ढिंग टांग : कर्कटक ते कुर्ल्यो!

ब्रिटिश नंदी
Monday, 8 July 2019

कोकणातील तिवरे धरणाच्या फुटीला ही कर्कप्रजाती कारणीभूत असल्याचे शास्त्रीय सत्य उघड केल्याखातर थोर निसर्गसंशोधक डॉ. तानाजीराव सावंत ह्यांस जनक्षोभास तोंड द्यावे लागले.

सृष्टीतील खेकडे प्रजाती हळूहळू खाऊन संपवणे, हा धरणे-बंधारे वाचवण्याचा एकमेव उपाय आहे. हातभर लांबीची अनधिकृत बिळे कोरून धरणे खिळखिळी करणाऱ्या खेकड्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजेत, ह्यासाठी आम्ही आयुष्यभर मोहीम राबवली. जाऊ, तेथे खेकड्यांची संख्या कमी करण्यासाठी ठाण मांडले. त्यांची लोकसंख्या (जमेल तितकी) कमी केली. परंतु ह्या मोहिमेत आम्हाला 'ऍकला खाबो रे' हेच धोरण पाळावे लागले. 

खेकड्यांच्या प्रजातींवर संशोधन करणारा एक अभ्यासू निसर्गशास्त्रज्ञ अशी आमची शास्त्रवर्तुळात ओळख आहे, हे आम्ही नम्रपणे नमूद करितो. लहानपणापासूनच आम्ही कर्कसंशोधन ऊर्फ खेकडा हुडकण्याच्या मोहिमेवर जात असू. बिळात सराट्याची काडी घालून खेकडा बाहेर ओढण्याच्या कामी आम्ही वाकबगार होतो व आहो. वाटते तितके हे काम सोपे नव्हे. त्यासाठी खेकड्याची मनोवृत्ती अंगी बाणवावी लागते. समोर येणारी काडी ही घात करणारी असली तरी ती धरावी, असे ज्यास वाटते, ती खेकडा मनोवृत्ती. खेकड्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आम्ही कारकिर्दीत अनेकदा यशस्वी काड्या घातल्या.

खेकडा ऊर्फ कुर्ल्या हा आमचा वीकनेस आहे, असे गौरवोद्‌गार 'नेचर' ह्या आंतरराष्ट्रीय मासिकात (बहुधा मासिकच... किंवा साप्ताहिक असेल. जाऊ दे!) प्रसिद्ध झाले होते. 'कुर्ल्यांवरील ठिपके...एक निरीक्षण' हा आमचा शोधनिबंध आम्ही लिहून अन्यत्र पाठवला होता. पण टायपिंग मिष्टेक होऊन कुर्ल्यांवरील रफार गायब झाल्याने सदर निबंध परत आला!! पण ते जाऊ दे. 
सवासो करोड देशवासीयांनी ठरवले तर संपूर्ण देशातील धरणे-बंधारे निष्कर्क किंवा नि:खेकडा करणे सहज शक्‍य आहे. खेकड्यास संस्कृत भाषेत कर्क असे म्हणतात. (हे नुकतेच कळले.) आमची रास वृषभ आहे. असो!! वृषभेचे कर्काशी जमत नाही असे म्हंटात. नसेल जमत. आम्हाला काय? 

कोकणातील तिवरे धरणाच्या फुटीला ही कर्कप्रजाती कारणीभूत असल्याचे शास्त्रीय सत्य उघड केल्याखातर थोर निसर्गसंशोधक डॉ. तानाजीराव सावंत ह्यांस जनक्षोभास तोंड द्यावे लागले. त्याचे आम्हाला अतीव दु:ख होते. सर्वच संशोधकांना अशा टीकेला तोंड द्यावे लागते. कुणा एक डार्विन नामक संशोधकासही काही शतकांपूर्वी असेच जनक्षोभास तोंड द्यावे लागले होते.

जगण्यासाठी निकामी ठरल्यामुळे मानवप्राण्याचे शेपूट गळून पडले, असे त्याने सांगितले होते. पब्लिक भडकली!! अखेर अजून शेपूट गळालेले नाही, हे डार्विन ह्यास मान्य करावे लागले!! डॉ. तानाजीराव ह्यांनी 'तिवरे धरण खेकडे मंडळींनी फोडले,' असे सांगितल्यामुळे पब्लिक भडकले. त्याला काही इलाज नाही. वस्तुत: खेकड्यांच्या छिद्रान्वेषी वृत्तीमुळे हा प्रकार घडला, हे खरोखरच शास्त्रीय सत्य आहे. 

कोकणामध्ये मध्यंतरी एका तरुण व तेजस-वी संशोधकाने एक-दोन नव्हे, पांच-पांच प्रजातींचे खेकडे शोधून काढल्याचे आम्ही वांचले होते. गुबेरनाटोरियाना ठाकेरायी असे त्याचे (पक्षी : खेकड्याचे) शास्त्रीय नाव सदर तरुण संशोधकाच्या सन्मानासाठीच ठेवण्यात आल्याचा आम्हाला आनंद आहे. ही प्रजाती अमर होवो! तथापि, तिवरे धरण फोडण्याच्या पराक्रमानंतर तेथल्या खेकड्यांचा आम्ही कसून अभ्यास करून नवी प्रजाती शोधून काढली आहे, ह्याचाही आम्हाला तितकाच आनंद आहे. 

खेकड्याची नवी प्रजाती आम्हाला कोकणातील धरणांच्या आसपास आढळली. बिळात काड्या घालून आम्ही त्यास बाहेर काढून अभ्यासले. त्याची लांबीरुंदी साधारणपणे वीतभर असून डेंग्या चांगल्या भरगच्च (आणि रुचकर) आहेत!! सदर डेंग्या (पक्षी : नांग्या) सर्वसाधारणपणे जेसीबीच्या पंज्यासारख्या दिसत असल्याने त्याचे शास्त्रीय नाव आम्ही "धरणफोडस जेसीबीटस' असे ठेविले आहे... आमचे हेच संशोधन डॉ. तानाजीराव ह्यांनी चोरले व लाखोली खाल्ली! हा कालाचा महिमा की कालवणाचा, हे तुम्हीच ठरवावे. इति.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang