उत्क्रांतीची चित्तरकथा आणि सत्यपाल सिंह...

प्रदीप रावत
गुरुवार, 25 जानेवारी 2018

विज्ञानात सर्वाधिक विरोध कशाला झाला असेल तर तो जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताला. चार्ल्स डार्विनने तो मांडला १८५९मध्ये. गेल्या दीडशे वर्षांत जी नवनवी शास्त्रे उदयाला आली त्यातून या सिद्धान्ताला बळकटीच मिळाली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या तो खोडून काढण्यात आल्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांना भास झालेला दिसतो! त्यांनी केलेला हा दावा सपशेल चुकीचा आहे

जीवसृष्टीचे वैविध्य निर्माण करणारी कार्यप्रक्रिया आणि त्यांचे आराखडे यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण देणे हे उत्क्रांती संकल्पनेचे उद्दिष्ट. गफलती होतात त्या  वेगळे अर्थ काढण्याच्या प्रयत्नांमुळे. होतात.

विज्ञानात सर्वाधिक विरोध कशाला झाला असेल तर तो जैविक उत्क्रांतीच्या सिद्धांताला. चार्ल्स डार्विनने तो मांडला १८५९मध्ये. गेल्या दीडशे वर्षांत जी नवनवी शास्त्रे उदयाला आली त्यातून या सिद्धान्ताला बळकटीच मिळाली आहे. वैज्ञानिकदृष्ट्या तो खोडून काढण्यात आल्याचा केंद्रीय मनुष्यबळविकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांना भास झालेला दिसतो! त्यांनी केलेला हा दावा सपशेल चुकीचा आहे. त्यांच्या खात्याचे कॅबिनेटमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरकारची ही भूमिका नसल्याचे सांगून शास्त्रज्ञांना आणि विज्ञानप्रेमींना दिलासा दिला, हे बरे झाले. या सिद्धांताला विरोध दोन प्रमुख कारणांमुळे होतो. एक पूर्णपणे धार्मिक. बायबलमधील विश्‍वनिर्मितीच्या कल्पनेचा पायाच या संकल्पनेमुळे उखडला जातो. त्यामुळे पारंपरिक श्रद्धेला धक्का बसतो. अमेरिकेत होणारा विरोध या बाबतीत बराच संघटित असून, अभ्यासक्रमातून हा विषय वगळण्याची मागणीही होत असते.  याशिवाय सौदी अरेबियासह काही मूलतत्त्ववादी देशांमध्ये हा विषय शिकवण्यालाच बंदी आहे. आपल्याकडे आजवर उत्क्रांतीला अशाप्रकारचा विरोध झाला नव्हता. दुर्दैवाने तो सुरू झालेला दिसतो. दुसरा प्रकार आहे तो मूळ सिद्धांताचा योग्य अर्थ न घेतल्याने. जर उत्क्रांती मानली तर संकल्पस्वातंत्र्याला अर्थ उरत नाही, असे काहींना वाटते; तर काहींना ‘बळी तो कान पिळी’ या तत्त्वाला बळ मिळते, असे वाटते. वस्तुतः या सृष्टीतील तगून राहिलेल्या जिवांमध्ये स्वार्थ आणि सहकार्य या दोन्हींचा मेळ दिसतो. त्यामुळेच गरज आहे, ती या सिद्धांताचे स्वरूप नीट जाणून घेण्याची.

मानवजात, अन्य सजीवाप्रमाणे, सृष्टीच्या हेतूशून्य शक्तींचे, काळाच्या महाकल्पांच्या सोबतीने जन्माला आलेले अपत्य आहे. डार्विनने प्रतिपादन केलेल्या उत्क्रांती सिद्धांताचे हे सारभूत तत्त्व आहे. ज्या शक्तींनी नेचे, अळंबी, सरडे आणि खारी यांना जन्म दिला त्यांनीच आपल्यालाही दिला. जीवसृष्टीचे वैविध्य निर्माण करणारी कार्यप्रक्रिया आणि त्यांचे आराखडे यांचे शास्त्रीय स्पष्टीकरण देणे एवढेच उत्क्रांती संकल्पनेचे उद्दिष्ट आहे. ती जीवनाचा अन्वयार्थ सांगणारी एखादी भव्य तत्त्वज्ञानात्मक योजना नाही. आपण काय करावे, कसे वागावे हे ती सांगू शकत नाही. जीवसृष्टीच्या उत्पत्तीकथेत आपल्या अस्तित्वाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जातो आणि कसे वागावे याचे मार्गदर्शन त्यातून मिळेल, अशी अपेक्षा केली जाते. विरोधाचे मूळ या अपेक्षेतही असते.

 उत्क्रांतीचा आधुनिक सिद्धांत समजायला सोपा आहे. पृथ्वीवर आढळणारी जीवसृष्टी सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली. त्याचा प्रारंभ कदाचित स्वतःची प्रत निर्माण करण्याची क्षमता प्राप्त झालेल्या रेणूपासून झाली असावी. एका आद्य पूर्वजजातीपासून जीवसृष्टी अत्यंत कूर्मगतीने उत्क्रांत झाली आहे. या प्रदीर्घ कालावधीत जीवसृष्टीला असंख्य फाटे फुटले. उत्क्रांतीच्या अखंड वाटचालीतून नूतन व विभिन्न जातींचा उद्‌भव घडला व घडत असतो. ही उत्क्रांती साध्य करणारी यंत्रणा, बहुतांशी नैसर्गिक निवड असते. उत्क्रांतीच्या सिद्धांताची सहा प्रमुख घटकतत्त्वे आहेत. उत्क्रांती, कूर्मगतिवाद, जातीउद्‌भवन, समान पूर्वजपरंपरा, नैसर्गिक निवड आणि जनुकीय विचलनासारख्या नैसर्गिक निवडीव्यतिरिक्‍त अन्य मार्गाने उत्क्रांती साध्य करणाऱ्या यंत्रणा. सजीवांच्या सर्व जातीत कालौघात जनुकीय पातळीवर बदल घडत असतात. या बदल प्रक्रियेला उत्क्रांती असे म्हणतात.

असंख्य पिढ्यांनंतर एक विशिष्ट जात भिन्न रूपात उत्क्रांत होते. हे शरीररचनेतील भिन्नत्व डी एन एमध्ये होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होते. डीएनएतील जनुक रचनेत घडणाऱ्या विकारांमध्ये त्याचे मूळ असते. वर्तमानकाळात अस्तित्वात असलेल्या वनस्पती व प्राण्यांच्या जाती भूतकाळातील जीवसृष्टीचे घटक नव्हते; परंतु भूतकाळात अस्तित्वात असणाऱ्या जातींचे ते वर्तमान वंशज आहेत. उदा. वानरसदृश प्राण्यापासून मानवजात उत्क्रांत झाली; पण आपला हा पूर्वज वर्तमान वानरजातींपेक्षा (चिंपांझी, गोरीला, बोनॅबो) भिन्न होता. जाती उत्क्रांत होत असल्या तरीही त्या सर्वांच्या उत्क्रांतीचा वेग समान नसतो. इतरांच्या तुलनेत देवमासे व मानव यांसारख्या काही जाती जलदगतीने उत्क्रांत झाल्या आहेत. पण काही जाती त्यांच्या लक्षावधी वर्षांपूर्वीच्या पूर्वजांशी जवळपास तंतोतंत जुळणाऱ्या आहेत; त्यांना ‘‘सजीव जीवाश्‍म’’ म्हणतात.  आपली जीवसृष्टी नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांत झाली आहे. नैसर्गिक निवड हा काही अव्वल दर्जाचा अभियंता नाही. अभियंता शून्यापासून सुरवात करू शकतो. त्यामुळे सुनियोजित आराखड्यानुसार परिपूर्णता साध्य करतो. शून्यापासून प्रारंभ करण्याचे स्वातंत्र्य नैसर्गिक निवडीला नसते. जे उपलब्ध आहे त्यात उपयुक्‍त बदल किंवा डागडुजी करणे एवढेच त्याला शक्‍य आहे. नैसर्गिक निवडीला नवनिर्मितीबाबत खूपच मर्यादा आहेत. त्याचप्रमाणे परिपूर्ण शरीररचनेचा उद्‌भव जवळपास अशक्‍य आहे. कारण त्यासाठी आवश्‍यक ते जनुकीय विकार अतिशय दुर्मिळ असतात. सजीवांची सगुण व साकार रूपे विराट निसर्गाचे दर्शन घडवतात; त्यांची गुंतागुंतीची आणि परिपूर्णतेला स्पर्श करणारी शरीररचना बुद्धीपुरस्सर भासते; त्यांचे जीवनचक्र या निरीक्षणाला दुजोरा देते. भोवतालच्या परिसराशी समरस होण्याची असामान्य किमया त्यांनी साध्य केली आहे. उदाहरणार्थ, प्रसंगानुरूप त्वचेवरील रंगछटा आणि नक्षीचा आकार स्क्‍विड्‌स व फ्लॅट फिश बदलू शकतात; शिकारी व सावज यांच्या दृष्टिआड दबा धरून बसण्याची कला त्यांना अवगत आहे. रडारच्या साहाय्याने कीटकांचा वेध निशाचर वाघुळे घेऊ शकतात. हेलिकॉप्टरपेक्षा जास्त सफाईने घिरट्या घालणे व मोहरा बदलणे या क्रिया हमिंगबर्डस करू शकतात; फुलांच्या तळाशी असलेला मध त्यांच्या लांबलचक जीभेच्या साहाय्याने ते सहजगत्या चाखू शकतात; त्या संधीचा फायदा घेऊन ती फुले त्यांच्या चोचींवर परागकणांचा शिडकावा करतात. त्यांच्या मदतीने इतर फुलांचे फलन साध्य करतात.

‘‘दि ओरिजिन’’ या ग्रंथात डार्विनने जीवसृष्टीचा आराखडा, विकास आणि वैविध्य यांचे स्पष्टीकरण देणारे पर्यायी गृहीत मांडले आहे. त्या ग्रंथात त्याने केवळ जीवसृष्टीच्या उत्क्रांतीचे पुरावे दिले आहेत असे नसून विश्वनिर्मातावाद निःसंदिग्ध फेटाळला आहे. डार्विनच्या काळात उपलब्ध पुरावा त्याच्या सिद्धांताबद्दल विश्‍वसनीयता निर्माण करू शकत होता; परंतु संपूर्णपणे निर्णायक नव्हता. त्यामुळे डार्विनने प्रथम प्रतिपादले तेव्हा उत्क्रांती हे प्रमेय होते. (भले भरभक्‍कम पुराव्यांवर आधारित होते, तरीसुद्धा!) पण १८५९ पासून पुराव्यांचे ढीग साचू लागले, तसतसे पायरी पायरीने तो सिद्धांतपदाला पोहोचला. तो सिद्धांत आहेच; वास्तवाचे प्रतिबिंबही आहे, हे विशेष.

(लेखक भाजपचे माजी खासदार आहेत)  

Web Title: pradeep rawat writes article in editorial page