अनासक्त व्हा (परिमळ)

Parimal
Parimal

तानाजी कष्टाळू, हुशार, नीतिमान कर्मचारी. आदर्श कुटुंबप्रमुख म्हणूनही नातेवाईकात त्याला मोठा मान होता. अशा तानाजीचा मुलगा चोऱ्या करू लागला. या प्रकारामुळे तानाजी पार खचला व नैराश्‍यात गेला. त्याला मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. दुसरी घटना- मालोजीची मुलगी मॉडेलिंग करून चित्रपटसृष्टीत करियर करण्यासाठी तोकड्या कपड्यातील फोटो 'फेसबुक'वर टाकू लागली. समजावून, धाक दाखवूनही तिच्यात फरक पडेना. त्यामुळे 'लोक काय म्हणतील' या विचाराने मालोजी खचला. 
असे अनेक आई-वडील आपल्या मुला-मुलींच्या विचित्र वागण्यामुळे हैराण झाले आहेत. 'लोक काय म्हणतील, माझ्याच वाट्याला अशी संतती का आली,' यांसारख्या विचारांनी हे पालक चिंताग्रस्त आहेत. प्रत्येक व्यक्ती ही सगळ्याच दृष्टीने विभिन्न असते. दुसऱ्याला बदलणे हे आपल्या हातात नसते. आपण प्रयत्न करू शकतो, पण त्या व्यक्तीचा मानस, समजून घेण्याची क्षमता, पूर्वग्रह अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यामुळे सर्व बाजूंनी प्रयत्न करूनही व्यक्ती बदलत नसेल तर स्वतःला त्रास का म्हणून करून घ्यायचा? आपल्याला त्रास होतो. कारण आपण संबंधित व्यक्तीशी असलेल्या नात्याशी आसक्त झालेलो असतो. 'तेथे मी'- 'माझे' हे विशेषण घट्ट जोडून भावनिक बंधनात अडकलेलो असतो. 


दुसऱ्याच्या मुलाला अटक झाली- दुसऱ्याची मुलगी तोकडे कपडे घालून मॉडेलिंग करते याचे आपल्याला दुःख का होत नाही? कारण तेथे 'मी- माझा' व 'माझी'च्या विशेषणांची आसक्ती नसते. म्हणून जीवनात अनासक्त होणे गरजेचे असते. अनासक्त व्हायचे तर नात्यातील 'मी-माझा-माझी' हे बंधन मनातून दूर करणे गरजेचे असते. याबाबत विवेकानंदांनी खूप छान गोष्ट सांगितली आहे. एक दाई लहान मुलाला सांभाळायचे काम करत असे. एक वर्षानंतर जवळच्या बंगल्यातील व्यक्तीने त्या दाईला 'आपल्या लहान मुलाला सांभाळणार असशील, तर दोन हजार रुपये पगार जास्त देईन,' असे आमिष दाखविले. त्यावर दाईने मालकाला 'दोन हजार रुपये पगार वाढवा, अन्यथा नोकरी सोडेन', असे सांगितले. त्याने नकार देताच, दाई काम सोडून गेली.

लहान मुलाला सोडून जाताना व नोकरीचा त्याग करताना तिला किंचितही वाईट वाटले नाही. कारण 'हा माझा मुलगा आहे', या भावनेची दोरी तिने स्वतःच्या मनाला बांधली नव्हती. 'मी व माझा' हे दुःखाचे कारण असते. म्हणून आपल्या मुला-मुलींसाठी, नातेवाइकांसाठी जी आपली कर्तव्ये असतात ती मनापासून पार पाडा. फक्त ही कर्तव्ये पार पाडताना नात्यातील आसक्ती (बंध) दूर ठेवा. 'माझा मुलगा', 'माझी मुलगी' या घट्ट नात्यातील आसक्तीमुळे अपेक्षा खूप वाढतात व अपेक्षाभंग झाला की दुःख वाट्याला येते. म्हणून कौटुंबिक नाती सांभाळताना आसक्तीच्या बंधनात न अडकता अनासक्त व्हा. त्यांच्या प्रती असलेली कर्तव्ये पार पाडताना कर्ताभाव न ठेवता साक्षीभाव ठेवा. 'मी' व 'माझे' हे बंधन दूर करण्यासाठी ध्यान करा व आनंदी राहा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com