अग्रलेख : नवीनबाबूंच्या यशाचा धडा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 May 2019

ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले.

ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले.

ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनाईक यांनी लागोपाठ पाचव्यांदा शपथ घेत देशाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे! लोकसभा निवडणुकीबरोबरच ज्या चार राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यात मुख्यमंत्रिपद कायम राखणारे ते एकमेव मुख्यमंत्री तर आहेतच; शिवाय देशभरात नरेंद्र मोदी यांच्या नावाची सुप्त लाट असतानाही त्यांनी विधानसभेत भाजपला चारीमुंड्या चीत केले. विधानसभेच्या १४७ पैकी ११२ जागा जिंकत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे देशातील जनता लोकसभेसाठी कोण्या एका पक्षाची वा नेत्याची निवड करत असताना, राज्याची धुरा सांभाळण्यासाठी ते वेगळा पक्ष वा वेगळ्या नेत्याला मतदान करू शकतात, यावरही शिक्‍कामोर्तब झाले आहे. कोणत्याही राज्यात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लोकसभेसाठी मतदान झाले, की त्या पक्षाने जनतेचा विश्‍वास गमावला आहे, अशी केवळ चर्चा करण्याचाच नव्हे, तर त्याच आधारे तेथील सरकारे बरखास्त करण्याचा रिवाज आपल्याकडे १९७०च्या दशकापासून आहे. त्याला छेद देणारे मतदान या वेळी ओडिशात झाले. ओडिशात सरकार स्थापन करण्यासाठी या वेळी भाजपने बाजी लावली होती; मात्र तसे होऊ शकले नसले, तरी लोकसभेत मात्र तेथील २१ पैकी आठ जागांवर कब्जा करण्यात त्या पक्षाला यश मिळाले. नवीनबाबूंना मिळालेले यश हे त्यांच्या राजकीय कौशल्यात जसे आहे, त्याचबरोबर त्यांनी २००० मध्ये मुख्यमंत्रिपद मिळविल्यापासून घडवून आणलेल्या ओडिशाच्या विकासातही आहे. त्यामुळेच सत्तरी ओलांडलेल्या नवीनबाबूंनी पाच दशके भारताबाहेर काढल्यावरही केलेली ही कामगिरी अभिनंदनाला पात्र आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मायावतींचा बहुजन समाज पक्ष, मुलायमसिंह व अखिलेश यादव या पिता-पुत्रांचा समाजवादी पक्ष असो की लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असो; अशा बहुतांश प्रादेशिक पक्षांची धूळधाण झाली. मात्र त्याचवेळी नवीन पटनाईक यांनी आपला पक्ष ओडिशात कसा खंबीर पाय रोवून उभा आहे, हेच मतदारांच्या भरघोस पाठिंब्यामुळे दाखवून दिले आहे. अनेक बड्या नेत्यांचे पक्ष पराभूत होत असताना, नवीनबाबूंचा बिजू जनता दल मात्र राज्य पातळीवर टिकाव धरू शकला; याचे रहस्य बहुधा त्यांच्या राजनीतीत असावे. ते ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक दाखवली. आपले राज्य बरे, असे म्हणत त्यांनी राज्यावरच सारे लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. शिवाय संसदेत महिला आरक्षण विधेयक प्रलंबित असताना, त्यांनी ३३ टक्‍के महिलांना उमेदवारी दिली. त्यामुळेच ओडिशातील २१ खासदारांमध्ये सात महिला असून, त्यापैकी पाच बिजू जनता दलाच्या आहेत. त्यावरून हा निर्णय तेथील महिलांना कसा पसंत पडला, त्याचीच साक्ष मिळते. नवीनबाबू हे ओडिशाचे ज्येष्ठ नेते बिजू पटनाईक यांचे चिरंजीव आणि निव्वळ अपघाताने राजकारणात येण्यापूर्वी लेखक म्हणून त्यांनी कीर्ती संपादन केली होती. ओडिशात त्यांनी १९ वर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदाची धुरा हाती घेतली, तेव्हा अर्धे-पाऊण आयुष्य अमेरिकेत घालवल्यामुळे त्यांना स्थानिक उडिया भाषाही धड बोलता येत नव्हती. तरीही आपल्या कर्तृत्वाने त्यांनी जनतेची मने जिंकली आहेत.
नवीनबाबूंखेरीज भाजप व मोदी यांना खंबीरपणे टक्‍कर दिली ती बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आणि तमिळनाडूत द्रमुकची धुरा सांभाळणाऱ्या स्टॅलिन यांनीच. या साऱ्यांना मिळालेल्या यशापासून अन्य प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी बराच बोध घेण्यासारखा आहे. लोकसभेवर लक्ष केंद्रित करण्याआधी आपल्या राज्यात ठामपणे आपले बस्तान बसवायला हवे, हेच बाकी प्रादेशिक पक्षांचे नेते विसरून गेले आहेत. मायावती व अखिलेश यादव यांनी आपला तीन दशकांचा दुरावा बासनात तर बांधलाच, शिवाय राष्ट्रीय लोकदलाचे अजितसिंह यांना सोबत घेऊन महागठबंधन केले होते. महाराष्ट्रातही राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील वैमनस्य दूर करून काँग्रेसशी आघाडी केली. मात्र, तरीही त्यांना अपेक्षित यश का मिळू शकले नाही. याचा त्या त्या पक्षाच्या नेत्यांबरोबरच बंगाल, तसेच ओडिशामध्ये भाजपने मारलेल्या मुसंडीमुळे नवीनबाबू व ममतादीदी यांनाही गांभीर्याने विचार करावा लागेल. आता त्याकडे हे सारे बडे नेते अधिक गांभीर्याने लक्ष देतील, तरच भविष्यात त्यांच्या गळ्यात यशाची माळ पडू शकते, हाच नवीनबाबूंच्या यशाचा अन्वयार्थ आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naveen Patnaik takes oath as Odisha CM in editorial