esakal | ढिंग टांग : पेंग्विन गँगला फुटला घाम!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : पेंग्विन गँगला फुटला घाम!

ढिंग टांग : पेंग्विन गँगला फुटला घाम!

sakal_logo
By
- ब्रिटिश नंदी

स्थळ : पेंग्विन कक्ष, जिजामाता उद्यान, भायखळा, बॉम्बे.

वेळ : हिमविहाराची. (म्हंजे कुठलीही!)

पात्रे : बबल्स, मि. मॉल्ट, डॉनल्ड, पॉपआय, फ्लिपर, डेझी आणि ऑलिव्ह.

‘‘भयंकर उकडतंय!,’’ अंगावरचा काळा कोट वर खाली करत मि. मॉल्ट म्हणाले. ‘हुस्स हुस्स..’ असे टिपिकल मुंबईकर आवाज काढत त्यांनी स्वत:च्याच पांढऱ्याशुभ्र सदऱ्यात फुंकर मारली, टिपिकिल मुंबईकराप्रमाणेच छताकडे बघितले. पंखा नव्हता! ‘‘काल रात्री मी तर घामानं भिजलो होतो…!,’’ बबल्सने तक्रार केली. ‘जिजामाता उद्यानातील पेंग्विनला घाम आला’ या ‘ब्रेकिंग न्यूज’ने महाराष्ट्राच्या राजकारणात किती खळबळ माजली असती, या विचाराने फ्लिपरला किंचित उकडले. ‘पंधरा कोटीचे टेंडर पेंग्विनसाठी की पेंग्विन गँगसाठी?’ अशी पोस्टर्स दादर भागात महाराष्ट्र नवनिर्माणवाल्यांनी लावल्याची खबर त्याला सकाळी पेंग्विन कक्षाची साफसफाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्याने दिली होती. कसले पंधरा कोटी? ही पेंग्विन गँग कोण? असं विचारताच तो कर्मचारी स्वत:च्याच गालफडावर थापड्या मारत, हातभर जीभ बाहेर काढत बाहेर पळाला!

…सुदृढ बांध्याच्या ‘पॉपआय’ला नेहमीप्रमाणे भूक लागली होती. हल्ली म्हणावी तशी आणि म्हणावी तेवढी कालवं ब्रेकफास्टला मिळत नाहीत, अशी त्याची तक्रार होती. झिंग्यांचा पुरवठाही कमी झालाय, असे त्याचे स्पष्ट मत होते. ‘‘श्रावण चालू आहे ना बाळा? थोडा थांब अजून…,’’ ऑलिव्हनं पोक्तपणानं त्याला समजावलं. ‘‘डॅम इट…श्रावण’’ असं म्हणून पॉपआय पुन्हा बर्फाच्या गुहेत जाऊन पडला. ‘‘मी इथे आल्यापास्नं उद्यानाचं उत्पन्न सहापट वाढलंय म्हणे!,’’ मानेला एक झटका देत डेझी म्हणाली. हे म्हणताना ती समोरच्या तरण तलावात डोकावून स्वत:चेच प्रतिबिंब पाहात होती. डेझी दिसायला आहे सुंदरच. पण ती ‘ती’ आहे का ‘तो’ हे नाव सांगेपर्यंत लोकांना कां समजत नाही, असे ती कुरकुरत असते.

‘‘फू:!! तेरे वास्ते नहीं पगली, वो मेरे वजहासे बढा है…मालूम!’’ घोगऱ्या आवाजात डॉनल्ड ऊर्फ डॉन म्हणाला. दोन पाय क्रॉस टाकून पंख मानेमागे घेऊन डॉन बर्फाच्या लादीला टेकून बसला होता. हिंदी चित्रपटातला ‘डॉन’ असता तर त्याने विडीदेखील शिलगावली असती!

‘‘ग्यारह मुल्कों की पुलिस जिसे ढूंढ रही है, वो आज भायखळा में पब्लिक के सामने खेल कर रहा है!,’’ डॉन दर्पोक्तीने म्हणाला. डॉनला खरेच ग्यारह मुल्कों की पुलिस ढुंढत असतील का? असतील, तर का? असले प्रश्न इतर पेंग्विननी कधी विचारले नाहीत. डॉन त्यांच्या गँगचा ‘भाई’ आहे, हे मात्र खरे!

‘‘ आपल्या देखभालीसाठी पंधरा कोटीचं टेंडर काढणार होते, पण बोंबाबोंब झाल्यामुळे रद्द झालं!’’ बबल्सनं माहिती पुरवली. बबल्सला सगळ्या खबरी असतात. तो अधून मधून टीव्हीसुध्दा बघतो. कोरियाहून ही पेंग्विन गँग ज्याच्यासाठी उचलून आणण्यात आली, त्या बॉम्बेच्या प्रिन्सची बबल्स जाम चमचेगिरी करतो, असे इतर पेंग्विन मंडळींना वाटते.

‘‘पंधरा करोड? बाप रे! आपल्याला इथे इतका खर्च येतो?,’’ ऑलिव्ह किंचाळली. तेवढ्यात जिजामाता उद्यानाचा कर्मचारी आला आणि म्हणाला : आजपासून बर्फाचा सप्लाय कमी होणार हां! काटकसरीचे आदेश आहेत!’’ ‘‘ओह गॉड? बर्फ नाहीऽऽ…मग?’’ डेझी घाबरुन ओरडली.

‘‘बर्फाऐवजी वाळू टाकावी का, असा मुन्शिपाल्टीत प्रस्ताव येणाराय! बघू काय होतं ते!!’’

असे म्हणून कर्मचारी नाहीसा झाला. पेंग्विन गँगला खरोखरच घाम फुटला.

loading image
go to top