डोंबिवलीत शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह पंधरा पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv sena

डोंबिवलीत शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह पंधरा पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

डोंबिवली - शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध ठाकरे समर्थक असा संघर्ष सुरू झाला आहे. राज्यात वाद होत असताना, शिवसेना नेत्यांनी शिंदे समर्थकांवर पक्ष विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी सुरु केली आहे. डोंबिवलीतील एका शिंदे समर्थक गटाने या कारवाई अगोदरच समाज माध्यमातून आपला पक्षातील पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. डोंबिवली शिवसेना उपजिल्हाप्रमुखासह 15 पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राज्यात वातावरण तापलं असताना डोंबिवलीतील शिवसैनिकांनी मात्र शांततेची भूमिका घेतली होती. शिंदे समर्थक गटाने शहरात बॅनर बाजी केली, मात्र दुसऱ्याच दिवशी हे बॅनर उतरविण्यात देखील आले होते. सोमवारी डोंबिवली शाखेतील एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो उतरविल्यानंतर शिवसैनिक व शिंदे समर्थक गटात वाद झाले. त्यानंतर हा वाद उफाळून आल्याचे पहायला मिळाले.

त्यांनतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी शिंदे समर्थक गटातील 15 जणांनी आपण पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये उपजिल्हाप्रमुख, विधानसभा शहर संघटक, उपविभाग प्रमुख यांसह इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये बहुतांश हे मनसेतून शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच आले आहेत. त्यातील युवासेनेचे सागर जेधे यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचे वृत्त शिवसेनेच्या मुखपत्रात आले आहे. यामुळे हे सैनिक नाराज झाले असून त्यांनी अगोदरच पक्षातील आपल्या पदाचा राजीनामा समाज माध्यमावर व्हायरल केला आहे.