प्रज्ञावंतांना प्रोत्साहन

प्रज्ञावंत विद्यार्थीही हुशार असतातच; पण पारंपरिक परीक्षापद्धती त्यांचा शोध घ्यायला अपुरी ठरते.
education
educationSakal

- डॉ. वसंत काळपांडे

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रज्ञावंत (गिफ्टेड/टॅलेंटेड) विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमांना विशेष महत्त्व दिले आहे. आपल्या बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थी अभ्यासात मागे पडणारे असोत किंवा हुशार; पारंपरिक परीक्षांत जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे हे त्यांना शिकवणे, हाच महत्त्वाचा कार्यक्रम असतो.

अनेक विद्यार्थी मेहनत आणि भरपूर सराव यांच्या जोरावर सार्वजनिक परीक्षांत उत्तम कामगिरी दाखवतात आणि हुशार म्हणून गणले जातात. प्रज्ञावंत विद्यार्थीही हुशार असतातच; पण पारंपरिक परीक्षापद्धती त्यांचा शोध घ्यायला अपुरी ठरते.

प्रत्येक विद्यार्थ्यात काही प्रमाणात प्रज्ञा असतेच; पण ‘खूप हुशार’ विद्यार्थी ‘खूप प्रज्ञावंत’ असतीलच असे नाही. विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे साधारणपणे विषय नीट समजला नसल्यामुळे किंवा निष्काळजीपणामुळे चुकतात. या दोन प्रकारच्या चुकांमधील फरक शिक्षकांनी लक्षात घ्यायला पाहिजे.

सपाटीकरण झालेल्या परीक्षापद्धतीत प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेणे आणखीच कठीण होते. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांत असलेली इतर वैशिष्ट्येसुद्धा तपासणे गरजेचे असते. प्रज्ञावंत विद्यार्थी अभ्यासक्रमातील अध्ययन-निष्पत्ती वेगाने आणि सहजतेने आत्मसात करतात. उच्च दर्जाची स्वशिक्षण-कौशल्ये, एकाच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे सुचणे, अभिनव विचार आणि कल्पना, अंत:प्रेरणा ही प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये असतात.

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरांवर काही कार्यक्रम आयोजित केले जातात. या विद्यार्थ्यांना आव्हानात्मक वाटतील असे इतरही भरपूर उपक्रम राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात सुचवले आहेत. या उपक्रमांची शाळापातळीवर अंमलबजावणी झाली पाहिजे. शाळापातळीवर विषयवार मंडळे स्थापन करून त्यांत प्रकल्प, प्रश्नमंजूषा, तज्ज्ञांच्या मुलाखती, क्षेत्र-भेटी असे बहुविध उपक्रम आयोजित करता येतील.

आठवड्यातील एक दिवस किंवा वेळापत्रकातील दररोजचे शेवटचे तास विद्यार्थ्यांच्या आवडत्या विषयांच्या समृद्धीसाठी वापरता येतील. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असते, हे लक्षात घेऊनच शाळांचे कार्यक्रम आखले पाहिजेत. बुद्धिमान आणि अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या तुकड्या करणे कटाक्षाने टाळले पाहिजे.

गटकार्याच्या वेळीही प्रत्येक गटात वेगवेगळ्या क्षमतांचे विद्यार्थी असले पाहिजेत. अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी हुशार आणि प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी याशिवाय आणखी काही वेगळे उपाय योजावे लागतील. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची दृष्टी विस्तारावी यासाठी त्यांना एकमेकांशी विचार आणि कल्पना यांची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळाली पाहिजे.

त्यासाठी शाळासमूह, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवर प्रज्ञावंत विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष आणि ऑनलाइन ‘कम्युनिटीज’ उपयुक्त होतील. ‘प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचे शिक्षण’ या विषयावर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शक साहित्य, तसेच समुपदेशक, मेंटॉर आणि कोच यांच्या नेमणुका यांचाही विचार झाला पाहिजे.

प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची घुसमट थांबवण्यासाठी सध्याच्या शिक्षणपद्धतीत कोणतीही सोय नाही. प्रज्ञावंत विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय कितीतरी गोष्टी स्वत:च्या स्वत: शिकतात. १९७० च्या दशकापर्यंत आपल्याकडे बुद्धिमान विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या शेवटी एक इयत्ता गाळून त्यापुढच्या वर्गात पाठवण्याची तरतूद होती.

याला ‘डबल प्रमोशन’ किंवा त्वरित वर्गोन्नती म्हणतात. आता ही पद्धत वापरली जात नाही. मात्र आता २०२२च्या राष्ट्रीय श्रेयांक आराखड्यात प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी त्वरित वर्गोन्नतीची शिफारस केली आहे.

त्यानुसार प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना एक इयत्ता वगळून वर्गोन्नती देता येईल किंवा त्यांना ज्या विषयात विशेष गती आहे, तो विषय एक किंवा दोन इयत्ता पुढच्या स्तरावर शिकता येईल. मात्र हे करताना प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध आणि त्यांचे मूल्यमापन या बाबी काटेकोर, उच्च दर्जांच्या क्षमतांवर आधारलेल्या, निष्पक्ष आणि संशयातीत असल्या पाहिजेत.

‘‘आपण आर्थिकदृष्ट्या गरीब आहोतच, पण प्रशिक्षित बुद्धिमत्तेची कमतरता त्याहूनही चिंताजनक आहे,’’ हे कोठारी आयोगाने पन्नास वर्षांपूर्वी केलेले विधान आजही लागू पडते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षिल्याप्रमाणे भारत जागतिक ज्ञान-महासत्ता बनायचा असेल तर प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध, त्यांच्यातील प्रज्ञेची जपणूक आणि संवर्धन यांबाबतच्या कार्यक्रमांकडे दुर्लक्ष करता कामा नये. ‘जो समाज प्रशिक्षित बुद्धिमत्तेचे महत्त्व जाणत नाही, त्याचा विनाश अटळ आहे,’ हा गणितज्ञ-तत्त्वज्ञ व्हाईटहेड यांचा इशारा विसरून चालणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com