रंग मुंबईचे  :  मुंबईची गोष्ट सांगणाऱ्या वास्तू

दीपा कदम deepakadam3@gmail.com
Wednesday, 26 February 2020

महानगरी मुंबईची स्वत:ची एक कथा आहे. प्रस्तावित ‘हेरिटेज वॉक’मधून मुंबईची ही गोष्ट सांगता आली पाहिजे. मुंबईचा वारसा हा वास्तूंसोबतच या शहरात ज्यांनी रंग भरले अशांच्या योगदानासह सांगता आला, तर ऐतिहासिक वारशाला दिलेली ती सलामीच असेल.

‘मुंबईचे वर्णन’ हे गोविंद नारायण माडगांवकरांनी लिहिलेलं पुस्तक १८६३ मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. त्यातील मुंबई पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी काय पाहण्यासाठी यायचं; तर ‘टंकसाळ, गोदी, तोफखाना, सूताचे यंत्र, कापड विणण्याचे यंत्र, सर्व पदार्थ संग्रहालय, तारायंत्र, लोखंडी सडका, वेधशाळा, वैद्यशाळा, दारूखाना, टाऊन हॉल, पांजरापोळ, कुलाबदांडी, गिरण्या, उद्योग शाळा, पाठशाळा...’ याची सुरुवातीलाच नोंद यासाठी केलीय, की गेल्या आठवड्यात राज्य सरकारनं मुंबईत ‘हेरिटेज वॉक’ सुरू करण्याचं जाहीर केलं; त्या प्रस्तावित आराखड्यातही बहुतांश याच ठिकाणांचा समावेश आहे. जवळपास १६० वर्षांनंतरही मुंबईतील या ठिकाणांचं वैशिष्ट्य अजूनही कायम आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

पर्यटनाला चालना
दक्षिण मुंबईची ओळख ही मंत्रालय, सरकारी कार्यालयं, मुंबई उच्च न्यायालय, शेअर मार्केट आदींमुळे कायम गजबजलेली असते, अशी आहे. एका पाहणीनुसार, दक्षिण मुंबईत दर दिवशीचा ‘फूटफॉल’वीस ते पंचवीस लाख इतका आहे. मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटींच्या घरात गेलीय, यावरून दक्षिण मुंबईचं महत्त्व लक्षात येईल. इतक्‍या लोकांच्या भाऊगर्दीत सुमारे साडेतीनशे वर्षांचा इतिहास गुदमरत असेल, असं वाटतं ना... तर अजिबात नाही. तो अनुभवण्यासाठी सायंकाळ होण्याची वाट पाहावी लागते. ही गर्दीची लाट सायंकाळी सहाच्या सुमारास ओसरू लागते आणि हा मुंबईचा इतिहास आपल्यासमोर येतो. विशेषत: परदेशी पर्यटक रविवारी किंवा सायंकाळी दक्षिण मुंबईतल्या गल्ल्यांमध्ये हा इतिहास शोधताना दिसतात. परदेशी पर्यटक लंडनची सावली असलेल्या दक्षिण मुंबईतील १९व्या व २०व्या शतकात उभ्या राहिलेल्या व्हिक्‍टोरियन स्थापत्यकलेची कलाकुसर अनुभवताना दिसतात. स्थापत्य कलेचे सर्वोत्तम नमुने दक्षिण मुंबईत पाहायला मिळतात. देशी पर्यटकांना मात्र गेटवे ऑफ इंडियाशिवाय या ‘हेरिटेज मुंबई’त रस दिसत नाही; किंबहुना त्या दिशेनं मुंबईकडं पाहिलंच गेलं नसल्यानं पर्यटनाच्या दृष्टीनं दुर्लक्ष झालं आहे. ‘हेरिटेज वॉक’च्या निमित्तानं मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळेल.

मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन समितीच्या देखरेखीखाली दक्षिण मुंबईतील इमारतींचं जतन आणि डागडुजी केली जाते. मुंबईतील हेरिटेजचा वास्तूंचा विशेष अभ्यास असणाऱ्या आभा लांभांसारख्या कॉन्झर्व्हेशन वास्तुविशारद आणि ही समिती या वास्तूंची डागडुजी त्यांच्या मूळच्या सौंदर्याला बाधा पोचू नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबईतल्या जवळपास ६०० इमारती या ‘हेरिटेज’च्या वेगवेगळ्या श्रेणीमध्ये येतात. ओव्हल मैदानालाही ‘हेरिटेज १’चा दर्जा मिळालेला आहे, तर मरीन ड्राइव्हचा किनाराही या समितीच्या देखरेखीखाली आहे.

इतिहासाच्या खुणा
अलीकडेच पोस्ट मुख्यालय इमारतीच्या (जीपीओ) डागडुजीचं काम करण्यात आलं. त्या वेळी ‘जीपीओ’समोरच्या उद्यानात तीन गटारांवर असतात तशी वजनदार झाकणं आढळली. काही अडलं नाही म्हणून वर्षानुवर्षं कोणी त्याकडं फिरकलंही नव्हतं. सुंदर नक्षीकाम केलेली ती झाकणं उघडण्यात आली, तेव्हा त्याच्या आतमध्ये खाली उतरून जाण्यासाठी पायऱ्या आढळल्या. इतकंच नाही, तर आत दोन भुयारी मार्ग आढळले. त्यापैकी एक तीन-चार किलोमीटरवरील गेटवे ऑफ इंडियापर्यंत आणि दुसरा पोर्टकडे जाणारा होता. पहिल्या महायुद्धाच्या काळात मुंबईवर आक्रमण झाल्यास खजिना घेऊन जाता यावं, यासाठी ब्रिटिशांनी केलेली ती व्यवस्था होती. मुंबईच्या या गल्ल्यांमधील अशा अनेक अनोख्या गोष्टी जाणकारांकडून जाणून घेता येतात. मात्र, त्यासाठी पायपीट करावी लागते.

दक्षिण मुंबई शहराचे अभ्यासक रफिक बगदादी हे मुंबईच्या वारशाकडे वेगळ्या पद्धतीनं पाहण्याचा आग्रह धरतात. ‘हेरिटेज वॉक’चं त्यांनी स्वागत केलं. सुरुवातीला जेमतेम ११ मैल असलेली ही मुंबई कशी आकाराला येत गेली, हा वारसा सांगण्याचीही गरज आहे. मुंबईचं महत्त्व केवळ १९व्या आणि २०व्या शतकात उभ्या राहिलेल्या इमारती नाहीत, त्यांचं एक मर्यादित महत्त्व आहेच. पण, सात बेटांचं हे शहर पाहण्यासाठी आपल्याला १६६८ पर्यंत जावं लागतं. सतराव्या शतकाच्या अगोदरपासून वेगवेगळ्या समुदायाचे लोक स्वत:चे उद्योगधंदे घेऊन इथं कसे रुजले, हे गंमतीशीर आहे. ते आपल्याला आज कसं सांगता येईल, याचा विचार झाला पाहिजे. दक्षिण मुंबईतील माझगाव, भायखळा, गिरगाव इथल्या वाड्या संपूर्णपणे जतन करायला पाहिजेत. माझगावमधले सुंदर बंगले, मंदिरे, मशिदी, चर्च, पाण्याचे टॅंक या सगळ्यांना इतिहास आहे.

मुंबईची स्वत:ची एक कथा आहे. ‘हेरिटेज वॉक’मधून मुंबईची ही गोष्ट सांगता आली पाहिजे. ‘मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे’ हे विधान अनेकदा वापरलं जातं, त्याची मुळं शोधली, तरी मुंबईच्या या कॉस्मोपॉलिटन प्रकृतीचं मूळ गवसेल. १५३० मध्ये मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात आली, तेव्हा इथं केवळ ४०० घरं होती. ती केवळ भंडारी, कोळी आणि पाच कळशींची. मात्र, १८५१ च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या पाच लाख २४ हजार १२१ होती. आज मुंबईची लोकसंख्या सव्वा कोटीपेक्षा अधिक आहे आणि सात बेटांची पुंजकी जोडून मुंबईचा विस्तार झाला आहे.

वारसा हा वास्तूंसोबतच वडिलोपार्जितसुद्धा असतो, जो तुमच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. मुंबईचा वारसा हा वास्तूंसोबतच या शहरात ज्यांनी रंग भरले, ज्यांच्यामुळे हे शहर आंतरराष्ट्रीय शहराच्या पंक्‍तीत जाऊन बसले अशांच्या योगदानासह हा इतिहास सांगता आला, तर ऐतिहासिक वारशाला दिलेली ती सलामीच असेल.

‘हेरिटेज वॉक’साठी निश्‍चित केलेली ठिकाणे
महात्मा जोतिराव फुले मंडई, पोलिस आयुक्‍तालय, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्‍ट, अंजुमन इस्लाम हायस्कूल, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, महापालिका मुख्यालय, कॅपिटॉल सिनेमा, मध्य रेल्वे मुख्यालय, मुख्य टपाल कार्यालय, कोठारी प्याऊ, रिझर्व्ह बॅंक, टाऊन हॉल, हार्निमन सर्कल उद्यान, सेंट कॅथेड्रल चर्च, मानिकजी सेठ अग्यारी, फ्लोरा फाउंटन, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल आर्ट गॅलरी, पोलिस मुख्यालय, गेट वे ऑफ इंडिया, इरॉस सिनेमा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, उच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर, भिका बेहराम विहीर, पश्‍मि रेल्वे मुख्यालय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai Heritage