आक्रमकतेचा आभास (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती, तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडल्यास भाजपवर ‘सर्जिकल ऍटॅक‘ करण्याची दमबाजी, यापलीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नवीन असे काहीच नव्हते. 

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती, तर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत युती तोडल्यास भाजपवर ‘सर्जिकल ऍटॅक‘ करण्याची दमबाजी, यापलीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नवीन असे काहीच नव्हते. 

विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आपट्यांच्या पानांऐवजी ‘विचारांचे सोने‘ लुटण्याची संधी शिवसैनिकांना देण्याची प्रथा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेनंतर सुरू केली, त्यास यंदा 50 वर्षे झाली. मधे एक-दोन वर्षे पाऊस वा अन्य कारणांमुळे ही संधी शिवसैनिकांना मिळाली नसली, तरीही हा सुवर्णमहोत्सवी मेळावा आहे, असेच शिवसेनेने जाहीर केले होते! त्यामुळेच या मेळाव्याकडे केवळ शिवसैनिकांचेच नव्हे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सर्वपक्षीय राजकारण्यांचे लक्ष लागले होते. त्याचे कारण मात्र एकच होते आणि ते म्हणजे 35 हजार कोटी रुपयांचा असा जगद्‌व्याळ ताळेबंद असलेली मुंबई महापालिकेची निवडणूक! गेली दोन-अडीच वर्षे केंद्र व राज्यात सत्तेच्या चतकोर तुकड्यावर समाधान मानून घेत शिवसेना लाल दिव्याच्या गाड्या उडवत आहे आणि त्याचवेळी विरोधी पक्षाची भूमिकाही कसोशीने अमलात आणत आहे. या पार्श्‍वभूमीवर अवघ्या चार-सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत या दोन पक्षांची युती होणार की नाही, या लाखमोलाच्या प्रश्‍नाचे उत्तर या मेळाव्यात उद्धव ठाकरे देतील आणि शिवसैनिकांबरोबरच भाजप कार्यकर्त्यांच्याही मनातील संभ्रम संपुष्टात आणतील, असे अनेकांना वाटत होते. शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीतील बहुतेक महत्त्वपूर्ण निर्णय बाळासाहेबांनी अशाच दसरा मेळाव्यात जाहीर केले होते. मात्र, उद्धव यांनी सर्वांचीच निराशा केली आणि ती करताना मुंबई महापालिकेतील युतीचा चेंडू भाजपच्या मैदानात भिरकावून देऊन ते मोकळे झाले. 

कोणी यास भले मुत्सद्देगिरीचा बाणेदार नमुना असे म्हणेलही; पण उद्धव यांचे एकूण अर्ध्या-पाऊण तासाचे भाषण बघता, कोणताही निर्णय घेण्याचा धोका त्यांना पत्करायचा नव्हता, असेच दिसून आले. त्यांचे हे भाषण म्हणजे विचारांचा कमालीचा गोंधळ तर होताच; शिवाय तो ‘सर्जिकल‘ही होता. ‘भाजपने युती केली नाही, तर शिवसैनिक त्यांच्यावर ‘सर्जिकल ऍटॅक‘ करतील‘, हे त्यांचे विधान आता ही निवडणूक पार पडेपर्यंत मुंबईकरांना कोणकोणत्या राड्यांना सामोरे जावे लागेल, त्याचा इशारा देणारेच होते. मात्र, हे करताना उरी येथील पाकपुरस्कृत हल्ल्यानंतर भारताने केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करण्यास ते अर्थातच विसरले नाहीत. शिवाय ‘केवळ पाकव्याप्त काश्‍मीरच नव्हे, तर अख्खाच्या अख्खा पाकिस्तान काबीज करा‘ असा अनाहूत सल्लाही त्यांनी मोदी यांना दिला. मात्र, त्याहून अधिक प्रसिद्धी मिळाली ती आधीच घडवलेल्या ‘राडा संस्कृती‘च्या दर्शनाला. संयुक्‍तपणे सत्ता भोगणाऱ्या या दोन पक्षांमध्ये किती विकोपाचे मतभेद आहेत, त्याचीच प्रचिती तमाम मुंबईकरांना पुन्हा एकदा त्यामुळे आली. गेल्याच आठवड्यात भाजपचे बोलके पोपट किरीट सोमय्या यांनी भाजप मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढवेल, अशी गर्जना केली होती आणि त्यामुळे वादळ उठले होते. मुख्यमंत्र्यांना त्यानंतर लगोलग खुलासा करणेही भाग पडले होते. मात्र, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्याच दिवशी महापालिकेतील शिवसेनेच्या कथित भ्रष्टाचारावर सातत्याने कोरडे ओढणारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘ती भूमिका ही सोमय्या यांची वैयक्‍तिक भूमिका असली, तरी सामान्य कार्यकर्त्यांच्याही भावना त्याच आहेत,‘ असे सांगून शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळले. त्यात दसऱ्याचा रावण सोमय्या यांनी उभा केला, तो महापालिकेतील भ्रष्टाचाराचे प्रतीक म्हणून! त्यानंतर मुलुंड येथे जी काही हाणामारी शिवसैनिकांनी केली, ती शिवसेनेच्या आजवरच्या संस्कृतीस साजेशीच होती. दुसरीकडे महापालिकेत सत्ता युतीची आहे, एकट्या शिवसेनेची नव्हे, याचा सोयीचा विसर भाजपला पडला. 

उद्धव यांच्या भाषणाचा बाकी सारा सूर हा ‘राष्ट्रवाद‘ हा एकच विषय पुन:पुन्हा आळवणारा होता आणि त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्यात नवे असे काहीच नव्हते. ‘पाकिस्तानी कलावंत, लेखक आणि खेळाडू यांना भारतात येऊ देऊ नका,‘ हे जुनेच तुणतुणे त्यांनी पुन्हा एकवार वाजवले. मात्र, उद्धव यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देतानाच आर्थिक निकषावरील आरक्षणाची बाळासाहेबांची भूमिकाही पुन्हा स्पष्ट केली. खरे तर एकहाती सत्तेची मनीषा गेल्या दोन वर्षांत लपवून न ठेवणाऱ्या उद्धव यांच्याकडून यासंबंधात काही ठोस मार्ग अपेक्षित होता. ती जबाबदारी मात्र मुख्यमंत्र्यांवर सोपवून ते मोकळे झाले. सत्ता उपभोगणार, सत्तेचे सर्व फायदे मिळवणार; मात्र जबाबदारीचा विषय आला की मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवणार, असाच हा पवित्रा होता. राज्य चालवायची मनीषा बाळगणाऱ्या नेत्याकडून या पलीकडचे काही तरी ‘विचारांचे सोने‘ अपेक्षित होते. उद्धव यांनी त्याबाबत निराशा केली आणि त्याचवेळी एकीकडे मोदी यांची स्तुती, तर युती तोडल्यास भाजपवर ‘सर्जिकल ऍटॅक‘ करण्याची दमबाजी, यापलीकडे त्यांच्या भाषणात नवीन असे काहीच नव्हते. खरे तर हाच पवित्रा त्यांनी शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनी, 19 जून 2016 रोजी घेतला होता. त्यानंतरही शिवसेना ‘सर्जिकल राड्या‘च्या पुढे जाऊ इच्छित नाही, एवढाच काय तो या दसरा मेळाव्याचा बोध आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No aggression from Shiv Sena and Uddhav Thackray in Dussehra rally