ढिंग टांग : मेरा जीवन, कोरा पाकिट!

ब्रिटिश नंदी
शनिवार, 20 जुलै 2019

''आमच्यासारख्या अनेकांच्या कोऱ्या पाकिटांवर तुम्ही कमळाबाईचा पत्ता लिहून ती पोष्ट केलीत! आम्ही सुस्थळी पडलो! तुमच्या पाकिटाला भरभक्‍कम पोष्टेज लागो व ते योग्य ठिकाणी डिलिव्हर होवो, ही सदिच्छा!,''

आमचे परममित्र आणि महाराष्ट्राचे मोटाभाई जे की रा. रा. चंदूदादा कोल्हापूरकर ह्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करितो. (आमच्या) कमळ पार्टीचे महाराष्ट्राधिपती म्हणून त्यांची जाहलेली नेमणूक ही सर्वथैव उचित, योग्य आणि अचूक आहे, यात शंका नाही. कधी तरी हे होणारच होते. रा. दादा ह्यांच्या (चष्म्यातील) गूढ स्मिताचा छडा लावत लावत भल्या भल्यांप्रमाणे आमचीही दांडी उडाली व आम्ही कधी कमळ पार्टीची मेंबरशिप घेतली, हे आमचे आम्हालाच कळले नाही.

परपपूज्य श्रीमान आद्य मोटाभाई ऊर्फ अमितभाई शाह ह्यांच्या नेतृत्वाखाली कमळ पक्षाने मंगळापर्यंतची सूर्यमालिका पादाक्रांत करून दाखिवली, तद्‌वत महाराष्ट्रभूमीत रा. दादा ह्यांचे नेतृत्व पक्षास कळसूबाईच्या शिखरावर तीनशेएकतीस फूट इतक्‍या उंचीवर नेईल, ह्याबद्दलही आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. रा. दादा ह्यांनी आमच्यासारख्यांना पक्षाचे दरवाजे उघडून मोठेच पुण्य मिळवले. रा. दादा नसते तर आम्ही आज काय करीत असतो? असो. तूर्त कमळ पक्षात आम्ही नवे असलो तरी (श्रीरामकृपेने) येत्या एक-दोन निवडणुकांमध्ये एखादे महामंडळ तरी घेऊ, अशी महत्त्वाकांक्षा आहे. असो. 

महाराष्ट्र कमळ पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती झाल्यानंतर रा. दादा ह्यांचे अभिनंदन करणे गरजेचे होते. नव्हे, ते आमचे कर्तव्यच होते. तदनुसार आम्ही तत्काळ 'ए-9' वाड्यावर पोचलो. वाड्याचा दिंडी दरवाजा कडेकोट बंद होता. एका फटीतून 'कुटून आलाईस?''अशी खास विचारणा झाली. आम्ही आमचे जिव्हाळ्याचे नाते तितक्‍याच खास पद्धतीने विशद केल्यावर दिंडी उघडण्यात आली. रा. दादा कोल्हापुरात नसले की येथे वास्तव्यास असतात हे आम्हास मालूम होते. 

आम्हाला रा. दादा ह्यांनी चष्म्यातून रोखून पाहिले. 
''हिते काय करायलायस, भावा?,'' त्यांनी मोठ्या (कोल्हापुरी) आत्मीयतेने विचारपूस केली. आम्ही दगडू बाळा भोसलेकृत निर्मित पेढ्यांचा खास पुडा पुढे केला. (चार पेढे होते...) एक चांगलासा (दहा रु.) हार काढून त्यांच्या गळ्यात घालून म्हणालो, ''अभिनंदन दादासाहेब! तुमच्या नेतृत्वाखाली आता पक्षाला दाही क्षितिजे कमीच पडतील!'' ...क्षितिजे नेमकी किती असतात आम्हाला ठाऊक नाही. पण दिशा दहा असतील तर क्षितिजेही किमान दहा असली पाहिजेत, असे आमचे लॉजिक सांगत्ये! रा. दादांनी त्यावर काहीही आक्षेप घेतला नाही. 'नसतील दहा क्षितिजे, तर लेको, आपण तयार करू...आहे की काय नि नाही काय' असा आत्मविश्‍वास त्यांच्या मुखावरोन वोसंडत होता. 

''आता इथून दिल्लीला भरारी वाटतं?''आम्ही खुशमस्करी केली. ही आम्हांस चांगली जमते. 
''कसली भरारी नि कसलं काय, भावा! मी कोऱ्या पाकिटासारखा आहे रे!'' रा. दादा म्हणाले. कोरं पाकिट म्हणताच आम्ही सावध झालो. 
''कसलं पाकिट?'' आम्ही. 
''आपल्या पाकिटावर पत्ता लिहिणारा दुसराच असतो ना! आपला पत्ता निश्‍चित करण्याचा अधिकार पाकिटाला कुठे असतो? प्रेषकाने पाठीवर लिहिलेल्या पत्त्यावर जाऊन पडायचं, हा आपला बाणा...काय?,'' चष्म्मा पुसत रा. दादा म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर अरिस्टॉटलचे भाव होते. 

''आमच्यासारख्या अनेकांच्या कोऱ्या पाकिटांवर तुम्ही कमळाबाईचा पत्ता लिहून ती पोष्ट केलीत! आम्ही सुस्थळी पडलो! तुमच्या पाकिटाला भरभक्‍कम पोष्टेज लागो व ते योग्य ठिकाणी डिलिव्हर होवो, ही सदिच्छा!,'' सद्‌गदित सुरात आम्ही आमच्या पोष्टल शुभेच्छांचे शब्दरूपी ग्रीटिंग कार्ड दिले व तेथून निघालो... 
...रा. दादा ह्यांनी आड्रेस लिहिलेले आमचे कोरे पाकिट डेड लेटर हपिसात पडून न राहो, अशा सदिच्छा आम्ही स्वत:लाच देत आहो! इति.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Satire in Marathi Dhing Tang