सत्याची ताकद

डॉ. दत्ता कोहिनकर
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

एक राजकुमार स्वतःच्या विवाहासाठी स्वयंवर घोषित करतो. या स्वयंवरात राजकुमारींच्या बरोबर एक नोकरदाराची मुलगीदेखील सामील झालेली असते. कारण तिला तो राजकुमार आवडत असतो.

राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जाऊन आपल्याजवळील पिशवीतील एक-एक बी प्रत्येकीला देतो आणि घोषणा करतो, की ""तीन महिन्यांनी ज्या मुलीच्या कुंडीमध्ये या बी-पासून सुंदर रोप उगवेल, त्या मुलीशी मी लग्न करेन.'' तीन महिन्यानंतर अनेक राजकुमारी आपापल्या कुंडीतील रोप घेऊन त्याच्यासमोर येतात. नोकराच्या मुलीच्या कुंडीमध्ये तिने खूप प्रयत्न करूनदेखील काहीच उगवलेले नसते. राजकुमार सगळ्यांच्या कुंड्या, त्यातील फुलांनी आच्छादलेली रोपे पाहतो व जिच्या कुंडीत काहीच उगवले नसते, त्या नोकराच्या मुलीशी लग्न करण्याची घोषणा करतो. कारण त्याने सर्व तरुणींना दिलेल्या बिया निर्जीव असतात. राजकुमाराशी लग्न करायच्या तीव्र लालसेने त्यांनी दुसरी आकर्षक रोपे कुंडीत लावून आणलेली असतात. नोकरदाराच्या मुलीच्या आचरणातील सत्यता राजकुमाराला मोहीत करते. सत्याची ही केवढी मोठी!
स्वामी विवेकानंद म्हणतात, ""सत्य हे एवढे प्रभावी असते, की आकाशातून जमिनीवर फेकले; तरी ते ठामपणे त्वरित उभे राहते.'' लोक तुम्ही खरे बोलता, म्हणून तुमचे घर पेटवू लागले, तरी सत्याशी एकनिष्ठ राहा. पाहा त्याच ठिकाणी तुम्हाला तुमची स्वतःची टोलेजंग इमारत उभी दिसेल. अब्राहम लिंकन म्हणाले होते; फसवून आलेल्या यशापेक्षा सरळ आलेले अपयश श्रेयस्कर असते. सत्यासारखे श्रेष्ठ तत्त्व नाही.

धर्मराजाने "नरो वा कुंजरो वा' असे द्रोणाला सांगितले. हे अर्धसत्य असल्याने त्याचे परिणाम वाईट झाले. धर्मराजासारखा नैतिक संघर्ष बऱ्याचदा आपल्या वाट्याला येतो. "सत्य ब्रुयात प्रियं ब्रुयात' असे वचन आहे. त्यातील सत्यापेक्षा प्रिय भागाकडे, खरे बोलण्यापेक्षा, बरे वाटेल असे बोलण्याकडे, दिवसेंदिवस आपला कल वाढत आहे. संत रामदास स्वामी म्हणतात,
मना सर्वथा सत्य सांडू नको रे। मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे।
मना सत्य ते सत्य वाचे वदावे। मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे।
ज्यामुळे समस्त मानवजातीचे हित किंवा कल्याण होते, ती गोष्ट सत्य होय. सत्याच्या स्वीकृतीसाठी मन, बुद्धी आणि इंद्रिय अत्यंत शुद्ध हवीत. विषययुक्त मन दुबळे असते, ते सत्याचा स्वीकार करू शकत नाही. आज व्यवहारामध्ये पदोपदी माणूस खोटे बोलतो. आज माणूस असत्याला निर्ढावला आहे. अनेकदा पालक मुलांना सांगतात, "खोटे बोलू नका' व त्यांच्याचसमोर स्वतः पदोपदी खोटे बोलतात. अशाने कशी आपली मुले सत्याला जवळ करतील? वय कमी सांगणे, मार्क वाढवून सांगणे, हुद्दा वाढवून सांगणे, या साध्या-साध्या गोष्टीतही आपण असत्याला जवळ करतो. ब्रह्मदेशातील विपश्‍यनाचार्य सयाजी उबाखीन गुरुजींकडे एक वकील साधना करावयास आला, "पूर्ण सत्य मी बोलू लागलो तर माझी वकिली चालणार कशी?' असा प्रश्‍न त्याने गुरुजींना विचारला. गुरुजी म्हणाले, "धर्मावर विश्‍वास ठेवून पूर्ण सत्याला शरण जा. बघ काय चमत्कार होईल.' कालांतराने सत्यवचनी - न्यायवचनी म्हणून तो वकील प्रसिद्ध झाला. न्यायाधीश त्याच्या या सत्यवचनाच्या प्रभावाने त्याच्या बाजूने न्याय देऊ लागले.
भगवान गौतम बुद्ध म्हणतात - गुलाबाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने वाहतो. पण सत्यवचनी - शीलवान माणसाचा सुगंध चारही दिशेला पसरतो; म्हणून नेहमी सत्य बोला, सत्याने चाला. ज्यावेळेस एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर देतेवेळी खोटे बोलण्याची वेळ येईल, त्यावेळेस मौन पाळा किंवा विषयांतर करा. खोटे बोलू नका. खोटे बोलणाऱ्याला अनुमोदन देऊ नका. सत्यवचन हा मानवधर्म आहे. सत्य, अर्थ व धर्म यात प्रतिष्ठित असलेल्या संताचे हे अमृतबोल आहेत.

Web Title: power of truth