ढिंग टांग : दैवी शक्‍तीचे प्रयोग!

Dhing Tang
Dhing Tang

अत्यंत भक्‍तिभावाने भल्या सकाळी मुखसंमार्जन, स्नानादी नित्यकर्मे पार पाडून आम्ही गोरेगावात गेलो. तेथील भव्यदिव्य मांडव फुलून गेला होता. बघावे तेथे कमळे फुललेली आणि कार्यकर्तारूपी भ्रमरांचा गुंजारव सुरू होता. वाटले की 'बागों में बहार आयी' म्हंटात ते हेच!! गोरेगावरूपी तळ्यात उमललेले नेतेरूपी कमळांच्या पाशात अडकलेल्या कार्यकर्तारूपी भ्रमरांपैकी आम्हीही एक होतो. एक बरेसे कमळ हेरुन आम्ही त्या दिशेने सरकलो.

आम्ही गाठलेले कमळ म्हंजे दुसरे तिसरे कोणीही नसून आमचे नवे दैवत मा. चंदूदादा कोल्हापूरकर हे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हां कार्यकर्त्यांना पक्षाचा विजयरथ महाराष्ट्रात पुढे (पक्षी : बारामती समाविष्ट) ओढावयाचा आहे. मा. दादांभोवती जमलेल्या गर्दीत आम्ही डोकावतांच कानावर शब्द पडले : 'बघता काय, सामील व्हा!' काय सांगू, असे काही स्फुरण चढले, की विचारतां सोय नाही. 

''काहीही काळजी करू नका! सगळं काही नीट होईल! आपले कारभारी मा. नानासाहेबांच्याकडे दैवी शक्‍ती आहे! त्या शक्‍तीच्या योगे ते काहीही करू शकतात!,'' मा. दादांनी आम्हा भ्रमरांना दिलासा दिला. 

नानासाहेबांच्या ठायी दैवी शक्‍ती आहे, हे काही अज्ञानी कांग्रेसवाल्यांना कळणे शक्‍य नाही, परंतु, आम्हां कार्यकर्तारूपी भ्रमरांना नीट माहिती आहे. त्यांच्या अंगात दैवी शक्‍ती असल्याची जाणीव त्यांच्या निकटच्यांना लागलीच होत्ये. त्याचा अनुभव आम्ही एकदा घेतला आहे. मागल्या खेपेला त्यांच्याकडे गणपतीच्या आरतीला गेलो असताना त्यांनी हवेतून पेढा काढून आमच्या तळहाती ठेवला होता. आम्ही तो मटकावणार तेवढ्यात तो पेढा अदृश्‍यसुद्धा झाला!! दैवी शक्‍ती असल्याखेरीज हे कोण करील? कोठलीही समस्या घेऊन कोठल्याही वेळी त्यांच्यापाशी गेले की ते असे काही हंसतात की सर्व समस्यांचे निवारण होऊन अच्छे दिन आल्याचा साक्षात्कार तेथल्या तेथे होतो. असो. 

दादांच्या कोंडाळ्यातून निखळत आम्ही पुढे सरकलो. ''... मी नाराज नाही... मी नाराज नाही,'' हे वाक्‍य (त्या भाऊगर्दीतही) स्पष्ट ऐकू आल्याने आम्ही चमकून पाहिले. तेथे एका कोपऱ्यात मा. रावसाहेब दानवेजीरूपी कमळ एकटेच स्वत:शी पुटपुटत होते. 'मी नाराज नाही' ह्या वाक्‍यात केवढे मोठे मन सामावले आहे नै? असू दे, असू दे. आम्ही तेथून दूर सटकलो. 

...आपली पार्टी काहीच्या काहीच मोठी होऊन बसल्येय, ह्या अचंब्याने काही कार्यकर्तेरूपी भ्रमर मांडवरूपी तळ्यात उगीचच विहरत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पैल्यांदा म्हमईस आलेल्या गावाकडल्या बाळुश्‍याची कळा होती. जिथे तिथे महाराष्ट्राचे एकमेव कारभारी मा. नानासाहेब ह्यांची छबी लागलेली. त्या खाली ओळी होत्या : 'मी परत येईन!' 

परत- येईन! ह्या तीन शब्दांत केवढी तरी जादू भरलेली आहे नै? महाराष्ट्राला नवसंजीवनी देणारा जणू सप्ताक्षरी सिद्धमंत्रच! हे तीन शब्द वाचून तेथे जमलेल्या (काही) कमळांच्या पाकळ्यांवर दवबिंदू तरारले, तर काही कमळांच्या पाकळ्यांवर काटा उभा राहिला!! कुणाला हे आश्‍वासन वाटेल, तर कुणाला धीराचे शब्द! कुणाला प्रेमाचे वचन तर कुणाला इशारा! कुणाला आशीर्वचन... तर कुणाला सरळ सरळ धमकीदेखील वाटेल...पण ह्या तीन शब्दांत महाराष्ट्राचे भविष्य सामावलेले आहे, हे कोणालाही पटावे. हेही असू दे. 

तेवढ्यात साक्षात मा. नानासाहेब समोर उभे ठाकले. आम्ही शतप्रतिशत वंदन, नमन आणि प्रणाम (ओळीने) केला. प्रसादादाखल त्यांनी पटकन हवेत हात हलवून आमच्या कानातून एक चाकलेट काढून पुढे धरले. म्हणाले : घे रे, घे! 
...खरोख्खर दैवी शक्‍ती म्हंटात ती हीच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com