वृद्धापकाळ की वरिष्ठोत्तमकाळ?

चित्रलेखा जोशी
शनिवार, 26 नोव्हेंबर 2016

ज्येष्ठ नागरिकांकडील विद्वत्ता, व्यावसायिक ज्ञान, विविध कौशल्ये हे अनमोल धन असते. त्यांना योग्य तो मान देऊन, त्यांच्या गरजांची आपलेपणाने दखल घेऊन त्यांच्या कौशल्यांचा समाजाने उपयोग करून घ्यायला हवा. त्यातून ज्येष्ठांच्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त होतो.

ज्येष्ठ नागरिकांकडील विद्वत्ता, व्यावसायिक ज्ञान, विविध कौशल्ये हे अनमोल धन असते. त्यांना योग्य तो मान देऊन, त्यांच्या गरजांची आपलेपणाने दखल घेऊन त्यांच्या कौशल्यांचा समाजाने उपयोग करून घ्यायला हवा. त्यातून ज्येष्ठांच्या जीवनाला नवा अर्थ प्राप्त होतो.

मी स्वतः एक ज्येष्ठ नागरिक आहे. ज्येष्ठांच्या आयुष्यातील चांगले, वाईट पैलू मी अनुभवले आहेत. वैद्यकीय प्रगतीमुळे सध्या आयुर्मान वाढत आहे, तसेच ज्येष्ठांची संख्याही. वाढत्या वयाबरोबर शारीरिक दुर्बलता येणे, थकवा जाणवणे, आजार इत्यादी बाबी ज्येष्ठ अनुभवत असतात. सामाजिक व आर्थिक प्रगतीबरोबरच कुटुंबाच्या रचनेत परिवर्तन झाले, संयुक्त कुटुंबांचे प्रमाण घटले आणि विभक्त कुटुंबांचे प्रमाण वाढले.

वैज्ञानिक प्रगतीचा परिणाम काम करण्याच्या जुन्या, पारंपरिक पद्धतींवर झाला. उदा. संगणक, इंटरनेटसारख्या शोधांचा परिणाम तरुण पिढीवर मोठाच झाला. तंत्रज्ञानाचा वापर तरुण सहजपणे करतात. मात्र त्याच गोष्टी ज्येष्ठांना स्तंभित करतात. अशा वेळी त्यांची अवस्था दयनीय होते. आजच्या कुटुंबांचे दोन किंवा तीन नमुने दिसतात. पहिला प्रकार म्हणजे ते कुटुंब ज्यात माता- पिता हे अपत्यांच्या कुटुंबांसह गुण्यागोविंदाने राहतात. नातवंडे, पतवंडे आजी- आजोबांचे लाड- कौतुकाचा अनुभव घेतात. त्यातून त्यांचे जीवन सुसह्य होते. यातून पिढ्यांतील अंतर कमी होण्यास मदत होते. तसेच नव्या पिढीला कौटुंबिक परंपरांचे ज्ञान होते. ज्येष्ठ त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करू शकतात. काही वेळा तरुणांना धकाधकीच्या आयुष्यात विषण्णता येते, अशा वेळी आपल्या अनुभवाच्या आधारे ज्येष्ठ समुपदेशन करू शकतात. अशी आदर्श स्थिती प्रत्येक ठिकाणी असण्याची शक्‍यता कमी आहे. नोकरीचे स्थान, निवासाची अडचण, नोकरीमुळे नात्यात आलेला दुरावा, तणाव इत्यादी कारणांमुळे आदर्श कुटुंब अशक्‍य होते. कुटुंबांचा आणखी एक प्रकार म्हणजे ज्यात तरुण पिढी आपल्या कामात उज्ज्वल यश मिळविते. त्याचा ज्येष्ठांना अभिमान वाटतो. पण एक जाणीव होते, ती ही, की आपण जे यश मिळविले, ते अति नगण्य होते. आपल्या ज्येष्ठतेचा, अधिकाराचा वापर करणेही त्यांना अशक्‍य होते. आणखीही एक जाणीव होते- आपण आपल्या पित्याला कर्तापुरुष म्हणून जो मान दिला, तो आपल्याला पुढच्या पिढीकडून मिळत नाही. अशा स्थितीत ज्येष्ठ आपल्या पैशाच्या अस्थिर आधारावर छोटेसे कुटुंब बनवून स्वतंत्र राहतात. मात्र एक अशी वेळ येते की विवश होऊन ते पुन्हा अपत्यांसमवेत राहू लागतात. या परिस्थितीत जगाचे मानदंड स्वीकारणे त्यांना कठीण होते. पण तडजोड करण्याशिवाय पर्याय नसतो. अशा प्रकारे विभक्त आणि संयुक्त कुटुंबातही ज्येष्ठांपुढे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. सर्वांत बिकट समस्या म्हणजे एकटेपणा. अशा वेळी इतर पर्याय शोधण्याची निकड असते. निवृत्तीनंतरच्या जीवनाचा योग्य वेळी विचार केलेल्या व्यक्ती आपले निवासस्थान मित्रपरिवार, सुहृद इत्यादींच्या जवळपास घेतात. आपले जुने संदर्भ जेथे असतील अशा ठिकाणी उत्तरायुष्य व्यतीत करू शकतात. जुन्या स्मृतींना उजाळा दिल्याने जीवन सुखमय ठरते. ही परिस्थिती निर्माण करणे शक्‍य नसेल, तर ज्येष्ठ व्यक्ती समान विचारांच्या सदस्यांच्या कार्यात सहभागी होऊ शकतात. समाजसेवा केवळ समाजसेवा न राहता त्यातून ज्येष्ठांना नवी ऊर्जा प्राप्त होते. जीवनाला नवा अर्थ मिळतो. तसेच आधी वेळ न मिळालेले छंद जोपासता येतात. निवृत्तीनंतरच्या काळाबद्दल दक्ष असणाऱ्या व्यक्ती आर्थिक नियोजन करतात, तसेच आपली प्रकृती सुदृढ राहण्याबद्दलही जागरूक असतात. वाढते आयुर्मान लक्षात घेता ज्येष्ठांनी योग्य नियोजन करणे अनिवार्य आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे पाश्‍चात्य देशांतील "असिस्टेड लिव्हिंग' म्हणजे रोजच्या जीवनात सहायता मिळण्याची सोय.

 

ज्येष्ठ नागरिक आपल्याच घरात राहतात, मात्र त्यांच्या गरजांबाबत या सेवा उपलब्ध होतात. वरिष्ठांना साह्य करणारे म्हणजे मित्र, नातेवाईक, शेजारीपाजारी तसेच काही स्वयंसेवक-ऐच्छिक किंवा पगारी या कामात योगदान देतात. 1) रोजचे जेवण ः उतारवयात स्वयंपाकघरातील काम जिकिरीचे असते. आग, पाणी, वीज, गॅस या बाबी ज्येष्ठांना धोकादायक ठरू शकतात. तसेच बाहेर जाऊन भाजीपाला, फळफळावळ, इतर सामानाची खरेदी कठीण असते. त्यासाठी शुल्क घेऊन किंवा परोपकार म्हणून ही मदत करणारे लोक असतात. 2) पर्सनल ग्रूमिंग किंवा स्वत:ची दैनंदिन स्वच्छता ः पुरुषांना दाढी करणेही वयपरत्वे अवघड ठरते. तसेच शौचालयाचा उपयोग, अंघोळ, वस्त्रपरिधान इत्यादीसाठी मदत लागते. 3) नर्सिंग ः ज्येष्ठांच्या काही विशेष गरजा असतात, जसे मधुमेहाचे रुग्ण- त्यांना रोज इन्सुलिनचे इंजेक्‍शन घ्यावे लागते, डायलिसिस रुग्णांच्याही गरजा विशेष असतात. असे काम प्रशिक्षितच करू शकतात. काही वेळा घरी मनुष्यबळाचा अभाव असतो. ज्येष्ठांची योग्य देखभाल व्हावी म्हणून नर्सिंग ब्यूरोकडून परिचारिका किंवा वॉर्ड बॉइजना शुल्क देऊन ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. पण कुटुंबात वॉर्ड बॉइजवर लक्ष ठेवण्यास कित्येक वेळा कोणीही नसते. अशा स्थितीत काही वेळा धक्कादायक अनुभव येतात. वॉर्ड बॉइज, परिचारिका यांच्या प्रशिक्षणात परदेशात व्यावसायिक बाबी तर असतातच, त्याबरोबरच व्यक्तिमत्त्वविषयक बाबी जसे संवेदनशीलता, मानवता, सहानुभूती इत्यादी वर्तनासंबंधी मुद्यांचाही विचार केला जातो. सरकारने या समस्येची दखल घेणे निकडीचे आहे.

आजकाल ज्येष्ठांसाठी वृद्धाश्रम आहेत. ही सुविधा ज्यांना कोणताही आधार नाही आणि पैशाचे पुरेसे पाठबळ आहे अशांना उपयुक्त आहे. या मागील दृष्टिकोन योग्य आहे. परंतु क्वचित प्रसंगी वृद्धाश्रमातील स्थिती असमाधानकारक असते. वृद्धाश्रमातील निवास ही जीवनातील आनंदमय अध्यायाची व्यवस्था आहे, असा विश्वास तेथील ज्येष्ठांना वाटावा, ही आदर्श अपेक्षा आहे. वृद्धाश्रम काळाची गरज आहे. मात्र प्रशासनाने वृद्धाश्रमांच्या स्थितीबद्दल योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे.
प्राचीन धर्मग्रंथांमध्ये मनुष्यजीवनाचे चार आश्रमात विभाजन केले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास. वानप्रस्थ आणि संन्यास हे दोन आश्रम वृद्धापकाळाचे अंग मानले जातील. या दोन आश्रमांचे कार्य म्हणजे जीवनात मिळविलेली शिकवण, ज्ञान, कौशल्ये समाजाला परत करणे. या प्रथेचे पुनरुज्जीवन करण्याने ही अमूल्य ठेव समाजाला अर्पित केल्यामुळे समाजाचा लाभ होईल यात शंका नाही आणि हे काम आजचे ज्येष्ठ करू शकतात. आपल्याकडील कोणतीही कौशल्ये नवीन पिढीला देण्यात वरिष्ठांना धन्यताच वाटेल!

शारीरिकरूपात ज्येष्ठ नागरिक दुर्बलतेकडे झुकले, तरी त्यांची विद्वत्ता, मनुष्यसंबंधांबाबत प्रगल्भ प्रज्ञा हे अनमोल धनच आहे. प्रश्न एवढाच की आपण हे धन वाया जाऊ देणार काय?

Web Title: old age or best seniority