#यूथटॉक : मना पाहिजे अंकुश...

Pancham Deshpande
Pancham Deshpande

'इस शहर को ये हुआ क्‍या?... कही राख है, तो कही धुआँ...क्‍यूं कोई कुछ नही बोलता?...चुपचाप धुएँ को क्‍यूं झेलता?...' ही करकरीत खर्जातली ओळ चित्रपटगृहांत प्रत्येकानं ऐकली असेल; पण तिचा काहीच परिणाम न होण्याइतपत आपण संवेदनाशून्य झालो आहोत काय? मेंदूवर साचत चाललेला धूर आता तरी दूर सारायला नको? मजा मारणाऱ्या 'धुराड्यां'ना आणि दारूड्यांना विनाशाची जाणीव का नसावी?' नेहमीच मनाला निरुत्तर करणारे हे प्रश्न मलाच पडले असतील असं नाही. पण त्यावर गंभीरपणे विचार करताना फारसं कुणी दिसत नाही.

भावना प्रकटीकरणातील व्यवधानं, इतरांशी व स्वत:शी खुंटलेला संवाद यामुळे 'डिप्रेशन'नामक आजार झपाट्याने पसरतोय. कोणत्याही वयोगटाचे, स्तराचे स्त्री-पुरुष या आजाराला बळी पडताहेत. परंतु, 'नैराश्‍या'सारख्या आजाराला प्लेगएवढं मोठं बनवणं खरंच योग्य आहे? की आपल्याला प्रत्येक परदेशी लाटेत वाहवत जाण्याची सवय लागली आहे? तेथील अनेक निंद्य गोष्टी आपण अंधपणानं स्वीकारल्या; हे सत्य मात्र डोळे झाकून मान्यच करावं लागेल. या 'आयात' आजाराचं विनाकारण 'कौतुक' होत आहे आणि व्यसनांसाठी तो प्रतिष्ठित बहाणा बनत आहे. 'लघू धन' आणि 'खुलं मन' घेऊन जीवन आनंदानं जगावं. याउलट लोक संकुचित मनानं, निरर्थक गोष्टींसाठी पैसे घालून जगतात. 

सिगारेट, दारू, गांजा, ड्रग्ज, ताडी-माडी, तंबाखू, गुटखा, पान मसाला आदी अमली पदार्थ तरुणाईला मृत्यूच्या विळख्यात खेचताहेत. पण समाज आणि पालकांनी अनभिज्ञपणाची आणि अजाणतेपणाची चादर डोक्‍यापर्यंत ओढली आहे. देशातील पाचपैकी एक व्यक्ती व्यसनी आहे. दरवर्षी दारू किमान साडेतीन लाख जणांना मारते. शायर म्हणतो, 'मैकदे में किसने कितनी पी खुदा जाने मगर... मैकदा मेरे बस्ती के कई घर पी गया.' आपल्यासारख्या मूल्ये जपणाऱ्या व कुटुंब व्यवस्था मानणाऱ्या देशात हे घडावे ही अधोगतीच. 

दुर्दैवाने 'व्यसन'च्या क्षेत्रातदेखील स्त्रिया मागे नाहीत. आग्रह किंवा दमदाटी केल्यानं पतीसोबत, स्पर्धेच्या जगातील ताणतणाव दूर करण्यासाठी, 'किटी पार्टी', 'स्टेट्‌स पॉइंट' अशी अनेक कारणं त्यामागं आहेत. दिल्लीत महिलांच्या 'दारू मॉल'मध्ये गर्दी असते म्हणे! मागे एका परदेशी तज्ज्ञानं स्वतंत्र महिला कक्ष नसण्याबाबत विचारलं असता 'मुक्तांगण'च्या मुक्ता पुणतांबेकरांनी 'आमच्याकडे महिला व्यसन करीत नाहीत', असं अभिमानानं संगितलं होतं, पण 2009 मध्ये त्यांना महिलांच्या व्यसनमुक्तीसाठी 'निशिगंध' हा विभाग सुरू करावा लागला हे धक्कादायक. 

हुक्काबंदीमुळे काही जण गांजा सेवनाकडे, तर सिगारेट सोडू इच्छिणारे ई-सिगारेट्‌सकडे वळले. दुसरीकडे इंटरनेट, 'पब्जी'चे व्यसनही तरुणाईत वाढते आहे. प्रचंड माहितीचा स्रोत उपलब्ध असलेल्या या एकविसाव्या शतकात प्रत्येक जण 'ज्ञानाधीश' व्हायचा भाबडा प्रयत्न करतोय. काही जण 18-18 तास ऑनलाइन असतात. मुळातच क्षीण मनोबलाची ही मंडळी अवाढव्य, आभासी, वेगवान दुनियेत पाऊल टाकतात आणि पुढे तो वेग झेपेनासा झाला की निराशेला कवटाळतात. 

भारतीय कुटुंब व्यवस्थेतील बदल, स्व-अभिव्यक्तीची अप्राप्य वाट, जीवन व्यवहाराचा असह्य वेग, आधीच्या पिढीचं अविचारी अनुकरण, नात्यांची औपचारिकता, जिव्हाळ्याची कमतरता, आपुलकीची क्षीणता, योग्य शिस्त व मार्गदर्शनाचा अभाव हीदेखील यामागील काही कारणं आहेत. कशाचंही 'सेलिब्रेशन' म्हणजे व्यसनाचा आधार हे जवळजवळ ठरलेलंच. मनोरंजन आणि प्रसारमाध्यमांमधून हेच बिंबवलं जातं. विनोदही याच प्रकारचे. समस्यांचं आकलन आणि परिस्थितीचं समायोजन आजची पिढी कुठूनच शिकत नाही. 

व्यसनमुक्तीसाठी ध्यान, योग, निसर्ग, संगीत, चित्र, शिल्प, काव्य, नृत्य, लेखन, वाचन, खेळ ही अस्वस्थ मनाला स्वस्थ बनवणारी ऊर्जाकेंद्रे आहेत. प्रा. शिवाजीराव भोसलेंच्या मते, 'आत्मसन्मानाची भावना, जीवनात एखादा छंद आणि वडीलधाऱ्यांचा सहवास वाट्याला येणे शक्‍य असेल, तर या कडेलोटापासून सावरणे शक्‍य आहे.' चांगल्या सवयी अंगी बाणवण्यासाठी चांगली संगत, अनुकरण करण्यासाठी आसपास आदर्श असावेत. नसतील तर ग्रंथ किंवा चरित्रे यांचा आधार घ्यावा. तुकोबारायांच्या म्हणण्याप्रमाणे घडल्यास व्यसनमुक्त समाजाचं चित्र दूर नाही. तुका म्हणे मना । पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस । जागृतीचा ।। 

(लेखक सोलापुरातील तरुण कलावंत आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com