सेंद्रिय आहाराचा दुहेरी लाभ

जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून गेल्या तीनेक दशकांत आपला आहार, विशेषतः शहरी आहार फार वेगानं बदलत गेला आहे.
Organic Food
Organic FoodSakal

हवामान बदलाच्या चर्चा आपण गेली काही वर्षं सातत्यानं ऐकतो आहोत आणि त्याच्या झळाही सोसतो आहोत. या प्रश्नातून वाट काढायची तर जागतिक स्तरावरच्या कृतीची गरज आहे, हे खरंच. पण आपला व्यक्तिगत कर्ब पाऊलठसा कमी करण्यासाठी, रोजच्या आयुष्यात आपण अनेक लहानलहान गोष्टी करू शकतो. दैनंदिन जगण्याचा विचार करता, हा पाऊलठसा मुख्यत्वे निगडित आहे तो आपला आहार, घर आणि वाहतुकीशी. (Sakal Editorial Article)

आहार ही तर आपल्या नियंत्रणातली बाब. त्यात योग्य बदल करून आपण आपल्या कृतीची सुरुवात करू शकतो. आपण काय आणि कसं खातो आणि अन्नाच्या बाबतीतला आपला दृष्टिकोन काय आहे, यावर आपला कर्ब पाऊलठसा अवलंबून असतो. आहाराच्या स्वरूपापासून, अन्न शिजवताना लागणाऱ्या ऊर्जेपर्यंतच्या आणि रेडीमेड पॅकेज्ड पदार्थांपासून अन्नाची नासाडी करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी पर्यावरणावर परिणाम घडवणाऱ्या असतात, हे आपल्या लक्षातही येत नाही.

Organic Food
अहमदनगर : 1982 मधील दरोड्यातील आरोपीस 38 वर्षांनी अटक

जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून गेल्या तीनेक दशकांत आपला आहार, विशेषतः शहरी आहार फार वेगानं बदलत गेला आहे. आपल्या खास देशी पदार्थांची जागा आता पाश्चिमात्य पदार्थांनी घेतली आहे. पण व्यक्तिगत कार्बन उत्सर्जन कमी करायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा पारंपरिक भारतीय आहाराकडे वळायला हवं. त्या-त्या प्रदेशात पिकणारं धान्य, भाज्या आणि फळं आपल्या दैनंदिन आहारात असायला हवीत. प्लॅस्टिक आवरणात गुंडाळलेले बाजारातले तयार पदार्थ आरोग्याला जितके घातक तितकेच पर्यावरणासाठीही नुकसानकारक! बाजारात जाताना कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यापासून, घरून निघताना पाण्याची बाटली सोबत नेण्यापर्यंत अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर आपण टाळू शकतो.

शाकाहारावरचा भर हरितगृहवायूंचं उत्सर्जन कमी करायला मदत करतो, असं अनेक संशोधकांच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. वनस्पतीजन्य प्रथिनं पुरवणाऱ्या विविध डाळी, उसळी आणि शेंगदाणे किंवा इतर बियांचा आहारातला समावेशही प्राणीजन्य प्रथिनांपेक्षा कर्ब उत्सर्जन लक्षणीयरित्या कमी करतो. भारतीय आहारात दूध, दही, लोणी-तुपाचा समावेश आणि योग्य प्रमाणातला वापर पिढ्या न पिढ्या होत आला आहे. मात्र आता त्याच्या बरोबरीनं, किंबहुना अधिक प्रमाणात, बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड चीज, पनीर आणि बटरचा वापर होताना दिसतो आहे.

Organic Food
गोखले इंस्टिट्यूटच्या कुलगुरू पदी डॉ. अजित रानडे

दुग्धजन्य पदार्थ आहारात जितके कमी तितका कार्बन पाऊलठसा कमी असतो, हे लक्षात घेऊन रोजचा आहार ठरवा आणि वनस्पतीजन्य प्रथिनांवर अधिक भर द्या. अन्न शिजवताना इंधनाची -वीज किंवा गॅसची- बचत करणं हा लहानसा पण प्रभावी उपाय आहे. सगळी तयारी झाल्यावर गॅस पेटवण्यापासून पदार्थ वाजवीपेक्षा जास्त वेळ शिजत न ठेवण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी इंधन वाचवतात आणि घरातली हवा कमीतकमी तापवतात. त्या-त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारी स्थानिक धान्यं, भाज्या आणि फळं खाण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञही देत आहेत.

योग्य सवयींची महती

हरितगृहांमध्ये पिकवली जाणारी फळं हल्ली वर्षभर उपलब्ध असतात. मात्र ती आरोग्याला हानिकारक असतात, तशी तापमानवाढीलाही हातभार लावत असतात. सेंद्रिय पदार्थांचे आरोग्यविषयक लाभ आपल्याला माहिती आहेतच. पण या पदार्थांचा कर्ब पाऊलठसाही कमीत कमी असतो. सेंद्रिय भाज्या आणि धान्याच्या किमती जास्त असल्या तरी आरोग्याचे लाभ लक्षात घेता, इतर अनेक अनावश्यक खर्च कमी करून सेंद्रिय आहार वाढवणं अवघड नक्कीच नाही.

शिवाय, घराची बाल्कनी, गच्ची किंवा अंगणात आलं, गवती चहा, मिरच्या, पालक, टोमॅटो यांसारख्या गोष्टींचं घराच्या गरजेपुरतं उत्पादनही शक्य आहे. उरलेलं अन्न टाकून देणं टाळायला हवं. हा ओला कचरा सडतो तेव्हा मिथेन हा हरितगृह वायू मोठ्या प्रमाणात हवेत मिसळतो. त्यामुळे गरजेपुरतं अन्न शिजवणं आणि उरलेल्याचा पुनर्वापर हा सोपा मार्ग. पारंपरिक आहार आणि त्याबाबतच्या योग्य सवयी कायम राखल्या तर हवामान बदलाच्या लढाईत आपण महत्त्वाचा वाटा उचलू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com