस्थापनाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे कौतुक केले. राज्यकर्ते आणि प्रशासनावर रुसलेल्या न्यायालयांनी पाठ थोपटणे आजच्या स्थितीत फारच दुर्मिळ. चहल यांना ते भाग्य लाभले. अर्थात त्यांनी त्यासाठी प्रशासनातले सगळे कसब पणाला लावले. शिवाय अत्यंत खुबीने प्रसिद्धी तंत्राचाही वापर केला. चहल यांनी आयुक्तपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्याच दिवशी पीपीई सूट घालून रुग्णालयात शिरले. तेथील गैरव्यवस्थापनाच्या कहाण्यांमागचे कारण असणाऱ्या व्यवस्थापनाला तो इशारा होता. कामचुकारांनी बोध होता. ढेपाळलेली यंत्रणा कामाला लागली. त्यांनी मुंबई हाताळणाऱ्या व्यवस्थांचे केंद्रीकरण रोखून, शहराचे २४ विभाग केले अन बृहन्मुंबई या २४ भागात वाटून टाकली. रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हायचे असेल तर मदत करणारे कक्ष विकेंद्रीत झाले. ताण घटला. व्यवस्थापन सोपे झाले.

ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांचे सचिव ही जबाबदारी पार पाडणाऱ्या चहल यांची दिल्ली दरबारातल्या बड्यांबरोबर उठबस. ती ओळखपाळख वापरून चहल यांनी मुंबईच्या गरजा पूर्ण करून घेतल्या. थेट केंद्रीय गृहसचिव राजीव गुब्बा यांच्याकडेच वजन वापरले. एका रात्री जम्बो कोविड रुग्णालयाचा प्राणवायू पुरवठा कमी झाला तेव्हा चहल यांनी अतीदक्षता विभागातले तब्बल १६८ रुग्ण निरनिराळ्या रुग्णालयात हलवले अन सगळ्यांचे जीव वाचवले. आयुक्त हिरो ठरले.

भान राखून घोषणा करा!

मुंबईकर तसाही जागरूक. संकटांशी सामना करण्याची सवय झालेला. तो कटाक्षाने मास्क वापरू लागला. पालिका प्रशासनही मुंबईच्या कार्यसंस्कृतीचा परिचय देणारे. संसर्ग रोखणे सुरू झाले. रुग्णसंख्येने या एकत्रित प्रयत्नांसमोर पडते घेतले, आलेख खाली आला. अर्थात चहल यांच्यासमोरची आव्हाने मोठी आहेत. चाचण्या कमी करत आकडेवारी दडपण्यात आली, असा आरोपही होवू शकेल. रुग्ण खासगी दवाखान्यात जातात, त्यामुळे महापालिका दवाखान्यातील खाटा रिकाम्या दिसतात, असेही आक्षेप आहेत. त्यातच चहल आजकाल दररोज वेगळी घोषणा करतात. लसीकरणाच्या विक्राळ आव्हानाचा अवघा देश सामना करतो आहे. लसी कुठेही नाहीत. अशा वेळी मुंबई महापालिका जागतिक निविदा काढते. त्यासाठी कुणाकुणाच्या परवानग्या आवश्‍यक आहेत? त्या मिळाल्या का? मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डात ११७ ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. केंद्रे सुरु होतीलही, पण लसी येतील कुठून? चहल यांची कोरोना कामगिरी महापालिकेतली सत्ता राखण्यासाठी शिवसेनेलाही मदतकारक ठरणारी आहे. फक्त घोषणा परिस्थितीचे भान ठेवून करायच्या असतात. लसीकरण उत्सवाचे काय झाले ते पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांनाही कळले नाही. गरज प्रश्नांवर यशस्वी तोडगे शोधण्याची असते, स्वप्ने विकणे खूप झाले हे भविष्यातले मुंबई मॉडेल लक्षात घेईल, ही अपेक्षा.

loading image
go to top