विरोधकांना मिळाली ‘ईव्हीएम’ची भिंत!

Opposition parties will be holding a protest march in Mumbai the issue of EVM
Opposition parties will be holding a protest march in Mumbai the issue of EVM

महाराष्ट्र माझा : मुंबई 
‘ईव्हीएम’च्या मुद्द्यावर येत्या २१ तारखेला मुंबईत विरोधी पक्ष मोर्चा काढणार आहेत. आता ‘ईव्हीएम’च्या नावाने सत्ताधारी ‘चांगभले’ म्हणत आहेत, तर विरोधक बोटे मोडत आहेत. जात्यात गेलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आज जे करीत आहेत, तेच भाजपने पूर्वी पराभव झाल्यावर केले होते.

अपयशाचे खापर फोडायला काहीतरी लागते. हरलेला मल्ल संतापतो, वैतागतो. यातून बाहेर पडण्यासाठी मानसशास्त्र ज्या नव्या उपाययोजना सुचवते, त्यात भिंतीवर ठोसे मारण्याचा सल्ला दिला जातो. सध्या तमाम विरोधी पक्षांना ‘ईव्हीएम’ नावाची भिंत सापडलेली दिसते. राज ठाकरे यांच्या पुढाकाराने ‘ईव्हीएम’विरोधातील आंदोलनाचे रणशिंग फुंकले गेले आहे. येत्या २१ ऑगस्टला कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता ‘पुन्हा एकवार मतपत्रिकांकडे वळूया’ मागणीसाठी मुंबईत आंदोलन होणार आहे. राज यांनी ममता बॅनर्जी यांची पश्‍चिम बंगालमध्ये जाऊन भेट घेतली. राज सक्रिय झाले आहेत. 

लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत असल्याने महाराष्ट्रात ‘ईव्हीएम’ विरोध टिपेला पोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे तर २०१४ मधील पराभवानंतर विरोधी पक्षांना स्वत:ला सावरता आलेलेच नाही. महाराष्ट्राच्या विकासाचे प्रयत्न पाच वर्षे प्रामाणिकपणे सुरू असले, तरी म्हणावा तसा वेग या कामांना आला नाही. शेतकरी आत्महत्यांची संख्या कमी झाली नाही, रोजगारात लक्षणीय वाढही नोंदवली गेली नाही. खरे तर हा असंतोष एकत्र करता येणे शक्‍य होते. पण तसे झाले नाही. पालिका, जिल्हा परिषदा निवडणुकाही भाजप-शिवसेनेने जिंकल्या. लोकसभेत शिक्‍कामोर्तब झाले. मतदारांच्या कृपेचा मेघ भाजप आणि मुख्यत्वे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरसत राहिला. त्या अवकृपेत तडफडणारे नेते आपापला मतदारसंघ वगळता बाहेर विस्तारू शकले नाहीत. 

हतबल नेते आता राज ठाकरे यांच्या नेतृत्वाला मान्यता देत आहेत. निदान त्यांना ‘टीआरपी’ आहे. मते मिळत नसतीलही; पण प्रसिद्धीचे झोत मात्र प्रखर होतात. आजच्या परिस्थितीत हेही थोडेथोडके नाही. प्रारंभी राज ठाकरेंनी मतदान पूर्वीच्या पद्धतीने झाले नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले होते. हा प्रकार ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ प्रकारात मोडणारा. असा बहिष्कार टाकणे योग्य नाही, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर मंचावर नमूद केले. मग लगेच एक-दोन दिवसांत बहिष्काराचे अस्त्र मागे घेत, राज ठाकरे जुन्या-जाणत्या नेत्यांचेही प्रमुख झाले. एकही आमदार, खासदार नसलेल्या राज यांच्याकडे ‘ईव्हीएम’ आघाडीचे नेतृत्व आले. काँग्रेस-‘राष्ट्रवादी’तले बडे नेते आरोपांमध्ये अडकले असल्याने आक्रमक, प्रभावी वक्‍तृत्व असलेले राज ठाकरे महत्त्वाचे होतात. आमदार ११ असोत किंवा एकही नसो, राज कायम नेते भासतात. लोकसभा निवडणुकीतही खरा विरोधी प्रचार केला तो राज यांनीच. ‘लाव रे तो व्हिडिओ’ हा संवाद ऐकायला जनतेने प्रतिसाद दिला. 

‘ईव्हीएम’बाबत विरोधकांचे आक्षेप 
आता मुद्दा लोकशाही वाचवण्याचा, ‘ईव्हीएम’चा आहे. मशिनच्या नावाने सत्ताधारी ‘चांगभले’ म्हणत आहेत, तर सत्ताच्युत बोटे मोडत आहेत. त्यात काही नवीन नाही. जात्यात गेलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आज जे करीत आहेत, तेच भाजपने पराभव झाल्यावर केले होते. लालकृष्ण अडवानी यांना २००९ चा सामना डॉ. मनमोहनसिंग यांच्यासमोर गमवावा लागला अन्‌ यंत्रे चूक आहेत असा गहजब झाला. आज भाजप सुपात आहे. त्यामुळे मशिनचा गौरव गायला जातो आहे. सत्तेचे शहाणपण म्हणतात ते हेच असावे. यंत्रांबद्दल आक्षेप नोंदवायचा असेल, त्यांची सत्यता तपासून पाहण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस वगळता जेमतेम एखादा पक्ष तेथे हजर झाला. न्यायालयात याचिका टिकली नाही. ‘व्हीव्हीपॅट’ मोजण्याचे निर्देश दिले गेले. त्यात आणि यंत्रात तफावत आढळली नाही. तरीही पुन्हा ‘ईव्हीएम’चा मुद्दा उचलला गेला आहे. ‘मतदान यंत्रे सदोष आहेत, ती सुरतेत तयार केली जातात अन्‌ खरी यंत्रे बाजूला ठेवून बनावट यंत्रे पाठवली जातात,’ असाही आरोप केला गेला. तो सिद्ध झाला नाही, पण माध्यमांत यासंबंधीच्या बातम्या सतत येत राहतात. ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ अशा शेलक्‍या विशेषणाने छगन भुजबळ भाजप-शिवसेनेची भलामण करीत. आज तसाच प्रकार अवलंबला जातो आहे काय? 

हेही नसे थोडके
भारतात तयार होणारी मतदान यंत्रे पूर्णत: निर्दोष असल्याचा दावा शास्त्रज्ञ करत असतात. त्यांना परदेशातून मागणी आहे. शिवाय ती दोषपूर्ण असल्याचा हाकारा प्रत्यक्षात सिद्ध करता आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी या संबंधात सुरू केलेल्या प्रयत्नांना अजित पवार आणि जयंत पाटील यांनी साथ दिली. पाटील अभियंते, त्यामुळे ते ‘हॅकिंग’ची कल्पना समजावून सांगतात. मतदान यंत्रे बदलवली जातात, ती निर्धारित ठिकाणी ठेवली गेल्यावर ‘हॅक’ होतात हा आरोप चलनात आहेच. त्यासंबंधी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. त्यावरील सुनावणी लवकरात लवकर सुरू होणे हिताचे ठरेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रचाराची रेवडी उडवताना चतुरपणे नवाच मुद्दा समोर आणला. मतदार ओळखपत्रांना आधार कार्ड जोडण्याचा. त्यावरही चर्चा व्हायला हवी. येत्या २१ ऑगस्टच्या मोर्चाची पूर्वतयारी म्हणून घराघरांतून ‘ईव्हीएम’ विरोधाची पत्रे भरून घेण्यात येणार आहेत. नेते, आमदार, कार्यकर्ते भाजप किंवा शिवसेनेकडे पळत सुटले असताना विरोधी पक्ष उशिराने का होईना, पण घरोघरी पोचण्यासाठी मैदानात उतरला आहे हेही आशादायक आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com