परिमळ : ब्रह्मचर्य

नवनाथ रासकर
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

सर्वच भारतीय धर्मांमध्ये ब्रह्मचर्य हे एक व्रत आहे. ते एक मूल्य आहे. कोणतेही मूल्य कालगत होत नाही. फार तर त्याच्या आशयात सुधारणा होत असते. मानवी जीवनाची व्यवस्था (आयुष्यक्रम) लावताना आपल्या प्राचीन ऋषींनी चार आश्रमांची योजना करून पहिला आश्रम म्हणून, तर योगदर्शनात "यम' ही योगाची पहिली पायरी सांगून त्यामध्ये ब्रह्मचर्याचा उल्लेख केला आहे. यम म्हणजे "संयम' "हे करू नको'. ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या हरतऱ्हेच्या वासना-विकारांना नियंत्रणात ठेवणे. सर्व इंद्रियांना काबूत ठेवणे. लैंगिक वासनांपासून दूर राहणे हा संकुचित अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे "सत्‌-सत्य' किंवा तत्त्व होय. ते नित्य असते, विकसित होत जाते.

सर्वच भारतीय धर्मांमध्ये ब्रह्मचर्य हे एक व्रत आहे. ते एक मूल्य आहे. कोणतेही मूल्य कालगत होत नाही. फार तर त्याच्या आशयात सुधारणा होत असते. मानवी जीवनाची व्यवस्था (आयुष्यक्रम) लावताना आपल्या प्राचीन ऋषींनी चार आश्रमांची योजना करून पहिला आश्रम म्हणून, तर योगदर्शनात "यम' ही योगाची पहिली पायरी सांगून त्यामध्ये ब्रह्मचर्याचा उल्लेख केला आहे. यम म्हणजे "संयम' "हे करू नको'. ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या हरतऱ्हेच्या वासना-विकारांना नियंत्रणात ठेवणे. सर्व इंद्रियांना काबूत ठेवणे. लैंगिक वासनांपासून दूर राहणे हा संकुचित अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे "सत्‌-सत्य' किंवा तत्त्व होय. ते नित्य असते, विकसित होत जाते. ब्रह्म म्हणजे आपल्या जीवनाचे जे काही ध्येय असते, ते होय. त्यानुसार आचरण करणे म्हणजे ब्रह्मचर्य होय.

ब्रह्मचर्याचा कोणताही, कितीही व्यापक अर्थ केला, तरी त्यातून लैंगिक वासना हा अर्थ बाद होत नाही. कारण आपण कोणतीही कृती जेव्हा मनापासून करीत असतो, तेव्हा आपल्या ठिकाणी लैंगिक किंवा तत्सम विचार येत नाही. थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना एका मुलाखतीत विचारले, "आपण लग्न का केले नाही'? त्यावर ते म्हणाले, "संशोधनाच्या कामामुळे लग्नाचा विचारही मनात आला नाही.' त्यांचे ध्येय आणि कामावरील निष्ठा यांच्याशी ते एकरूप झाल्याने त्यांच्या मनात तसा विचारच आला नाही. हेच ब्रह्मचर्य होय. स्वामी विवेकानंदांनी अवघ्या चाळीस वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण जगाला आपल्या विचार आणि वाणीने अक्षरशः वेड लावले, तेही ब्रह्मचर्यामुळेच. त्यांना हे कसे शक्‍य झाले? मुळात लैंगिक प्रेरणा ही मूलभूत-नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्यामुळे तिची पूर्तता न झाल्यास माणसाच्या ठायी अनेक विकृती निर्माण होतात, असे फ्राईडसारखे मानसशास्त्रज्ञ सांगतात. मग ब्रह्मचर्यपालन कसे शक्‍य होईल? ज्या वेळी आपण आपल्या इच्छा-वासना दडपून ठेवतो, तेव्हा ते दमन असते. यात आपण आपल्या मनाविरुद्ध वागतो, त्यामुळे त्या विकृत वर्तनाद्वारे बाहेर पडतात. म्हणून दमनाऐवजी नियंत्रण-संयमन महत्त्वाचे असते. ब्रह्मचर्य हे इंद्रियांना बांधणे नव्हे, की मोकळे सोडणे नव्हे, तर कामाला जुंपणे होय. हेच नियंत्रण असते. हे ब्रह्मचर्य सहज असते. म्हणून ते मूल्य असते. कोणतेही मूल्य पोकळ नसते. ते कशासाठीतरी असते. ब्रह्मचर्याने ज्ञानाची प्राप्ती करायची असते हे लक्षात घेतले, तर ब्रह्मचर्यपालन शक्‍य होते. मानवी जीवनाचा पहिला टप्पा विद्यार्थिदशेचा असतो. या काळात भावी आयुष्यात पुरेल एवढी ऊर्जा मिळवायची असते. ही ऊर्जा शरीरमनासाठी ध्यान-विपश्‍यना, व्यायामाने; तर चरितार्थासाठी शिक्षणाच्या मार्गाने आणि जीवनध्येयासाठी पूरक विद्येने मिळवावी लागते. उदा. आदर्श शिक्षक व्हायचे असेल तर तसा अभ्यास, वाचन असले पाहिजे. आजच्या युवकांनी हे लक्षात घेतले, तर त्यांना ब्रह्मचर्याचे महत्त्व पटेल, विनोद वाटणार नाही.

Web Title: parimal : celibacy