esakal | कलाबहर : ‘हात साधेच; शिल्प घडतं मनात’
sakal

बोलून बातमी शोधा

bhagwan rampure

कलाबहर : ‘हात साधेच; शिल्प घडतं मनात’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई स्टॉक एक्सेंज च्या''बिग बुल''पासून मिर्झा गालिब, गुलज़ार, नाटककार विजय तेंडुलकर, पं. दीनानाथ मंगेशकर, ओशो, बुद्ध, गणपती, मीरा यांच्यापर्यंत अनेक माध्यमांतील शिल्प घडवणारे हात आहेत सोलापूरचे शिल्पकार भगवान रामपुरे यांचे. ‘माझे हात साधेच आहेत; शिल्प घडतं ते माझ्या मनात’ असं हसत सांगणारे मितभाषी भगवान रामपुरे यांच्यात एक नाटकप्रेमी आणि एक सिनेरसिक दडलाय. पण आयुष्यात जेव्हा चित्रकला की नाटक अशी निवड करायची वेळ आली तेव्हा त्यांनी चित्रकला निवडली. मूर्तिकार वडिलांसोबत गणपतीच्या मूर्तींच्या कारखान्यात काम करताना त्यांनी मातीला अगदी लहानपणीच आणि सहजच हात लावला. कधी ते त्यांनाही आठवत नाही; पण चित्रकला शिक्षणाच्या वेळी ते संस्कार आकार घेऊ लागले.

मोठे बंधू व गुरुजनांच्या सल्ल्याने शिल्पकलेत काम करायचे ठरले. १९८२पासून मुंबईत या शिल्पकाराचा प्रवास सुरु झाला. नंतर मग ओशोच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. काचेत केलेले ‘ओशो आणि शून्य'' असे त्यांचे एक शिल्पही प्रसिद्ध आहे. त्यांच्या मते काच हे शून्याचे प्रतीक असल्याने वापरले. ओशोंमुळे त्यांना बुद्ध समजला, मीरा-कृष्णाचं नातं कळालं, काही परदेशी विचारवंतांचे विचारही समजले.

‘मला माझे विचार शिल्पाच्या आकारात दिसतात. मग ते तेथून पुसले जाऊ नयेत म्हणून मी लगेच त्याचे स्केच करून ठेवतो. मनातला आकार हा केवळ एक भाग असतो; पण प्रत्यक्ष शिल्प होताना त्यात अनेक बदल होत जातात,असे ते सांगतात. एका शिल्पकृतीची कल्पना गेली १५ वर्षे त्यांच्या डोक्यात आहे. योग्य वेळ आली आणि ते त्या मानसिक अवस्थेत गेले, की ते साकारेल, असा त्यांना विश्वास आहे. मनात जे आहे, त्यापैकी फक्त पाच टक्केच शिल्पकृतीच्या माध्यमातून बाहेर आलं आहे, असे ते सांगतात.

‘व्यक्तिशिल्प करताना त्याचं नेमकं काय टिपायचे याची प्रत्येक कलाकारांची पद्धत वेगळी असते. ती शिकता किंवा शिकवता येत नाही. शरीरशास्त्र, दृश्य बाबींच्या पलीकडे आव्हान असतं ते भावनांच्या अभिव्यक्तीचं. ते काम अखेरच्या टप्प्यात चालते. तो टप्पा एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत ‘होऊन जातो'' आणि आवश्यक परिणाम ''सापडतो''. ते शब्दांत सांगणं तसं अवघडच !’ हे ऐकताना त्यांची अनेक व्यक्तिशिल्पे डोळ्यापुढं येतात. व्यावसायिक शिल्प काय, व्यक्तिशिल्प काय किंवा त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतील सेमी अॅब्स्ट्रॅक्ट शिल्प काय, सर्व कामात आव्हानं असतातच आणि आजतागायत त्यांनी ते नीट पेलले.

एक गोष्ट मात्र नक्की-मातीत हात घातला, की ती तंद्री लागतेच आणि काम पूर्ण होतं. माती त्यांना अतिशय प्रिय. कारण शुन्यातून जे घडतं ते मातीतच! संवेदनशील अशा माध्यमात काम करताना देहभान विसरून त्यात एकरूप होण्याची ती अवस्था. ‘शिल्प पूर्ण झाल्यावरच आपण परमानंदाच्या कुठल्या पातळीवर जाऊन आलो हे कळतं मला’, असं ते म्हणतात. ‘व्यावसायिक काम हे जास्त डोक्याचं; पण स्वतःचं काम असेल तर त्यात डोकं आणि हृदय दोन्ही एकरूप असतात त्या माध्यमाशी’, हे त्यांचं निरीक्षण आहे. जेव्हा अंतःस्फूर्तीने एखादी कलाकृती घडते, तेव्हा ती सर्वांच्या आत्म्याला भिडते . जेव्हा कलाकार देहभान विसरून काही घडवतो तेव्हा रसिकही देहभान विसरून त्याच्या पातळीवर येतो.

loading image
go to top