ढिंग टांग : पुरणपोळीनंतर साबुदाणा वडा..!

साबुदाणा वड्याच्या चवीतून राजकीय युतीचे चढउतार, ‘मातोश्री’च्या आठवणी आणि नानासाहेब-उधोजींच्या नात्यातील गोड-तिखट संवादाची खमंग गोष्ट
Culinary Diplomacy: Nanasaheb’s Nostalgia for 'Matoshree' Sabudana Vada

Culinary Diplomacy: Nanasaheb’s Nostalgia for 'Matoshree' Sabudana Vada

Sakal

Updated on

प्रिय माजी मित्र श्री. रा. उधोजीसाहेब यांसी सप्रेम जय महाराष्ट्र! फारा दिवसात गाठभेट नाही. विधान परिषदेत सेंड ऑफ स्वीकारताना तुम्ही हृद्य भाषण केले, ते शब्द अजूनही कानात गुंजत आहेत. तुमचे भावनिक शब्द माझ्या काळजाचे शंकरपाळे करून गेले. तुम्ही खरे राजकारणी नाहीच्च आहात, असे मी ठणकावून सांगितले. कारण मला अजूनही ते जुने दिवस आठवतात...

मला तुमच्या ‘मातोश्री’वरचे साबुदाणा वडे अतीच आवडतात, हे तेव्हाही मी सांगितले होते. एकदा मी इतके साबुदाणे वडे खाल्ले की ‘आता घरातला साबुदाणा संपला’ असे सांगून टाकलेत. केवळ त्या अद्भुत साबुदाणावड्यासाठी आपली युती तुटू नये, असे भारी वाटत होते. मगर यह हो न सका. अब ना रहा वो साबुदाणा वडा, ना रहा वह कोलंबी फ्राय...जाऊ दे.

साबुदाणा मला कुठल्याही फॉर्ममध्ये आवडतो. खिचडीतही आवडतो, उपवासाच्या चिवड्यातही आवडतो, आणि साबुदाणा वड्यात तर भारीच लागतो. तुम्ही महाविकास आघाडी केल्यानंतर मी राष्ट्रवादीच्या जयंतराव पाटलांना नेहमी विचारे, ‘‘झाली का तुमची मीटिंग? साबुदाणा वडा होता का?’’ ते नेहमीप्रमाणे, ‘‘साबुदाणा वडा? मला काही कल्पनाच नाही हो!’’ असे उत्तर द्यायचे. मी निश्वास सोडी. आमच्या महायुतीकडे सत्ता आहे, पण साबुदाणा वडा नाही. नाही म्हणायला आमचे ठाण्याचे कर्मवीर भाईसाहेब कधी कधी मामलेदार मिसळीचा डबा घेऊन येतात. पण ते तेवढेच. (एका मिसळीवर काय काय मान्य करणार? असो.) उत्तम साबुदाणा वड्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो, असा गौप्यस्फोट आमच्या मंडळींनी नुकताच कुठे तरी केला. त्यानंतर मला साबुदाणा वड्याचे डबेच्या डबे यायला लागले आहेत. किती खाणार? परवा आमचे नाशिकचे गिरीशभाऊ महाजन ‘सायंतारा’चा फेमस साबुदाणा वडा घेऊन आले. किती आणले असतील? चोवीस!! आता मी काय साबुदाणा वड्यांची गळ्यात माळ घालून हिंडणार होतो का?

जगात खूप साबुदाणे वडे आहेत, पण ‘मातोश्री’ची सर कोणालाही नाही, हे मी जाहीर सांगायला कचरणार नाही. सत्य ते सत्य!!

पुन्हा साबुदाणा वडा खाण्याची संधी दार ठोठावते आहे. विधान परिषदेच्या निवडणुका येत आहेत. खायचे का साबुदाणे वडे? कळवा. वाट पाहातो.

तुमचाच

माजी मित्र. नानासाहेब फ.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com