विचारांचे सामर्थ्य (परिमळ)

 विचारांचे सामर्थ्य (परिमळ)

कास डॅलोची गायिका होण्याची खूप इच्छा होती. एका नाइट क्‍लबमध्ये गाताना ती तिचे पुढे आलेले दात ओठांनी लपवण्याचा वारंवार प्रयत्न करत होती. त्यामुळे सर्व एकाग्रता व शक्ती गाण्यात न लावता आल्याने तिचे सादरीकरण म्हणावे तसे झाले नाही. पुढे आलेले दात आपला चेहरा विद्रूप करतात, या विचारांनी तिला अपयश आले होते. तेथे समोरच बसलेल्या मानसशास्त्रज्ञाने हे जाणले. कार्यक्रम संपल्यानंतर तो तिला म्हणाला, ‘‘दात लपवण्याचा प्रयत्न करू नकोस, नैसर्गिक व सहजपणे गा. तुझ्या आवाजात खूप गोडवा आहे. जे दात तू आज लपवतेस, त्याकडे दुर्लक्ष कर. तेच तुला उद्या संपत्ती मिळवून देतील.‘‘ कास डॅलोचा नकारात्मक विचार त्या माणसाने बदलला. तद्‌नंतर संगीत क्षेत्रात कास दिग्गज म्हणून उदयास आली. विचारांची केवढी ही ताकद ! 

मित्रांनो, आपण विचार करू, तशीच परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते. तुमचे बॅंकेतील खाते, तुमच्या आनंदाचे खाते, तुमचे समाधानाचे खाते ही सर्व खाती किती मोठी आहेत किंवा त्यांचा आकार किती मोठा आहे हे तुमच्या विचारांवर अवलंबून असते. त्यामुळे नेहमी भव्य-दिव्य, सकारात्मक विचार करा. भव्य विचार करण्याच्या किमयेतली मूलभूत तत्त्वे आणि संकल्पनांचा उगम पृथ्वीवर जन्म घेतलेल्या आजवरच्या सर्वोत्तम आणि भव्यतम विचार करणाऱ्यांच्या मनामध्येच झाला आहे. इमर्सनने म्हटले होते, ‘‘जगावर, विचाराचं राज्य असतं, हे ज्यांना कळतं ती माणसं थोर असतात. आपल्या संगतीचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होत असतो, त्यामुळे निराश व नकारात्मक विचारसरणींच्या लोकांपासून दूर राहा. आपल्यात हे करण्याची क्षमता व पात्रता नाही असे वाटू लागेल, तेव्हा भव्य विचार करा, आपण दुबळे आहोत असा विचार केला तर खरोखरच तुम्ही दुबळे व्हाल.‘‘ इंग्रजी कवी डब्ल्यू. सी. हेन्ले म्हणतात, ‘‘आपण आपल्या नशिबाचे मालक- आत्म्याचे कप्तान यासाठीच असतो, कारण आपल्या विचारांना आपण नियंत्रित करू शकतो.‘‘ 

जगात उपहास व निंदा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यांच्या विचारांचा स्वतःवर कसलाही परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. हेन्‍री फोर्डने डेट्राईटच्या रस्त्यावर त्याचे ओबडधोबड रचनेचे पहिले स्वयंचलित वाहन आणले. त्याच्यावर खूप टीका झाली. लोक तुच्छतेने हसत होते. फोर्डने आपल्या सकारात्मक विचारांनी त्यात सुधारणा करत विश्‍वासार्ह मोटारगाड्यांची निर्मिती करून करोडो रुपये कमावले. म्हणून माणसाने सकारात्मक विचारशील राहिले पाहिजे. जन्मभर एकच ग्रंथ वाचून त्याला जगात तोड नाही, असे म्हणत त्यातील वचनांना प्राधान्य देणे, या गोष्टी विचारशीलतेला सोडून असतात. एखादी विभूती आदर्श मानून तिच्यासमान होण्याचा प्रयत्न करणे, हा आपल्या विचारांचा पराभव करण्यासारखे आहे. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात अडथळा येऊन मनुष्य गुलामगिरीत लोटला जातो. विविध विषयांवरचे ग्रंथ वाचणे, चाळणे, त्यावर सारासार विचार करणे ही सवय लावून घेतली पाहिजे. शेक्‍स्पिअर म्हणायचे, ‘‘जगात चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं. आपले विचारच चांगलं किंवा वाईट ठरवत असतात.‘‘ गौतम बुद्धांनी सांगितले होते, ‘‘मी म्हणतो म्हणून माझे ऐकू नका. एखादी गोष्ट तुमच्या विचारांच्या, अनुभूतीच्या आधारावर घासून पाहा. तेच तुमच्यासाठी सत्य होय.‘‘ म्हणून ऐकताना, वाचताना आपण स्वतंत्रपणे विचार करायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com