लक्ष लक्ष शब्दांच्या जगात...

nirja
nirja

काळाप्रमाणे जसं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. संस्कृती प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढं वाहत स्वच्छ, नितळ होत जाते, तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा.

दि वाळी दिव्यांचा उत्सव, अंधारावर मात करणाऱ्या प्रकाशाच्या विजयाचा उत्सव. चौदा वर्षांचा वनवास संपवून परतलेल्या श्रीरामाच्या स्वागताचा उत्सव, नरकासुराच्या वधाचा आनंद मानण्याचा उत्सव, लक्ष्मीला पूजण्याचा उत्सव, भावा-बहिणीतलं नातं जपण्याचा उत्सव. चांगल्या पावसानं आलेली धनधान्याची समृद्धी साजरी करण्याचा उत्सव! खूप कहाण्या, दंतकथा जोडल्या गेल्या आहेत या उत्सवाशी. मला वाटतं भारतात जन्मलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे दिवाळीचा सण.

मला आठवतं लहानपणी दिवाळीच्या आधीच कामाला लागायचो आम्ही. पावसाळ्यात पावसानं अंगणातली माती वाहून जायची. अंगण खडबडीत होऊन जायचं. ते मातीची भर घालून चापून चोपून घ्यायचं आणि शेणानं सारवायचं. वर्तमानपत्रावर पट्टीनं खुणा करून त्या अगरबत्तीनं जाळून ठिपकागद तयार करायचा. ठिपक्‍यांची रांगोळी काढायची. पहाटे उठून अभ्यंगस्नान करायचं. आकाशकंदील बनवून दारात लावायचा. वाट्याला आलेल्या फुलबाज्यांच्या पाच-सहा काड्यातली एक काडी पेटवून ‘दिन दिन दिवाळी’ असं गाणं म्हणायचं. एखाद-दुसरी टिकली फोडून आवाज करायचा मोठा. मनातल्या आनंदाचं व्यक्त होणं असायचं ते. असे सण साजरे करणं हा आनंद होता त्या निर्मळ वयातला. आज मात्र सारे संदर्भ बदलत चालले आहेत दिवाळीचे. सीतेला अग्निदिव्य करायला लावणाऱ्या रामाचं स्वागत कसं करायचं? हा प्रश्न पडतो मला. बळिराजाला पाताळात लोटल्याची गोष्ट आजच्या शेतकऱ्याच्या दैन्यावस्थेशी जोडली जाते आपोआप. पाऊस न पडलेल्या कोरड्या प्रदेशांच्या हुंदक्‍यांचा आवाज वाढत जातो कानात. माझ्या घरात दिवा लावताना ज्यांच्या घरात दिवा लागत नाही त्यांचे चेहरे दिसायला लागतात डोळ्यांसमोर. उत्सव म्हणजे आवाजांचा गोंगाट असं मानू लागलेल्या लोकांच्या मनात हे चार-पाच दिवस साजरे करताना नेमक्‍या काय भावना असतात? इथं सगळ्या कहाण्या सांगण्याची गरज नाही. त्या आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहेत. कोणताही सण आणि त्यामागची थोडीफार कथा माहीत नसली तरी विविध माध्यमं, मालिकांतल्या आया, आज्या, नाहीतर आजोबा सांगतातच की. पण त्यापलीकडे आणखी काही आहे काय? याचाही विचार करावासा वाटतो.

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. हजारो दिवे, आकाशकंदील लावून आणि फटाक्‍यांची आतषबाजी करून आपण तो साजरा करतोच. पण अंधारावर मिळवलेला विजय म्हणजे नेमकं काय? जगणं प्रकाशानं उजळून टाकायचं म्हणजे काय? याचा विचार करायला हवा. हा अंधार म्हणजे काय काय आहे नेमकं? माझ्या दृष्टीनं हा अंधार म्हणजे संविधानानं नाकारली असली, तरी आजही लोकांच्या नेणीवेत राहिलेली सामाजिक आणि आर्थिक विषमता, जातिव्यवस्थेच्या उतरंडीत माणसाला शूद्रत्वाला पोचवण्याची मानसिकता, एकीकडे स्त्रीला देवत्व द्यायचं आणि मग मंदिरात जाण्यावरूनच रोखण्याचं षडयंत्र, मतांचं राजकारण करताना बाईनंच बाईला प्रकाशापर्यंत जाण्यापासून थोपवणं, आंतरजातीय लग्न केलं म्हणून मुलांना क्रूरपणं मारणं, सगळ्याच स्त्रियांना उपभोग्य वस्तू समजून त्यांच्यावर बलात्कार करणं, नोकरशाहीतल्या खुर्चीवर बसून भ्रष्टाचार करणं, खुर्चीचा माज दाखवणं, झुंडीत सामील होऊन कोणाची तरी हत्या करणं, विचारवंतांचे खून करणं, अन्यायाला वाचा फोडणाऱ्या लेखक, पत्रकार यांना धमक्‍या देणं, अन्याय मुकाट सोसणं आणि अज्ञानातच सुख मानून जगणं...हा असा अंधार पसरलेला असताना आजूबाजूला कोणता प्रकाश आणणार आहोत आपण या दिवाळीच्या निमित्तानं? आज हा विचार करण्याची वेळ आली आहे. परंपरा, कर्मकांड आणि संस्कृती यात गल्लत तर करत नाही ना आपण? संस्कृती ही केवळ धार्मिक उत्सवातून व्यक्त होत नसते, तर ती प्रवाहित होत असते संगीत, चित्रकला, शिल्पकला अशा विविध कलांतून, मनोरंजनाबरोबरच विचार करायला लावणाऱ्या विविध साहित्य प्रकारांतून, नाटक-चित्रपटांतून, आपल्या वागण्या-बोलण्यातून, आपल्या वर्तणुकीतून, शिस्तीतून, माणसाला माणूस म्हणून वागवण्यातून, परकीयांना आपलं मानून त्यांचं आदरातिथ्य करण्यातून, हिंसा आणि कौर्य याविरोधात उभं राहण्यातून, जात, धर्म, लिंग यावर आधारित समानतेला प्रमाण मानून माणसानं माणसाला दिलेल्या सन्मानातून! ‘आमचं धर्मशास्त्र हे सांगतं,’ असं म्हणत आंधळेपणानं एखाद्या डबक्‍यात डुंबत राहाणं म्हणजे संस्कृती नाही. आज या धर्मशास्त्राचा वापर केवळ सत्तास्पर्धेत वापरण्याचं एक आयुध म्हणून केला जातो आहे. पण काळाप्रमाणं जगणं बदलतं, तसंच जगण्याचं शास्त्रही बदलत असतंच. ते कधीही एकारलेलं नसतं.

संस्कृती ही नेहमीच प्रवाही असते. जशी नदी तळाशी जमलेला गाळ तिथंच सोडून पुढे वाहत जाते स्वच्छ, नितळ तशीच वाहत असते संस्कृती. असा नितळ संस्कृतीचा प्रकाश दिवाळीच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यात आणायला हवा. आज ‘व्हॉटस्‌ॲप’ आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातूनही हा असा अज्ञानाचा अंधार आपल्या जगात पसरवला जातो आहे आणि आपण त्या अंधाराला गच्च डोळे मिटून अंगावर घेतो आहोत. ही माध्यमं कोणीतरी विरेचित केलेला, विस्कटलेला इतिहास आपल्या हातात सोपवताहेत आणि हाच खरा इतिहास समजून आपण मतं बनवायला लागलो आहोत. मुळातून इतिहास न वाचता हा अशा तुकड्या-तुकड्यांनी हातात येणारा इतिहास म्हणजे आपली संस्कृती असं मानायला लागलो आहोत. अशा ‘व्हॉटस्‌ॲप’ गुरूंना बाजूला सारून पुस्तकांना आपल्या आयुष्यात आणलं तर खऱ्या अर्थानं प्रकाश येईल आपल्या आयुष्यात. मग हा प्रकाश केवळ नोकरी आणि पैसे मिळविण्यासाठी घेतलेल्या पदवीचा प्रकाश असणार नाही, तर खऱ्याअर्थानं ज्ञानाचा प्रकाश असेल. हा प्रकाश आणायचा असेल तर त्यापर्यंत पोचण्यासाठी थोडा वेळ देण्याची गरज आहे. मोबाईलवरची बोटं पुस्तकांच्या पानांतून फिरायला हवीत. एक एक पान उलटत जाताना खऱ्या अर्थानं माणसाचं जगणं समजून घ्यायला हवं. आपलं जगणं या जगण्याशी जोडताना विवेकाची कास धरायला हवी. विचारांनी श्रीमंत करणारी पुस्तकं वाचायला हवीत. दिवाळीच्या दिवसांत येणाऱ्या दिवाळी अंकांचा फराळ करायला हवा. मराठी भाषा आणि मराठी साहित्य त्या बाबतीत खूपच समृद्ध आहे. फक्त आपल्याला त्या समृद्धीपर्यंत पोचायला हवं. संस्कृती, इतिहास समजून घेताना संविधानानं दिलेले हक्क आणि कर्तव्ये समजून घेण्याची गरज आहे. आपलं जगणं आणि जगण्याचा अर्थ, स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीचा अर्थ समजून घेतला तर ‘सारेच दीप मंदावले आता’ असं म्हणण्याची वेळ येणार नाही. उलट खऱ्या अर्थानं दीपावली साजरी केल्याचा आनंद मिळू शकेल. ‘शुभ दीपावली’चा मेसेज पाठविण्यापेक्षा लक्ष लक्ष शब्दांच्या जगात फेरफटका मारला, तर हीच नाही तर पुढच्या सगळ्याच वर्षात येणारी दिवाळी आपल्याला आनंदाची जाईल. दीपावलीच्या खूप साऱ्या सदिच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com